चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
मनाचा मोठेपणा
"ताई तुम्ही पुढच्याच आठवड्यात जाणार का? तुम्ही गेल्यावर मला अजिबात करमणार नाही. तुमच्या घराकडे लक्ष गेलं की तुमची खूपच आठवण येईल."
"हो गं कमल! असं अचानक उठून दुसरीकडे रहायला जायचं आम्हाला पण खरंतर पटत नाही पण कायं करणार इथे आता पाण्याचा खूपच प्रश्न निर्माण झाला आहे. कोण आलं गेलं की खूपच पंचाईत होते. मला पण तुझी फार आठवण येणार. तिथे दुसरी मदतनीस कशी मिळेल कोणास ठाऊक. तू अगदी आमच्या घरच्या सारखीच झाली आहेस."
"इथे जवळपास कुठे असतं ना ताई तर मी नक्कीच आले असते."
मनाली आणि तिच्या कुटुंबियांना पुढच्याच आठवड्यात आपलं राहतं घर बदलून दुसऱ्या नवीन जागी राहायला जायचं होतं. खरंतर इथे गेली अनेक वर्ष ते राहत होते. त्यामुळे शेजारी आणि इतर सर्वच सवयीच्या गोष्टी सोडून दुसरीकडे जाणं म्हणजे थोडं त्रासदायकच होतं. आताच्या घरी सध्या पाण्याचा प्रश्न खूपच बिकट झाला होता म्हणूनच त्यांनी नवीन जागा घेतली होती. इतर सर्व ठीक होतं परंतु नवीन जागेत आपल्याला चांगली मदतनीस बाई कामाला मिळेल की नाही हीच एक चिंता मनालीला सतावत होती.
गेली अनेक वर्ष म्हणजेच मनालीच्या लग्नाआधीपासूनच सावंतांकडे कमल मदतनीस म्हणून कामाला येत होती. त्यावेळी ती वीस बावीस वर्षांची होती. ती अतिशय विश्वासू तर होतीच शिवाय तिला कधीही कुठलचं काम सांगावं लागलं नाही. अगदी पडेल ते काम स्वतःहून करायची. इतकंच कायं घरात कोणाला बरं नसलं तर हिचा जीव वरखाली व्हायचा. मग त्याच्यासाठी काहीतरी घरगुती औषध बनवून द्यायची. गावी जाईल तेव्हाच तिची सुट्टी असायची. तिला सांगावे लागायचे की बाई तू कधीतरी सुट्टी घे. तिचं एकच पालुपद असायचं घरी बसलं की अंग दुखायला लागतं. ऐकावे ते नवलच! मनाली पण अगदी सढळ हस्ते वरचेवर तिला आणि तिच्या मुलांना काहीबाही द्यायची.
अखेर एका सुमुहूर्तावर मनाली नवीन जागी रहायला आली. मनालीने शेजारीपाजारी विचारून दोघी तिघींना कामासाठी येऊन जायला सांगितले. त्यांच्या "नियम आणि अटी" मनालीला परवडण्यासारख्या नव्हत्या. एकीचा कारभार तर अगदी एखाद्या कार्यालयापेक्षा पण कडक शिस्तीचा वाटत होता. अमुक वाजेपर्यंत होतील तेवढीच भांडी ती घासून जाणार वगैरे. त्यानंतर अजून एक जण मनालीकडे आली. ती तशी चुणचुणीत आणि सावळी पण हसऱ्या चेहऱ्याची होती. तिचं नाव होतं कुंदा. कुंदाने रीतीप्रमाणे सर्व चौकशी केली म्हणजेच तुमच्या घरी माणसं किती. काम कायं करायचं त्यानुसार ती किती पैसे घेणार ते सांगणार होती.
"हे बघा कुंदाताई आमच्या घरी आम्ही सध्या तीनच माणसं आहोत. केर, लादी पुसणे आणि भांडी एवढं आमचं काम करायचं आहे."
"अहो ताई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात मला फक्त कुंदाच म्हणा. भांडी दोन वेळची असतील ना."
"हो दोन वेळची भांडी असतील पण मी सगळी नीट स्वच्छ करून ठेवेन."
"इथे प्रत्येक कामाचे हजार रुपये घेतात ते सुद्धा किती माणसं आहेत ते पाहून. तुमच्या भांड्यांचे मी आठशे प्रमाणे घेईन आणि लादीचे हजार रुपये. महिन्याचे एकूण दोन हजार सहाशे रुपये द्या तुम्ही मला."
"ठीक आहे मी तुला अडीच हजार रुपये देईन तू येत जा उद्यापासून."
त्यानंतर ती रोज मनालीकडे येऊ लागली. कुंदा खूप बडबडी होती. स्वतःबद्दल आणि कुटुंबाबद्दल रोज काही ना काही सांगायची. तिचं आयुष्य खूप कष्टप्रद आणि अडचणींनी भरलेलं असं होतं. नवरा हे जग सोडून गेला होता आणि पदरात दोन मुलं होती. मुलगी अठरा वर्षाची आणि मुलगा बावीस वर्षांचा. तिच्या डोक्यावर नवऱ्याचं बरंच कर्ज होतं. मुलगा नोकरीला होता पण आईला एक कवडी सुद्धा द्यायचा नाही. तिला वाटेल तसं बोलायचा. मनालीला या गोष्टीचा खूप राग यायचा. ती कुंदाला सांगायची तू एकदा त्याला माझ्याकडे घेऊन ये मी त्याला समजावून सांगेन. ती म्हणायची ताई तो कोणाचंच ऐकत नाही. मुलगी बिचारी शिक्षण सांभाळून दोन पैसे मिळवायचा प्रयत्न करत होती. लग्नसमारंभात कधी केटरर्सच्या ग्रुप मध्ये जायची तर कधी प्लास्टिकचे छोटे भाग आणून ते जोडून द्यायची. आईला अशी थोडीफार मदत करायची. कुंदाची स्वतःची तब्येत पण खूप बरी नसायची. तरीही चेहऱ्यावर हास्य कायम.
मनालीला सवय होती की चहाची भांडी, लहान काचेची भांडी, वाट्या ती स्वतः घासून ठेवायची. कुंदा मनालीला सांगायची की ताई तुम्ही सगळी भांडी ठेवा कशाला घासता. अशा या बोलघेवड्या कुंदाला महिना झाल्यावर पगार द्यायची वेळ आली तेव्हा मनालीने तिच्या हातावर अडीच हजार रुपये ठेवले. कुंदाने ते हातात घेतले आणि त्यातले पाचशे रुपये मनालीला परत दिले. मनाली पाहतच राहिली तिला वाटलं कुंदाला अजून जास्त पैसे हवेत की कायं. मनालीच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह कुंदाला कळलं आणि ती लगेच म्हणाली,
"ताई मी तुम्हाला अडीच हजार सांगितले खरं पण तुमची दोन वेळची भांडी सुद्धा जास्त नसतात. बाकीच्या घरांमध्ये चांगली सिंक भरून भांडी असतात. तुमच्या एवढ्याशा भांड्यांसाठी एवढे पैसे घेणे मला बरं वाटत नाही. तुम्ही मला दर महिन्याला फक्त दोनच हजार रुपये द्या."
"अगं काहीच हरकत नाही मी अडीच हजार तुला द्यायला तयार आहे. मला परवडते आहे काही काळजी करू नकोस. तुला स्वतःला पण किती अडचणी आहेत, कर्ज आहे उगाच तू पैसे कमी नको करूस."
"नाही ताई माझ्या मनाला अजिबात पटत नाही. मला लागतील तेव्हा मी तुमच्याकडून मागून घेईन पण मला पगार दोन हजार रुपयेच देत जा."
मनालीला तिच्या या मनाच्या मोठेपणाचं खूपच आश्चर्य वाटलं. स्वतःच्या एवढ्या अडचणी, कर्ज, मुलगा बेजबाबदार, तब्येत बरी नसणे या सर्व गोष्टींना महत्त्व न देता तिने स्वतःच्या प्रामाणिकपणाला जपलं. वर्षाकाठी सहा हजार रुपयांचं तिने स्वतःचं नुकसान करून घेतलं. खरंतर तिच्या दृष्टीने ही मोठी रक्कम होती. या आजच्या व्यवहारी जगात जिथे मोठमोठी श्रीमंत माणसे ज्यांच्या झोळ्या ओतप्रोत भरल्या आहेत, ते सुद्धा आपल्याला फुकट मिळालेले पैसे कधी परत करत नाहीत. तीच ही गरीब कुंदा मनाचा इतका मोठेपणा दाखवू शकते. आजच्या या कलियुगात अशी व्यक्ती सापडणं फार दुर्मिळ आहे. "नियमानुसार काम" असं धोरण असणाऱ्या ह्या मदतनिसांच्या कळपामधली कुंदा जगावेगळीच म्हणावी लागेल. मनालीला कशी मदतनीस मिळेल ह्याची काळजी होती. खूप चांगल्या स्वभावाच्या मनालीला मदतनीस पण छानच मिळाली. मनालीने हिलासुद्धा सढळ हाताने मदत करायचं ठरवलं. शेवटी कसं असतं ना "पेरावे तेच उगवते".
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा