Login

पहिलं भाडं! भाग १

माझं पहिलं भाडं... माझी पहिली शिकवण...
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद लेखन

पहिलं भाडं! भाग १

©® एकता माने

सकाळी सूर्य नुकताच आकाशात कोवळे ऊन पसरवत होता. गावाच्या रस्त्यांवर अजूनही धुक्याचे सावट पसरले होते. पंधरा वर्षांचा दीपक आज खूप उत्साहात होता. दीपकला आपल्या वडिलांची रिक्षा चालवण्याची भारी हौस होती. वडील रिक्षा ठेवून गेले की, तो एकटाच आपल्या घराच्या समोर असलेल्या अंगणात त्यावर बसून चालवायला शिकत होता. त्याच्या वडिलांनाही त्याची ही हौस समजली होती. त्याचे वडीलही त्याला काही बोलत नव्हते.

"दीपक, आज तू गॅरेजला रिक्षा घेऊन जा. नीट, सावधपणे चालव. रस्ता सरळ आहे. लक्ष दिलंस तर जमेल. मी गॅरेजवाल्याला सांगून ठेवले आहे. तसेही मला थोडे दुसरे काम आहे, त्यामुळे तुला सांगत आहे." वडील सकाळी त्याला सांगत होते.

"हो बाबा, काळजी करू नका. मला आता व्यवस्थित चालवता येते आणि मी घेऊन जाईन." दीपकने आत्मविश्वासाने उत्तर दिले.

खरंतर तो अजून शाळेत होता, दहावीत शिकत होता; पण घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील दिवसभर रिक्षा चालवून संसार निभावत. आई शिवणकाम करत होती. लहान बहीण अजून शाळेतच होती. त्यामुळे दीपकला पण घरची जबाबदारी थोडी थोडी जाणवत होती.

आज पहिल्यांदा तो एकटा रिक्षा घेऊन बाहेर पडत होता. पाय ब्रेकवर ठेवून ब्रेक दाबायला त्याची थोडी ओढाताण होत होती. हात घट्ट स्टेअरिंगवर ठेवून तो सरळ रिक्षा चालवत होता.
मनात मात्र एक वेगळाच आनंद होता, 'आज मी बाबांसारखा रिक्षा चालवत आहे!'


गावाबाहेरच्या रस्त्यावरून तो गॅरेजकडे चालला होता. अचानक समोरून एक माणूस हात दाखवत थांबवू लागला.

"अरे, मला स्टेशन रोडवर सोडशील का? तिकडे जाण्यासाठी किती भाडं घेतोस?" तो माणूस विचारत होता.

"तुम्ही रोज तिकडे जाण्यासाठी किती भाडे देता?" दीपकने थोड्या घाबरलेल्या मनाने त्यांनाच उलट प्रश्न विचारला.

"मलाही काही अंदाज नाही बघ. मी नेहमी माझ्या गाडीनेच येत असतो; पण आज जरा घाई होती म्हणून गाडी घेऊन आलो नाही. तरीही मी तुला तिकडे घेऊन जाण्याचे दोनशे रुपये दिले तर चालेल का?" त्या माणसाने सहजपणे त्याच्याकडे पाहून त्याला विचारले.

दीपक थोडा घाबरला. त्याच्या आयुष्यातलं पहिलं भाडं! तो अजून खरंतर भाडं घेण्याच्या वयात नव्हताच; पण आज परिस्थिती वेगळी होती. तरीही एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह त्याच्या मनामध्ये भरला होता. आपल्या आयुष्यात आपण पहिल्यांदाच कमावले ते पण एकाचवेळी एवढे पैसे, या सगळ्याचा विचार करून त्याच्या मनात असलेली कॉन्फिडन्स लेव्हल वाढू लागली.

"हो, बसा." तो पटकन म्हणाला.

माणूस बसला. रिक्षा पुढे निघाली. दीपकच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याला वाटत होतं,
'आपणही आपल्या आयुष्यामध्ये पैसा कमवू शकतो आणि आपल्या वडिलांची मदत करू शकतो.'

त्या माणसाने साधा पांढरा शर्ट-पॅन्ट घातलेला होता. थोडा दमलेला दिसत होता.

"तू रिक्षा चांगली चालवतो; पण तुझे वय कमी वाटत आहे." त्या प्रवाशाने मागे बसूनच निरीक्षण करत विचारले.

"ते... ते... असे काही नाही." दीपकला त्यांच्या बोलण्याचं काय उत्तर द्यावे ते समजत नव्हतं. भीतीने त्याच्या हृदयाची धडधड तर वाढत होती; पण पैसे मिळणार म्हणून तो स्वतःला धीर देत होता.

काही वेळातच त्याने सांगितलेली जागा आली आणि दीपकने आपली रिक्षा तिकडे थांबवली. तो माणूस त्याच्या रिक्षामधून खाली उतरला आणि दोनशे रुपयाची नोट त्याने दीपकच्या हातावर टेकवली.

क्रमशः
©एकता माने
0

🎭 Series Post

View all