Login

मिस्टेकन आय डेंटिटी भाग १. बसस्टॉप

बसस्टॉप वर खून झाला. कोणाचा?
मिसटेकन आयडेंटिटी
भाग १ बसस्टॉप
नाशिक पुणे रोड वरचा एका बसस्टॉपवर एक मुलगी बस ची वाट बघत उभी होती. जरा विचारमग्नच होती. बस यायला अजून थोडा वेळ होता. एका बाइक वरुन दोघं जण आले आणि त्या बसस्टॉप समोर थांबले. एक पाठीमागे जो बसला होता तो उतरला. समोर असलेल्या दांडया वरुन उडी मारून तो त्या मुली समोर आला आणि त्याने खिशात ठेवलेला मोठा सुरा काढला आणि सपासप आडवे तिडवे वार त्याने मुलीवर केले. तिच्या गळ्यावर आणि पोटात मोठ्या जखमा झाल्या एक मोठी जीवाचा थरकांप उडवणारी किंकाळी आसमंतात घुमली आणि ती मुलगी क्षणार्धात खाली कोसळली. बसस्टॉप वर अजून दोघे उभे होते, त्यांच्या हातांपायातलं त्राण गेल्यासारखं ते थिजून उभेच राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना. मारेकरी खाली वाकला. त्याने आणखी वार करून मुलगी मेली आहे यांची खात्री केली. त्या मुलीच्या खांद्यावर असलेली पर्स खेचून घेतली आणि तो उडी मारून बाहेर आला. बाइक चालूच होती. बाइक वर बसून कमालीच्या वेगाने दोघेही फरार.
ते निघून गेल्यावर मग बसस्टॉपवरच्या दोघा जणांना भान आलं आणि त्यांनी आरडा ओरडा करायला सुरवात केली. तोपर्यन्त समोरच्या दोन दुकान दारांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली होती ते पण धावत आले. ज्यांनी किंचाळी ऐकली होती ते पण आले. हळू हळू गर्दी वाढत गेली. कोणी तरी १०० नंबर फिरवून पोलिसांना खबर दिली. १० मिनिटांत पोलिस येऊन पोचले.
पोल प्राथमिक तपासणी केली. मुलीचा मृत्यू झाला होता. त्यांनी अॅम्ब्युलन्स बोलावली आणि फॉरेन्सिक लॅब ला फोन केला. मुलीच्या अंगावर तिची ओळख पटवणारी कुठलीच वस्तु त्यांना दिसली नाही. चौकशी सुरू झाली. पण कोणीच त्या मुलीला ओळखत नव्हतं. जे दुकानदार घटनेचे साक्षीदार होते, त्यांनी तिला कधीच पाहीलं नव्हतं. मग तो शिपाई आजूबाजूच्या इमारतींमध्ये चौकशीला गेले. तो कमर्शियल एरिया होता. दोन ऑफिस मध्ये कळलं की एक मुलगी नोकरीच्या शोधात आली होती, पण वेकन्सी नसल्या मुळे तिला नकार दिला. तिने तिचा बायोडेटा दिला होता पण तो आम्ही घेतला नाही असं दोन्ही ठिकाणी सांगितलं.
फॉरेन्सिक टीम चं काम झाल्यावर पोलिसांनी बॉडीला पोस्ट मार्टेम साठी पाठवून दिल.
इंस्पेक्टर शेंडे आणि PSI करपे झालेल्या घटनेवर पोलिस स्टेशन मध्ये चर्चा करत होते.
“मुलीची ओळख पटे पर्यन्त काहीच हालचाल करता येत नाही. कसं शोधायचं?”- करपे
“आपण एक काम करू शकतो. मुलगी २०-२२ वर्षांची असावी, नोकरी साठी गेली होती इथे आजू बाजूला कंपनी ऑफिस मध्ये चौकशी करा. मुलगी शिक्षित असावी. तुम्ही उद्या इथल्या सर्व कॉलेज आणि कोचिंग क्लास मधे जाऊन हा फोटो दाखवून चौकशी करा. माझा विश्वास आहे की मुलीची माहिती नक्की मिळेल.” – शेंडे.
संध्याकाळी सर्व टीम परत आल्या. अर्ध अधिक नाशिक पालथण घालून झालं होतं. कुठेही पत्ता लागला नव्हता. आता काय करायचं?
“उद्या उरलेल्या शाळा कॉलेज मध्ये बघा काही माहिती मिळते का?” – शेंडे.
दुसऱ्या दिवशीही नकार घंटाच वाजली. ही मुलगी कोण आणि नाशिकला कशा करता आली होती हा प्रश्न अनुत्तरित होता. बरं अशी काय दुश्मनी होती की तिचा सरळ खून व्हावा, मुलगी चेहऱ्यांवरून तरी साधी सरळ मार्गी दिसत होती. सगळेच चक्रावून गेले होते.
दुसऱ्या दिवशी पोस्ट मार्टेम आणि फॉरेन्सिक रीपोर्ट आला.
दोन्ही रीपोर्ट तसे नॉर्मलच होते, निष्कर्ष अति रक्त स्त्रावांमुळे मृत्यू. नंतर शरीरावरच्या घावांचे निरीक्षण आणि निष्कर्ष वगैरे नोंदवलेले होते. मुलीची ओळख पटण्यासाठी कुठलाही सुगावा पोलिसांना दिसला नाही. पण शेंडे साहेबांनी हार नाही मानली. ते विचार करत होते.
“करपे, आपण जाऊन एकदा बॉडी पुन्हा बघायला पाहिजे. चला” – शेंडे.
“साहेब फॉरेन्सिक वाल्यांनी सर्व बॉडी चेक केली आहे, आपण अजून काय बघणार आहोत?” – करपे.
“करपे, फॉरेन्सिक वाल्यांना फक्त रीपोर्ट द्यायचा होता. तो त्यांनी दिला. आपल्याला मुलीचा नाव गाव पत्ता शोधायचा आहे. त्याशिवाय खूनाचं कारण समजणार नाही आणि मारेकर्‍या पर्यन्त पोचता येणार नाही. आपलं मुख्य काम खूनी माणसाला जेरबंद करायचं हे आहे. चला.” - शेंडे.
बॉडी समोर उभे राहून शेंडे अतिशय बारकाईने निरीक्षणांची नोंद करायला घेतात. करपे लिहून घेतात.
“करपे बारकाईने बॉडीचे निरीक्षण करा, आणि तुम्हाला जी वैशिष्ठ्य आढळतील ती नोट डाऊन करा. यांच्यावरून काही क्लू मिळतो का ते बघू.” – शेंडे.
मग शेंडे साहेब आणि करपे यांनी बारकाईने बॉडी तपासायला घेतली, आणि निरीक्षणं नोंदवली. पोलिस स्टेशन मध्ये आल्यावर त्यांनी एक चार्ट तयार केला.
१. मुलगी निमगोरी असून चेहऱ्यावर एक हलकी तांबूस झाक आहे.
२. नाकपुड्या पातळ आहेत आणि नाक सरळ आणि थोडं लांबट आहे.
३. चेहरा लांबट गोल आहे. हलकासा ओषट आहे.
४. डोळ्यांच्या वरच्या भुवया नैसर्गिक आणि किंचित पातळ असून सरळ आहेत.
५. वरचा ओठ पातळ आहे आणि खालचा थोडा जाड आहे.
६. मुलीचे केस जाड आणि घट्ट बांधलेले आहेत. सैलसर एक शेपटा आहे.
७. पुढचे दोन दांत किंचित समोर आलेले आहेत.
करपे ऑ वासून साहेबांकडे बघतच राहिले. इतकं सारं विशेष आहे? असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. शेंडे साहेब कामाच्या बाबतीत कुठलीही कसर ठेवत नाहीत हे आता त्यांना सरावाने माहीत झालं होतं पण अशी निरीक्षणे घेतांना त्यांनी प्रथमच पाहिलं होतं. अर्थात ते सुद्धा शेंडे साहेबांच्या तालमीतचं तयार झाले होते. आणि या निरीक्षणात त्यांचा पण सहभाग होताच, तरी पण त्यांना आश्चर्य वाटलं.
“साहेब, हे सगळं काय आहे? या माहितीवरून आपण मुलीला कसं शोधणार? हे तर थोड्या फार फरकांनी सर्वच मुलींना लागू पडतं.” – करपे.
“करपे, आपण विदर्भातले, तुम्हीच सांगा, विदर्भातल्या मुलींचं नाक सडपातळ असतं का? थोडं जाड आणि रूंदच असतं. पुन्हा विदर्भात निमगोऱ्या मुली असतील पण कमीच. बाकी प्रामुख्याने सावळा रंगच.” – शेंडे.
“मग आता पुढची दिशा काय?” – करपे.
“आता मी उद्या ACP साहेबांना भेटायला जातो आहे. त्यांना अपडेट देतो आणि विनंती करतो की फॉरेन्सिक डिपार्टमेंटला विनंती करा की अश्या वर्णनांशी साधर्म्य असणाऱ्या स्त्रिया साधारण कुठे आढळतात ते शोधा. म्हणजे आपल्याला कळेल की मुलगी विदर्भातली आहे की माराठवाड्यातली की पश्चिम महाराष्ट्रातली. मग त्या नुसार शोध घेता येईल.” – शेंडे.
“साहेब, आपण विदर्भातले, चव्हाण कोल्हापूरचे, पाटील परभणीचे. आपण जर एकत्र बसलो आणि चर्चा केली तर किमान या प्रदेशातली ही मुलगी आहे की नाही यांचा अंदाज येऊ शकेल. फॉरेन्सिक वाले सांगतील तेंव्हा सांगतील, आपण वेळ का वाया घालवायचा? कदाचित आपल्यालाच धागा सापडेल.” – करपे.
“वा करपे तुम्ही तर सिक्सर मारली. मी ACP साहेबांना भेटून आल्यावर आपण तिघेही बसू. तुम्ही सर्वांना कल्पना देऊन ठेवा. किंवा असं करा, जर वेळ असेल तर चर्चा सुरूच करा. मी आल्यावर तुम्हाला जॉइन होतो.” – शेंडे.
शेंडे ACP साहेबांना भेटले. सर्व अपडेट दिलं आणि पुढची लाइन ऑफ अॅक्शन काय असणार आहे त्यांची पण कल्पना दिली. साहेबांना पण ती कल्पना पटली आणि त्यांनी गो अहेड असं म्हणून शेंडे साहेबांना राजा दिली.
संध्याकाळी ७ वाजता शेंडे साहेबांच्या केबिन मध्ये मीटिंग भरली. शेंडे साहेबांनी त्यांची आयडिया सर्वांना समजावून सांगितली आणि म्हणाले,
“लोंग शॉट मारतो आहे, बघा प्रत्येक जण प्रयत्न करून बघा. जर काही निष्पन्न निघालं, तर त्या मुलीचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेणं शक्य होईल.” – शेंडे.
सगळेच विचारात गढले. हे काहीतरी नवीनच होतं. जबरदस्त लॉजिक लावावं लागणार होतं. सर्वच जण आपापल्या ओळखीतल्या, नात्यातल्या स्त्रियांचे चेहरे, पेहराव डोळ्या समोर आणत होते.
सर्वात प्रथम चव्हाणच बोलले.
“माझ्या मते, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यातून बाद करावं.” – चव्हाण.
“पुष्टी करा. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे त्याची पुष्टी करा.” - शेंडे.
“सांगतो ना. मुंबई, पुणे कोल्हापूर वगैरे पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तोरा असतो. तो या मुलीच्या चेहऱ्यावर नाहीये. आणखी एक, ड्रेस सेन्स, या मुलीने जे कपडे घातले आहेत, त्यावरून असं वाटतं की ही बिचारी एका लहानश्या गावातून आलेली लोवर मिडल क्लास वर्गातली मुलगी असावी. कोकणच्या मुली तर खूपच वेगळ्या असतात. म्हणून हा भाग आपल्या चर्चेतून वागळावा. कारण त्यातून काहीच साध्य होणार नाही. आणखी एक म्हणजे या मुली मुंबई पुणे सोडून इतक्या दूर नाशिकला कशाला येतील? जर कोणाला भेटायला आल्या असतील, तर कोणीतरी मिसिंग ची तक्रार केलीच असती. यांचा अर्थ या मुलीचं इथे येण्याचं कारण वेगळच असावं. आणि ते घरच्या लोकांना माहीत नसावं.” – चव्हाण.

क्रमश:-----

दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all