Login

माझी सफर

त्या विधत्याला मला जन्माला घातल्या नंतर काय हे केलं मी बोलून कपाळावर हात मारला असावा. कारण तो त्यानंतर त्याने केलेली चूक निस्त्ररतोय. माझ्या उपद्व्यापी उद्योगात मला जिवंत ठेवणं एवढंच काम बिचाऱ्याला राहिलय. माझ्या अश्याच एका पराक्रमाची गाथा इथे तुमच्या सोबत शेअर करतेय
#अनुभव

प्रत्येकालाच वाटत असतं की आयुष्यात एकदा तरी चित्तथरारक अनुभव वाट्याला यावा आणि महत्वाचं म्हणजे तो याची देही याची डोळा सांगता यावा.मीही याला अपवाद नाही. अर्थात अश्या थरारांची होम डिलिव्हरी व्हायची वाट बघण्याचा माझा पिंड नाही हे मला जवळून ओळखणाऱ्यांना सांगणे न लगे. माझ्या रक्तात त्या विधत्याच्या असिस्टंटने थोडा अती-आत्मविश्वास, थोडा आगावूपणा, थोडा वेंधळेपणा आणि हे कमी होत म्हणून की काय थोडा अताताईपणा सुध्दा मिक्स केला. (आता लोकांच्या एव्हढ्या व्हरायटी द्यायच्या तर बिचारा स्वःता विधाता कुठे कुठे पुरा पडणार त्याच्या हाताशी पण एखादा कामचुकार असिस्टंट असावा नाही तर असे नमुने थोडीना जन्माला आले असत. त्या परमेश्वराचे लक्ष नाही बघूनच अशी गडबड करत असावा तो असिस्टंट, नाही तर सगळेच नसते का परफेक्ट जन्मले. )असो तर मुद्दा असा की या अती-आगावू देहाला संकटाची वाट पाहायची गरज भासत नाही, मी माझ्या (अती) आत्मविश्र्वासाच्या बळावर खूपदा डायरेक्ट देवलोकात फ्लाइंग विजिट मारून आलेली आहे.
काही वर्षा पूर्वीची गोष्ट आहे, माझं सयामला जाणं झालं.( ज्यांनी पुलंचं पूर्वरंग वाचलं नाही आणि शाळेत भूगोलाच्या तासाला झोपा काढल्यात त्यांच्यासाठी सयाम म्हणजे तुमचं, आमचं थायलंड हो. आता थायलंडला गेले होते म्हटल तर उगीच तुमच्या भुवया उंचवतील म्हणून सयाम म्हटल. ) आम्ही आमच्या मूळ स्वभावाला धरून सगळी ' प्रेक्षणिय ' स्थळ वगळून थायलंड च्या कोह-सामेत या बेटावर एका रिसॉर्ट मध्ये जायचं ठरवलं. तिथल्या लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र वाळूत उनाडून आणि निळसर पाण्यात यच्छेद डुंबून झाल्यावर थोडी पाण्याखालची मुशाफिरी करायचं ठरवलं. या बाबतीत माझे आणि माझ्या नवऱ्याचे अगदी ३६ गुण (की अवगुण)जुळतात. आम्ही दोघंही सरळ सोपा धोपट मार्ग सोडून जिथे अगांग धोपटून निघेल असे मार्ग अवलंबतो. दुसऱ्या दिवशीच सकाळची snorkeling ची टूर फिक्स केली. ( पोटावर तरंगत डोळ्यावर गॉगल्स आणि श्वास घ्यायचा पाइप तोंडात पकडुन डोकं पाण्याखाली घालून पाण्याखालची दुनिया बघायची असते) भल्या पहाटे स्पीड बोट मध्ये दिवसभराच्या सागरी सफरीला निघालो. त्या बोटवल्याने निघताना प्रत्येकी एक लाईफ जॅकेट,एक snorkeling kit आणि हा सगळा ऐवज शेवटपर्यंत नीट सांभाळण्याची तंबी दिली. आमची स्पीड बोट समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांवर उधळलेल्या वारुगत निघाली. आम्ही आणि आमचे सहप्रवासी उसन अवसान आणून बोटीच्या हाताला लागलेल्या भागाला पकडुन स्वतःच बुड सीट वर टिकून ठेवायच्या प्रयत्नात होतो. पहिला स्टॉप होता एका छोट्या बेटाच्या किनाऱ्यावर, कंबरभर पाण्यात आम्हाला लाईफ जॅकेट आणि snorkeling kit सकट उतरविण्यात आल. जो तो पाण्यावर तरंगत समुद्राच्या तळाला असलेली दुनिया अनुभवत होते आणि इथे मी...मला पाण्याखाली एक इंचही न जावू देण्याचं व्रत घेतलेल्या लाईफ जॅकेट सोबत घामाघूम होत, कंबरभर पाण्यात जलचर शोधत होते. त्यात आमच्या सहा वर्षीय चिमुरडीवर एक जलचर जास्तच खुश झाला आणि त्याने तिच्या एका गालाला हलकासा गालगुच्चा दिला. नशीब चांगलं की फार काही नव्हतं पण ते तिला असहकार पुकारायला पुरेस होत. स्वतःचा मेंदू शांत ठेवत माझ्या लेकीला समजवण्यात माझ्या नवऱ्याचा हातखंडा असल्याने मी ती जवाबदारी अगदी आनंदाने त्याला देवू केली.तिची भीती आणि राग कमी करायचे त्याचे प्रयत्न चालू होते. काही वेळात आमची बोट पुढल्या प्रवासाला निघाली. मी ठरवून टाकलं होत पुढच्या स्टॉपला लाईफ जॅकेट शिवाय उतरायचं. मला चांगलं पोहोता येत होत. अर्थात माझा अनुभव म्हणजे गावाला गेलो की घराच्या मागच्या नदीत यच्छेद डुंबायच आणि दर पाच मिनिटांनी पाय जमिनीला टेकवत पोहायच. माझ अख्ख बालपण अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी गेलं. पण आमचा अलिबागचा समुद्र मुळातच प्रेमळ तो आम्हाला थेट त्याच्या पोटात गड किल्ले बांधायचं आणि त्या गडकिल्ल्यापर्यंत डुलत-डुलत जायचं परमिट देतो त्यामुळे भर समुद्रात गटांगळ्या खायचं भाग्य माझ्या वाट्याला अजून तरी आल नव्हतं.
दुसऱ्या एका छोटुश्या बेटाला वळसा घालून आमची बोट त्या बेटाच्या पोटात शिरली. निळाशार समुद्रात दिमाखात उभा असलेला तो हिरवागार डोंगर आणि मुख्य म्हणजे त्याच्या पायाशी पसरलेले शंख शिंपले एखाद्या नव्या नवरीने हिरव्याकंच शालुवर दिमाखात मोत्याचा हार मिरवावा तसे दिसत होते. आमच्या बोटीने किनाऱ्यापासून काही फर्लांग अंतरावर नांगर टाकला. बोट थांबल्या बरोबर बोट मालकाने डायरेक्ट डेक वरून पाण्यात अप्रतिम सुर मारला आणि एक मजबूत दोरखंड बोटीपासून किनाऱ्या पर्यंत खेचत नेऊन बांधला. प्रत्येक क्षणाला माझी उत्स्तुकता वाढत होती. सहप्रवाश्यांची आता बोटीच्या मागच्या बाजूला गर्दी झाली होती. बोटीचा मालक, बोटीला असलेल्या शिडीवरून एकेकाला पाण्यात उतरायला मदत करत होता. माझा नवरा, माझ्या लेकीला पाण्यात उतरण्यासाठी संमजावत आणि सजवत होता. माझी excitement बघून त्याने मला तू पुढे हो असा सिग्नल दिला. मग काय!! मी जवळ जवळ पळतच बोटीच्या मागल्या बाजूकडे धावले. पण अजूनही चार पाच माणसं रांगेत होती, एवढा माझा धीर कुठला निघायला. मी snorkeling kit मधले गॉगल्स डोळ्यावर चढवले, श्वास घ्यायचा पाइप तोंडात पकडला आणि बोटीच्या मालकाच्या स्टाईल मध्ये डेक वरून पाण्यात सुर मारला.
छै-छपाक!!!
पुढल्या क्षणी मला माझी चूक लक्षात आली. एक तर मी लाईफ जॅकेट शिवाय उडी मारली होती, ती पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता आणि घोडचूक म्हणजे snorkeling kit घालून. त्याच काम पाण्याखाली काही फूट जाण्याचं असतं खोल पाण्यात डायविंग साठी नाही. श्वास घ्यायच्या पाइप मधून पाणी यायला लागलं आणि मला छातीत धडधडायला लागलं. गॉगल्स मुळे मला पाण्याखाली स्पष्ट दिसत होत पण पायाखाली काळाकुट्ट अंधार होता न जाणो समुद्राचा तळ किती खोल होता... माझ्या अचानक एन्ट्री ने सुरवातीला दचकलेली ती तमाम रंगबेरंगी जनता, आता हा कोण नवा प्राणी म्हणून माझ्या जवळून आरामात पोहत जावू लागले. मी वर यायला जेव्हढे हातपाय मारायला लागले तेव्हढ पाणी तोंडात जावू लागल. मला समोर यमाचा रेडा दिसायला लागला पण तितक्यात त्या गॉगल्स च्या कृपेने मला पाण्याखाली आलेली आमच्या बोटीची शिडी दिसली. मी पाण्यावर यायचा निष्फळ प्रयत्न सोडून शिडिकडे झेपावले. त्याची दांडी घट्ट पकडुन एकदाची पाण्यावर आले. snorkeling kit काढून एकदाचा मोकळा ( खोकत खोकत ..) श्वास घेतला आणि आमची गाडी पृथ्वीलोकात परतली. हा काही मिनिटाचा सगळा प्रकार बोटीच्या मालकाला लक्षात आला असावा त्याने माझी काखोटी पकडुन मला बोटीवर ढकलल. तो अगम्य अश्या थाई भाषेत माझा समाचार घेत होता त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभवावरून तो माझ्या साहसाच कौतुक नक्कीच करत नव्हता. मला थाई भाषा येत नाही याचा पहिल्यांदाच मनापासून आनंद झाला. मी तत्परतेने लाईफ जॅकेट चढवल. त्यामुळे त्याचा आत्मा शांत झाला आणि तो परत ड्यूटी वर हजर झाला. माझा नवरोबा अजूनही लेकीला समजण्यात गुंग असल्याने माझं फावल. मी साळसूदपणे त्यांच्या शेजारी जावून उभे राहिले. आणि या खेपेस मात्र अगांवर चढवलेली सर्व आयुध जागेवर ठीकठाक आहे ना हे चेक करून शिडीच्या आधाराने सावकाश पाण्यात उतरले.पूर्ण वेळ मी दोरखंडाच्या आजुबाजूलाच का पोहतेय याच नवऱ्याला आश्चर्य वाटत होत पण मीही मुक्कामाच्या जागेवर पोहोचेपर्यंत अळीमिळी गुपचिळी ठेवली.त्याला माझं धाडसी कृत्य कळल्यावर त्याने त्याच्या परीने माझा खरपूस समाचार घेतलाच. आता या अनुभवातून मी काही धडा घेतला असेल तर हाच की लाईफ जॅकेटच कामच तुम्हाला पाण्यावर तरंगत ठेवण्याचं असतं त्यामुळे त्याला त्याच काम करू द्यावं उगीच त्यावर राग काढून त्याचा त्याग करू नये.कितीही आत्मविश्वास असला तरी झेपेल तेव्हढीच उडी मारावी कारण तुम्ही उडी जरी खाली मारत असाल तरी ती तुम्हाला डायरेक्ट वरच तिकीट देवू शकते... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थायलंड च्या समुद्राच पाणीही तेव्हढ च खारट आहे जेवढं आपल्या समुद्राच.. शेवटी काय वसुधैव कुटुंबकम हेच खर..

तुमचीच चुकांमधूनही न शिकणारी

हर्षु