बेलभंडार भाग 3

स्वराज्यावर शायिस्ताखान नावाचे संकटाचे ढग दाटून आले.



बेलभंडार भाग 3

मागील भागात आपण पाहिले केशर भैरोबाच्या यात्रेत खंडोजीला भेटते. जिवाजी आणि खंडोजी एकमेकांना ओळखतात. इकडे महाराज शायिस्ताखानाच्या फौजेवर हल्ले चालू ठेवायची आज्ञा देतात.आता पाहूया पुढे.


यात्रेवरून येताना खंडोजीच्या नजरेसमोर केशर होती. नजरेने बाण आणि हाताने तलवार चालवणारी केशर त्याला आवडली होती.तर इकडे केशरला सतत खंडोजीचे खट्याळ हसू आठवत होते. घरी निघताना दोन जीव एकमेकांत गुंतले होते.


दुपारची टळटळीत उन्हे वर चढत होती. राजगड ताठ मानेने उभा होता जणू सह्याद्रीच्या गळ्यातील ताईत जसा. तेवढ्यात दूरवरून धूळ उधळू लागली. उन्हाची काहीली होत असतानाही घोडा वाऱ्याच्या वेगाने धावत होता. गडावरील टेहेळणी करणाऱ्यांनी घोडा हेरला आणि खुणेचे निशाणही ओळखले. स्वार पायउतार झाला आणि मुख्य दरवाजावर आला.


"भंडाऱ्याचा रंग फिका झाला." शब्द ऐकताच गडाचे दरवाजे उघडले गेले.


राजांना आणि आऊसाहेबांना वर्दी द्यायला दुत धावत निघाले. महाराज आणि आऊसाहेब तातडीने सदरेवर यायला निघाले. खलीता घेऊन आलेला दुत खाली मान घालून उभा होता. आऊसाहेब आणि महाराज दालनात आले. दुताने महाराज आणि आऊसाहेबांना मुजरा केला.


"बोला,काय खबर आहे." आऊसाहेबांचा करारी आवाज दालनात घुमला.

"आवसाब,राज घात झाला. जेजुरीत खानान हौदोस घातला." दुत खाली मान घालून सांगू लागला.

त्यासरशी महाराजांची हाताची मूठ आवळली गेली आणि हात कवड्यांच्या माळेवर गेला.

"जगदंब! जगदंब! जगदीश्वरा आजुन किती परीक्षा पाहशील ह्या मावळ मुलूखाची?" महाराज संतप्त झाले होते.

" खंडेरायाचे राऊळ सुरक्षित आहे ना?" आऊसाहेब अत्यंत क्रोधित आवाजात विचारत होत्या.

दुत खाली मान घालून उभा होता.

"बोला! जोत्याजी बोला!" आऊसाहेब गरजल्या.

"आऊसाब,कळस फुटला आन....." जोत्याजी बोलताना त्यांचे सर्वांग संतापाने थरथरत होते.

त्यानंतर कितीतरी वेळ दालनात शांतता होती. महाराज उठले आणि जोत्याजी जवळ गेले.


" आई जगदंबा आपल्याला मार्ग दाखवेल. तिकडे आपला फिरंगोजी चाकणचा किल्ला लढवत आहे. निराश होऊन चालणार नाही."


जोत्याजी निघून गेले. महाराज मात्र अस्वस्थ होते. सह्याद्रीचा सिंह आतुर होता शायिस्ताखानाच्या नरडीचा घोट घ्यायला.


खानाचा बंदोबस्त कसा करायचा? आजवर झालेल्या लढाया गनिमी काव्याने जिंकता आल्या पण मुघलांची लढाईची पद्धत पूर्ण वेगळी होती. प्रचंड सैन्यबळ, तोफखाना,हत्ती,घोडे अशा प्रकारची लढाई स्वराज्याला नवीन होती. त्यामुळे राजांनी ठरवले खानाला आणखी आत येऊ द्यायचे.


जेजुरी लुटली. खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरीला पूर्ण उद्वस्त करून खान पुण्याच्या दिशेने निघाला. वाटेत येईल ते गाव चिरडत.


आठ दहा मुघल सैनिकांची तुकडी जरा आतल्या भागात शिरली होती. पैसा,स्थावर मालमत्ता लुटली जात होतीच. परंतु त्या लांडग्यांची नजर स्वराज्यातील लेकीबाळी, माहेरवाशिणी, सासुरवाशीण सूना यांच्यावरसुद्धा होती.

एका ठिकाणी दोन बायका पाणी घेऊन चालल्या होत्या. तेवढ्यात घोडे आडवे आले.

"जानेमन रूको| जरा हमारी प्यासभी बुझाओ|" एकाने घोड्यावरून उडी मारून हात धरला.

त्यासरशी घाबरून हंड्यावरचा हात सुटला आणि ती पूर्ण ओली झाली. लुगडे अंगाला चिकटले. त्यासरशी ती दोन्ही हातांनी स्वतः ला झाकू लागली.

" अरे, शरमाव मत| जरा हमे भी मजा आने दो|"
असे म्हणून त्याने पदराला हात घातला.

एवढ्यात.... सोsssssssss करत गोफणीतला दगड सुटला आणि ज्याने हात धरला होता त्याची कवटी फुटली.

त्यासरशी बाकीचे सावध झाले.

" कौन है? मर्द का बच्चा हो तो सामने आव |" शिपाई ओरडला.

तोवर आणखी दोन जण गारद झाले. तेवढ्यात त्यातील एकाने झाडावर लपलेल्या केशरला पाहिले. त्यांनी झाडाकडे धाव घेईपर्यंत आणखी दोघेजण गोफणीच्या दगडाने लोळवळे आणि केशरने खाली झेप घेतली.


"पकडो इसको,भरे बाजार मे निलाम करेंगे!" एक सैनिक ओरडला.

त्यासरशी दांडपट्ट्याचा वार झाला आणि त्याचे डोके धडापासून वेगळे झाले.

उरलेले तिघे झुंज देऊ लागले. केशरच्या दंडावर वार झाला. तेवढ्यात एकजण मागून आलेला पाहून पकडलेल्या दोघींमधील एकीने पाण्याने भरलेला हंडा त्याच्या डोक्यात घातला.

"मूडद्या, आमासनी पकडतो व्हय र. थांब डोसकच फोडते."

उरलेल्या दोघांना केशरने लोळवले.

त्यातील एकाच्या छातीत तलवारीचे टोक रोवून त्याच्या समोर उभी राहून केशर म्हणाली,"ह्या वाघिणीला केशर म्हणत्यात. आण तुझ्यासारख्या लांडग्यांना अशी फाडून खाते म्या."


केशरने तलवार पूर्ण त्याच्या छातीत रोवली आणि रक्ताची चिळकांडी तिच्या चेहऱ्यावर उडाली.

"आई काळूबाई, तूच धावून आलीस ग बाय." दोघी तिच्याकडे बघत म्हणाल्या.

"आई काळूबाई आपल्या आत हाय. सह्याद्रीच्या वाघिणी हायसा तुमी. पून्यांदा आस कुणी समोर आल तर?" केशर थांबली.

" तर कापून काडणार." दोघी एकदम बोलल्या.

तेवढ्यात केशरला आपल्याला उशीर झाल्याची जाणीव झाली. केशरने शिट्टी वाजवताच घोडा धावत आला. धावत्या घोड्यावर झेप घेऊन केशरने घोड्याला टाच मारली.


जिवाजी बाहेर आराम करत होते.

तेवढ्यात एक गोसावी दारात आला,"अलख निरंजन!"

"सगुणा दारात गोसावी आलाय. त्यासनी शिदा वाड." जिवाजी काकांनी आवाज दिला.

"व्हय,आईकल म्या. महाराजासनी जेवायला वाडू का इचारा." आतून आवाज आला.

तेवढ्यात केशर घाईने घरात शिरली.

" महाराज,गरिबाच्या घरचा परसाद गोड मानून घेणार का?" जिवाजी काकांनी विचारले.

तशी गोसाव्याने झोळी खाली ठेवली आणि चिलीम काढली. सगुणा पाणी घेऊन आली.

"महाराज,ही आमची लेक केशर. आवंदा हीच लगीन करावं म्हणतो आमी." सगुणा हात जोडून म्हणाली.

"काकू,काय सारख लगीन लगीन. म्या कामगिरीवर जाणार आन मग लगीन करणार." केशर ठसक्यात म्हणाली.

गोसावी गालात हसला. तेवढ्या वेळात त्याने झोळीत असलेला खलीता हळूच जिवाजी काकांना दिला.


गोसावी निघून गेला आणि मग जिवाजी म्हणाले,"केशर,गडावर निरोप घिऊन जाच हाय."

"तरीच म्या म्हणत व्हते एवढा दणकट गोसावी कूट आसतो व्हय." केशर खळखळून हसली.


काय निरोप असेल खलित्यात? केशरची इच्छा पूर्ण होणार का? शायिस्ताखानाला कसा धडा शिकवणार?
वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all