Login

मुरांबा भाग 4

जुन्या मैत्रीच्या शोधाची एक मिश्किल विनोदी कथा


मुरांबा नावाची ही कथा लिहायला घेतली तेव्हा खरतर पूर्ण कथानक डोक्यात होत.त्यानुसार तीन भाग सलग पोस्ट झाले.त्यानंतर मात्र कोरोना घराच्या उंबरठ्यावर आला.त्या सगळ्या धावपळीत लिखाणाची लिंक तुटली.परत लिहायला घेतल्यावर कशी कोण जाणे ही कथा मागेच पडली.परंतु आज माझं प्रोफाइल पाहताना तिसऱ्या भागावर एक कंमेंट दिसली.नेक्स्ट पार्ट प्लिज!तेव्हा मात्र ठरवलं ही कथा पूर्ण करावी.वाचनाची लिंक लागावी म्हणून पहिल्या तीन भागांचा सारांश असा.
माधवराव देसाई निवृत्त न्यायाधीश.त्यांची पत्नी मालतीबाई आणि मधला मुलगा,सून व दोन नातवंडे असा परिवार.सी.ए. आर्टिकलशीप करत असलेली नात गौरी हिच्याशी माधवरावांच खास बॉंडिंग. एकदा गौरीचा मित्र सोहमच्या आजीने दिलेल्या मुरंब्यातून माधवरावाना त्यांची शालेय मैत्रीण कमल आणि तिच्याबाबत झालेला गैरसमज आठवला.त्यांनी कमलचा शोध घ्यायचं ठरवलं.तेवढ्यात सोहमच्या आजीला घरात अपघात झाला.त्याचवेळी मालतीबाईना त्यांच्या कॉलेजच्या मैत्रिणीला भेटायला जायचे असते.आता पाहूया पुढे.
माधवराव सोशल मीडियावर कमलला शोधायचे ठरवतात.खूप मित्र सापडले पण कमल सापडेना.शिवाय कमलबद्दल विचारणार कोणाला?
अशा विचारात ते असताना मालतीबाई ओरडल्या,"अहो!अहो ऐकलत का?"
माधवराव लक्ष मोबाईलवर ठेवून,"हा ऐकतोय,बोल काय काम आहे."
मालतीबाई परत म्हणाल्या,"अहो ती आमच्या वर्गातली देशमुख आहे ना."
माधवराव वैतागले,"कोण देशमुख?तिचं काय आता?"
मालतीबाई चिडल्या,"माझ्या मैत्रिणी कशाला आठवतील,स्वतःच्या वर्गातल्या पार बिगरीतल्या पाठ असतील."
माधवराव हसत म्हणाले,"बोल!काय झालं?"
मालतीबाई म्हणाल्या,"अहो ती देशमुख आजारी आहे असं या वसू ने कळवलं आहे.आपण जाऊ या का?
माधवराव वैतागले,"मला नाही जमणार,आता थोड्या वेळाने सदा येईल.मला बाहेर जायचंय."
मालतीबाई गौरीकडे वळल्या.तशी गौरी लगेच म्हणाली,"ये नाही हा आज्जी!मला अजिबात वेळ नाहीय,तू तुझ्या लाडक्या नातवला ने की."
मालतीबाई आता फारच चिडल्या,"गौरे!यांच्या बरोबर बरी उंडारायला जातेस ग."हे ऐकायला गौरी घरात नव्हतीच.
मालतीबाई शेवटी त्यांच्या लाडक्या रोहनला फोन लावला.रोहन अरे मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जायचं होतं.इकडेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ती.रोहन स्वतः डॉक्टर होता.आजीने हॉस्पिटलचे नाव सांगताच रोहन म्हणाला,"आजी मी दहा मिनिटात आलो घरी,तयार रहा."मालतीबाई बाहेर पडल्या आणि सदा आत आला.
सदा आल्याबरोबर त्याने काजूकतली काढली.माधव पण एकच तुकडा बर का.वहिनींना कळलं तर मला शिव्या बसतील.
माधवराव काजूकतली खात म्हणाले,"गप रे वहिनीच्या लाडक्या,काही होत नाही."माधवराव खात असताना सदाने विचारलं कमलचा काही तपास लागला का?माधवराव उदास होत म्हणाले,"नाही रे!आपल्या वर्गातली मुलच सापडतात फक्त सोशल मीडियावर, मुली नाहीतच."
सदा अचानक म्हणाला,"इंदुमती जोशी सापडली तर कमल सापडेल."
माधवरावांनी सदाच्या पाठीत जोरात थाप मारली,"सदा,तुला बरोबर लक्षात राहील रे,कमल इंदूमतीच्या शेजारीच रहायची."
सदा ओरडला,"हे सांगायला पाठीत थाप मारावी लागते."
दोघेही जोरात हसले.इंदूमतीला शोधणे फार अवघड नव्हते.तिचा भाऊ माधवरावांच्या संपर्कात होताच.सदा लगेच म्हणाला,"अरे मग तिच्या भावाला फोन लाव.त्याच्याकडून इंदुचा नंबर घे."
हे वाक्य गौरीने घरात शिरताना बरोबर ऐकलं.ती लगेच म्हणाली,"सदाआजोबा ही इंदू कोण?आजोबांची मैत्रीण का?की तुमची?थांबा आजीला सांगायला हवं."
माधवराव म्हणाले,"गौराबाई मग आम्हाला सुद्धा सोहमबद्दल सांगावे लागेल बरं!"
गौरी आजोबांच्या जवळ जात म्हणाली,"ये बात जमी नही।आजोबा लगेच रागावू नका.पण इंदू कोण?"
तेवढ्यात सदा म्हणाला,"गौरी अरे आम्ही आमच्या शाळेतील बॅचचे गेट टूगेदर करतोय.म्हणून सर्वांना संपर्क करतोय."
हे ऐकताच गौरी हसली,"काल आजी तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींना भेटणार म्हणाली तर किती उडवलीत तिची आणि आज...."
गौरी आत गेल्यावर या दोघांनी इंदुच्या भावाला फोन केला.पण इंदू सध्या अमेरिकेला गेली असून आठ दिवसांनी येणार आहे असे समजले.तिचा इथला फोन नंबर आणि पत्ता मात्र मिळाला.तेवढ्यात मालतीबाई परत आल्या.सदाला पाहून त्या हसून म्हणाल्या,"झाल्या का बायकांच्या कुटाळक्या करून."
सदा हसत म्हणाला,"वहिनी अहो मागे तरी जरा आमचा आवाज फुटू द्या."तेवढ्यात माधवराव म्हणाले,"भेटली का मैत्रीण?कशी आहे?"
‌मालतीबाई म्हणाल्या,"फार नाही लागलंय, बरी आहे.पण आमची ही मैत्रीण मुरांबा खूप छान बनवायची बरं".एवढं बोलून मालतीबाई आत गेल्या आणि जाता जाता या दोन्ही दोस्तांची दुखरी नस नकळत दाबून गेल्या.
मालतीबाईंची मैत्रीण आणि कमल यांचा काही संबंध असेल का?मैत्रीचा हा मुरांबा परत मुरेल का? पाहूया पुढील भागात.

मागील तिन्ही भाग ईरा वेबसाईट वर मुरांबा याच नावाने सिरीज मध्ये पाहू शकता.
0

🎭 Series Post

View all