रक्षाबंधन – नाते भाऊ बहिणीचे !
गावात एक खूप साधं पण प्रेमाने ओथंबलेलं कुटुंब राहत होतं.... घरात आई, वडील, मोठा भाऊ "शुभम" आणि त्याची लहान बहिण "सायली." शुभम आणि सायलीचं नातं म्हणजे गावभर आदर्श मानलं जात असे.... मोठ्या वयाचा असूनही शुभम बहिणीला बघूनच दिवसाची सुरुवात करायचा.... सायलीची हसरी नजर म्हणजे त्याचं भाग्य....
सायलीला शिक्षणाची विलक्षण आवड होती, पण गावात फक्त दहावीपर्यंतच शिक्षणाची सोय होती... पुढं शिकायचं म्हणजे तालुक्याच्या शाळेत जायचं, आणि रोज १२ किलोमीटर प्रवास करावा लागायचा.... घरची परिस्थिती बेताची.... आई-वडील म्हातारे झाले होते, शेती तुटपुंजी पण शुभम काही थांबला नाही....
“भाऊ, मी शिकायला शहरात जाऊ का?” सायलीनं संकोचून विचारलं....
शुभमने तिच्या डोक्यावर हात ठेवला, “सांजवेळी सूर्य मावळतो पण उद्याचा नवा दिवस घेऊन येतो... तू शिक.... मी तुझ्यासाठी काहीही करीन... ” शुभमच्या या वाक्याने सायलीचे मन भरून आलं...
सायलीचं शहरात शिक्षण सुरू झालं... शुभमनं स्वतःच्या सायकलवरून तिला रोज तालुक्याला नेणं-आणं करायला सुरुवात केली.... ऊन, पाऊस, थंडी – काहीही असो, त्याचा रस्ता कायम होता... कधी त्याचं अंग भिजलं, कधी चिखलाने सायकल घसरली, पण त्याने सायलीचं शिक्षण थांबू दिलं नाही....
सायलीसुद्धा खूप मेहनती होती... पहिल्याच वर्षी तिने पूर्ण जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक मिळवला...
“भाऊ, तू नसता तर मी काहीच झाली नसती... ” ती दररोज म्हणायची....
“अजून खूप काही व्हायचंय ग तुला.... माझं स्वप्न पूर्ण करायचंय...” – शुभम उत्तर द्यायचा....
सायलीनं बारावीपर्यंत गावात शिकून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला... आता शहरात हॉस्टेलमध्ये राहायचं होतं... खर्च, फी, राहणं, जेवण खूप गोष्टींची जबाबदारी शुभमवर पडली...
त्याने गावात छोटं वेल्डिंगचं दुकान टाकलं.... सकाळपासून रात्रीपर्यंत तो धूपात, धुरात, गंधकात काम करायचा... त्याचे हात काळे झाले, पण डोळ्यात आशेचा प्रकाश होता...
सायली दर महिन्याला घरी यायची पण एकदा आलेली सायली फारशी बोलली नाही.... चेहरा थोडा उदास वाटला....
शुभमने विचारलं, “सायली, काही झालंय का गं?”
ती थोडा वेळ गप्प होती, मग म्हणाली, “भाऊ... माझं एक स्वप्न आहे.... मी एकदा तरी मोठ्या स्टेजवर, लोकांसमोर स्पीच द्यावं... पण माझा आत्मविश्वास फार कमी आहे....”
शुभम थोडा वेळ शांत झाला.... मग हसून म्हणाला, “तू स्टेजवर उभी राहिलीस तर लोक उभं राहून टाळ्या वाजवतील... हे मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी आणि हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार....”
दुसऱ्याच महिन्यात गावात एक जिल्हास्तरीय महिला प्रोत्साहन परिषदेचं आयोजन झालं... विविध क्षेत्रात यशस्वी महिलांना व्याख्यानासाठी बोलावलं जाणार होतं... शुभमने आयोजकांशी संपर्क केला....
“माझी बहिण आहे. सायली....इंजिनिअरिंग शिकते... खूप संघर्ष करून इथपर्यंत आली आहे... तुम्ही तिचं नाव विचारात घ्याल का?” शुभमने विनंती केली....
आयोजक थोडा विचारात पडले पण त्याचा आत्मविश्वास पाहून त्यांनी संधी दिली...
सायलीला कळवलं तेव्हा ती हादरली...
“भाऊ, मला नाही जमणार रे! एवढ्या लोकांपुढं?” सायलीने थोड्या घाबरत उत्तर दिले...
शुभम म्हणाला, “तू आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवले आहे म्हणून त्या लोकांसमोर उभी राहायला पात्र आहेस... मी तुझ्या मागे आहे, विसरू नकोस....”
सायलीनं पूर्ण तयारी केली. . रात्री उशिरापर्यंत भाषण लिहिलं.... शुभम रोज तिची भाषण प्रॅक्टिस घेत होता... बाईसारखं बोलायचं, हावभाव सांभाळायचे, नजर स्थिर ठेवायची सगळं शिकवायचा...
शुभमचा डोळा पाणावला होता.... सायली स्टेजवर होती... तिच्या समोर गाव, तालुका, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, महिलांचा समूह....
“माझ्या आयुष्यात दोन गुरू आहेत एक आई आणि दुसरा माझा भाऊ.... मी आज इथे उभी आहे कारण त्यांनी मला चालायला शिकवलं आणि चालताना पडले तरी कुठून परत न डगमगता आपले पाऊल पुढे टाकायला शिकवलं...”
संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेलं...
शुभम मागच्या बाकावरून उठून टाळ्या वाजवत होता... त्याचे डोळे पाणावले होते, पण चेहऱ्यावर अभिमानाचं तेज होतं...
कार्यक्रमानंतर शुभम आणि सायली घरी परतले.... घरी आई-वडील वाट पाहत होते....
सायलीने शुभमला मिठी मारली आणि म्हणाली, “भाऊ, आज तू माझं स्वप्न पूर्ण केलंस...”
शुभम हसून म्हणाला, “आजपासून तुझं प्रत्येक स्वप्न माझं होणार आहे...”
सायली थोडीशी खजील झाली....
“पण भाऊ, मी आता मोठं काही करायचं ठरवलंय...” तिने सांगितले...
“काय?” – शुभमने विचारलं....
“माझं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर मी गावात एक मुलींसाठी शिक्षण देणारं संस्थान सुरू करणार आहे.... ज्यांना शिकायचं आहे पण मार्ग नाही, अशा प्रत्येक सायलीला दिशा देणार....” सायलीने आपल्या मनात असलेले विचार सगळ्यांना बोलून दाखवले...
शुभम काही बोलू शकला नाही... फक्त तिचं डोकं मांडीवर ठेवून म्हणाला, “तू माझं जग आहेस सायली... आणि तुझ्या डोळ्यांमधली स्वप्नं, माझा श्वास....”
सायली इंजिनिअर झाली.... शहरात मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पण तिनं सुरुवात गावात केली.... संस्थेचं उद्घाटन होतं..... प्रमुख पाहुणा म्हणून तिच्या गुरूला शुभमला बोलावलं...
“आज मी जी आहे, तिचं श्रेय कोणाला जातं हे सगळ्यांनी विचारलं तर मी फक्त एक नाव घेईन माझा भाऊ, माझं दुसरं आयुष्य, माझी सावली शुभम....”
पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.....
शुभम त्या दिवशी काही बोलला नाही, पण त्याच्या नजरेत एक अनोखी गोष्ट दिसत होती... त्या नात्याचा गाभा, जिथे कोणतीही अपेक्षा नव्हती होत ते फक्त निखळ प्रेम.....
एक बंध – जिथे शब्द कमी पडतात आणि कृती स्वप्न पूर्ण करतात.... जिथे भाऊ बहिणीसाठी फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी नाही, तर प्रत्येक दिवशी एक रक्षणाची जिवंत मूर्ती बनतो...
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा