Login

भूक...

भूक

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी


भूक

मी गाडी पार्क करून गाडीतून बाहेर पाय ठेवलाच होता, तेव्हाच माझ्या कानावर एक आवाज पडला.
"दादा दादा, दहा रुपये दे ना. खूप भूक लागली आहे."
एक चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा भीक मागत होता.

"चल हट..." त्याने त्याचे मळके हात माझ्या पॅंटला लावताच, मी जरा चिडूनच म्हटले.

त्याचे कपडे अतिशय घाण आणि फाटलेले होते. असे वाटत होते की, त्याने कितीतरी दिवस आंघोळच केली नसेल. त्याला पाहताच मला किळस आली.

"दादा... दादा, दहा रुपये दे ना. आज सकाळपासून काहीच खाल्ले नाही."

"ए... तुला एकदा सांगितलेले कळत नाही काय? निघ इथून. चोर कुठले." मी तोंड वाकडे करत त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि चालायला लागलो.

तिथेच असलेला एक माणूस माझ्याकडे पाहत होता.

"हल्ली हे भिकारी सगळीकडेच दिसत आहेत. तुम्हाला माहीत आहे, ह्या भिकाऱ्यांना पहाटे गल्लोगल्ली सोडण्यात येते. मग हे दिवसभर इकडे-तिकडे भीक मागत, चोऱ्या करत फिरतात." असे म्हणत त्या माणसाने माझ्या चिडण्याचे समर्थन केले.

"हो, माहीत आहे. म्हणून मी त्यांना जवळसुद्धा करत नाही. या भिकाऱ्यांना चोरीची इतकी भूक असते की, हे चोरी केल्याशिवाय राहूच शकत नाहीत." मी पण माझे मत मांडले.

मी तसाच नाश्ता करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेलो.

"गुड मॉर्निंग सर..." असे म्हणत, एक वेटर माझ्यापुढे मेनूकार्ड ठेवून गेला.

त्याने दिलेल्या मेनूकार्डवर मी ओझरती नजर टाकली आणि लगेच नेहमीप्रमाणे माझी भली मोठी ऑर्डर दिली. मी पोटासाठी कधीच तडजोड करत नाही, कारण माझ्यामते आपण जीवाचे रान करून जे कमवतो, ते आपल्या पोटासाठीच.

काही वेळाने एक वेटर माझी ऑर्डर घेऊन आला. भूक लागलेली असल्याने मी त्या गरमागरम पदार्थांवर लगेच तुटून पडलो.

"वेटर, बिल..." माझे पोट भरल्यावर मी वेटरला हाक मारली.

"सर, हे पार्सल करू का?" माझे काही पदार्थ उरले होते, ते पाहून टेबल साफ करण्यासाठी आलेल्या माणसाने विचारले.

"नाही, नको. थॅंक्स."

वेटर बिल घेऊन आला. बिलाचे पैसे देण्यासाठी मी पॅंटच्या मागच्या खिशात हात घातला, तेव्हा मला धक्काच बसला. खिशात ठेवलेले माझे वॉलेट तिथे नव्हते.

मी आजूबाजूला पाहिले. खाली कुठेच मला माझे वॉलेट दिसले नाही. मी खूपच गडबडलो. त्या वॉलेटमध्ये साडेतीन हजार 'कॅश' होती, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझे सगळे 'कार्ड्स' सुद्धा त्यातच होते, जे मला पैशांपेक्षा जास्त मोलाचे होते.

मला काय करावे ते समजेनासे झाले.

"वेटर..." मी एका वेटरला बोलावले.
"बोला सर..."
"इथे तुम्हाला एखादे वॉलेट वगैरे मिळाले आहे काय?" मी त्याला मोठ्या आशेने विचारले.
"नाही सर. पण पाहिजे तर तुम्ही कॅमेरा चेक करू शकता सर."
"प्लीज, तुम्ही जरा बघू शकता का? म्हणजे मला ते नक्की कुठे हरवले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. तोपर्यंत मी ऑनलाईन बिल पेमेंट करतो." असे म्हणत मी मोबाईलमधून बिलचे पैसे भरले.

हॉटेलच्या मॅनेजरने कॅमेरा फुटेज बघितले, पण मी रेस्टॉरंटमध्ये आत आल्यापासून ते बिल येईपर्यंत, कुठेच वॉलेट खाली पडल्याचे किंवा कोणीही काढल्याचे दिसले नाही.

मग अचानक वॉलेट गेले कुठे? असा प्रश्न माझ्या मनात आलाच होता, तेव्हाच मला त्या भिकाऱ्याची आठवण झाली. नक्कीच त्यानेच काढले असणार. ते चोर असेच असतात, भासवतात एक आणि करतात मात्र काही वेगळेच.
त्याने भुकेचे नाटक करुन, भीक मागण्यासाठी माझ्या पायांना धरले आणि दुसऱ्या बाजूने माझ्या नकळत खिशातून वॉलेट काढले.

माझ्या मनात संतापाची लाट उसळत होती. मी तसाच बाहेर आलो आणि आजूबाजूला बघितले, पण तो भिकारी मला दिसला नाही.

मी पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार करायची ठरवले. मला त्या चोर मुलाचा चेहरा नीट आठवत होता. मी त्याला कुठूनही सहज ओळखू शकत होतो.

मी तसाच माझ्या गाडीजवळ आलो. मी गाडीचे दार उघडले होतेच, तोच...

"दादा, थांबा ना..." तो आवाज त्याच मुलाचा होता. मी पाठीमागे वळून पाहिले, तर खरेच तोच मुलगा होता.

त्याला पाहताक्षणीच माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. मी जाऊन त्याच्या गळ्याला धरणारच होतो, तोच त्याने माझे वॉलेट पुढे केले.

"चोर कुठला, तूच काढले होतेस ना?" मी मोठ्या आवाजात विचारले.

"नाही दादा, हे तुमच्या गाडी जवळ मिळाले. मला वाटते कदाचित तुम्ही गाडीतून उतरत असताना पडले असावे." त्याचे हे शब्द ऐकताच माझा राग अचानक शांत झाला.
मी पाकीट उघडून पाहिले. पाकिटामधली एकही नोट कमी झालेली नव्हती.

"साहेब, नीट बघा. मी त्यातला एक पण रुपया काढलेला नाही." हे ऐकून मलाच माझी लाज वाटायला लागली.

तो जायला वळला, तोच मी त्याला हाक मारली.

"ए मुला, थांब."

तो थांबला.

"हे घे." असे म्हणत मी त्याला वॉलेटमधल्या पाचशेच्या दोन नोटा दिल्या.

"दादा, हे काय?"

" भूक लागली आहे ना? काहीतरी खा. मी तुला हे पैसे भीक म्हणून नव्हे, तर बक्षीस म्हणून देत आहे." असे म्हणत मी गाडीत बसलो.

समाप्त
0