बेलभंडार भाग 8
मागील भागात आपण पाहिले की नाईकांनी त्यांच्या खास माणसांना कामगिरी दिली. केशर आणि खंडोजी पुण्याला पोहोचले. बिजली आणि गुणवंता दोघी आपापल्या मार्गाने कामगिरीवर सज्ज झाल्या. आता पाहूया पुढे.
ढोलकीवर थाप पडली आणि घुंगरू बांधून बिजली रंगमंचावर अवतरली. तिच्या डोळ्यातील मादक अदा कोणालाही घायाळ करायला पुरेशी होती. लावणी रंगात येऊ लागली. शृंगार नृत्यातून उधळला जाऊ लागला.
बिजली मात्र अजूनही अस्वस्थ होती. तेवढ्यात सकाळी आलेला तो इसम त्याचसोबत चार खाशा स्वाऱ्या घेऊन आला. त्यासरशी बिजलीने ढोलकीवाल्याला इशारा केला आणि जुगलबंदी सुरू झाली.
"जवळ सरकून बसा साजना
तुम्हासाठी राजसा केला गोविंद विडा.
कात पिरतीचा आन चुना इशकाचा
राया आज चाखून पाहू सांजला
चढला कैफ आन खेळ आज रंगला
जवळी घ्यावं,मला पुसाव गोडीन साजना.
ह्या दिलाचा सोडवावा आज पडला तिढा.
तुम्हासाठी राजसा केला गोविंद विडा."
बिजलीचे नृत्य,त्यातील सूचक हालचाली आणि लावणीचा बहार खेळाला नव्या उंचीवर घेऊन गेला. बिजली थांबली आणि कितीतरी वेळ शिट्ट्या, टाळ्या वाजतच होत्या.
नाच थांबला आणि बिजली आत गेली. तिने घुंगरू उतरवले.
"आम्हाला आत जायचं हाय." एकाने आवज दिला.
"आव पर,बाई कापड बदलत आसत्याल,जरा वाईच दम धरा की." दारावर उभा असलेला नाच्या नाजूक आवाजात बोलला.
"आर मग तर लई मजा यिल. कापड बदलताना. चल व्हय बाजूला." एकाने त्याला गचलला.
"पावण, सबुरीन. न्हायतर हितन परत जायचं वांद हुत्याल." सुभानने खंजीर काढला.
"आन रोखणार कोण? तू नाच्या?" सगळे फिदीफिदी हसू लागले.
तेवढ्यात बिजली बाहेर आली.
"सरकार, आव साक्षात महादेव अर्धनारी रुपात पुजतो आपून. मायबाप आत यावं."
बिजलीच्या मधाळ आवाजाने सर्वांना शांत केले.
बिजलीच्या मधाळ आवाजाने सर्वांना शांत केले.
राघोजी आणि त्याच्या चौकडीला बोलण्यात गुंतवून बिजलीने वाटेला लावले. परंतु छावणीत जायचा यायचा परवाना मिळावा हा शब्दही घेतला.
केशर आणि खंडोजी रात्री दोन कोपऱ्यात दोघे आणि मध्ये शंकर असे झोपले.
"शंकर,नीट झोप र बाबा. नवी जागा हाय." खंडोजी हसून बोलला.
केशर रागाने उत्तर देणार होती पण गप्प राहिली. खरतर कोणाचाही फडशा पाडणारी केशर काही गोष्टींना घाबरायची. तिचा आज्जा लहानपणी भुताखेतांच्या गोष्टी सांगायचा. त्यामुळे रात्र झाली की केशर वाघीण भित्रा ससा होत असे.
आताही बाहेर असणारे चिंचेचे झाड आणि त्याच्या सावल्या तिला घाबरवत होत्या. बिचारी तशीच पडून राहिली. नंतर कधीतरी तिचा डोळा लागला.
"खंडोजी,आर भाकऱ्या किती करू र?" शंकरचा आवाज ऐकताच केशर खाडकन जागी झाली.
पटकन अंगणात जाऊन चूळ भरली आणि आत आली.
"शंकर दादा व्हय बाजूला. जा तकड धारा काड. म्या करते सैपाक." केशर भरभर बोलत असताना खंडोजी हसत होता.
खंडोजी आणि शंकर दोघेही गावात काम शोधण्याच्या बहाण्याने पुण्यात शिरले. केशर दुधाची घागर घेऊन निघाली.
"पाखरू कंच्या गावच हाय म्हणायचं?"चौकीदार आडवे येत म्हणाला.
"दादा,तिकड पड्याल गावाला रहाते. दुध ईकायला जाच हाय." केशर जरा लागट हसली.
"आस,जरा मंग दुधाची चव आमासनी बगु दे." त्याची विखारी नजर तिच्या अंगावर फिरत होती.
तिने एका मोठ्या तांब्यात दूध ओतून दिले. त्यानंतरच त्याने केशरला जाऊ दिले.
केशर बाजारात आली. झेंडू,तुळस,गुलाब वेगवेगळी फुले आणि ताज्या हिरव्या भाजीपाला. धान्याचे ढीग, रंगीबेरंगी लुगडी,कुंच्या टोपडी, परकर पोलकी सगळा बाजार नुसता फुलून गेला होता.
एका टोकाला दही आणि दूध विकणाऱ्या बायका बसल्या होत्या. केशर एका ठिकाणी हंडा उतरवून बसली. दूध विकत असताना ती आजूबाजूच्या बायकांशी बोलत होती. इतक्यात सगळ्या बायका डोक्यावर पदर ओढून बसल्या.
"ये पोरी पदर फूड घे. त्या मुडद्यांची नदर पडली तर नेत्याल उचलून." शेजारची म्हातारी खेकसली.
केशरने गुपचूप पदर पुढे ओढला. तेवढ्यात पलीकडे बसलेल्या एका परकरी पोरीला त्यांनी उचलली.
"आज शरिफखानाला मस्त कवळी काकडी खाऊ घालू." त्यातील एकजण विकट हसला.
भर बाजारात पोर उचलली तरी कोणीच काही बोलले नाही. ते घोडेस्वार पुढे निघाले. इकडे केशरने राहिलेले दूध शेजारच्या बाईच्या हंड्यात ओतले आणि ती लगोलग बाहेर पडली.
"सोडा,मला जाऊ द्या. माजा बारका भाव आन भन वाट बगत आसल." ती ओरडत होती. त्याबरोबर ते चौघे हसत होते. तिला इथेतिथे हात लावत होते. त्यांनी बाजारातून बाहेर पडताच घोड्याला टाच मारली. घोडे वेगाने पळत होते. अचानक चारही घोडे मध्ये बांधलेल्या दोरीला अडकून कोसळले.
त्याबरोबर ते चौघेही खाली पडले. त्यांना सावरायला संधी द्यायच्या आतच त्याच्या डोक्यात वार करून झाडाला बांधले. इकडे ती थरथर कापत उभी होती. काय चालले आहे तिला काहीच समजत नव्हते.
तिला कोणी वाचवले असेल? बिजली पुढे काय करेल? केशर शरीफखानापर्यंत कशी पोहोचेल?
वाचत रहा.
बेलभंडार.
©® प्रशांत कुंजीर.
बेलभंडार.
©® प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा