त्या दिवशी सकाळची सुरूवात वेगळी नव्हती, पण सुनंदाच्या मनात काहीतरी वेगळं घडत होतं.
सकाळी ती कामावर गेली, तीन घरं लावून आली. थकलेलं शरीर, घामेजलेला ओढणीचा कोपरा, आणि एका हातात भाजीची पिशवी. दार उघडलं, तर सासूबाई बसूनच होत्या.
“कुठं उगवलीस आता? दिवसभर इकडं तिकडं भटकत असतेस. घराचं काही करत नाहीस,” असं म्हणून त्यांनी तोंड वाकडं केलं.
सुनंदाने काही उत्तर दिलं नाही. भिंतीकडे बघत स्वयंपाकघरात गेली. गॅस संपलेला होता. मुलांना दूधही देता आलं नव्हतं सकाळी.
शेजारच्या काकूंनी दिलेल्या दोन पोळ्या आणि सुकटाचं भाजीचं लहानसं भांडं – एवढंच होतं.
तेवढ्यात तिचा नवरा रामू घरी आला. पूर्णपणे नशेत.
दरवाजा जोरात लाथ मारून उघडला, आणि ओरडत म्हणाला,
“आज पाण्यात काय घातलंस गं तू? डोकं दुखतंय. काहीतरी करत असशील, जादूटोणा!”
“मी असं काही करत नाही,” ती हळूच म्हणाली.
“अगं, मारून टाकीन तुला एके दिवशी, असं काही केलंस तर!” आणि हात उगारून तिला ढकललं.
ती पायऱ्यांवर आदळली. आतून मुलगी साक्षी धावत आली. “आई! आई!” म्हणत ती आईच्या पोटावर बिलगली.
पाठीमागून मुलगा रोहित धावत आला. “बाबा! आईला मारू नको!” तो लहानसा हात उंचावून वडिलांपुढे उभा राहिला.
रामूने रागाने त्याच्यावर डोकावलं, “ह्याला पण सवय लागली बोलायची! शहाणा झालाय!”
सासूबाई म्हणाल्या, “लहानपणापासून आईचं ऐकायला लागलंय, म्हणून डोक्यावर बसलाय.”
सुनंदा उठली. पोटात दुखत होतं, पण ती थरथरत्या हाताने दोन्ही मुलांना घट्ट जवळ धरत राहिली.
* * *
दुपार झाली. घरात तिचा दीर गण्या अंगावर गमछा टाकून मोबाईलवर गेम खेळत होता. जाऊ – सौम्या – हातात भलामोठा टॉवेल घेऊन केस सुकवत होती.
“सुनंदा, माझं पाणी गरम केलं का ग?”
“थोड्या वेळात करते.”
“म्हणजे तुला फक्त तुझ्या मुलांचं पाहीजे? आम्ही नको का?”
ती काहीच बोलली नाही. एका घरात ती मोलकरीण होती, पण ह्या घरातही? तिथं तिला पगार तरी मिळायचा… इथे फक्त टोमणे, अपमान, शिव्या, आणि कधी कधी हात.
संध्याकाळ होईपर्यंत दोनदा अजून मार खाल्ला – एकदा जेवणात मीठ कमी पडलं म्हणून, एकदा मुलगा रोहितनं अनवधानाने कपबशी फोडली म्हणून.
तेव्हा मात्र सुनंदा जोरात त्याला कवेत घेत म्हणाली,
“बाळा, सॉरी… आई इतकी अशक्त का वाटते तुला? पण तू घाबरू नको… आई काहीतरी करणार आहे.”
त्या रात्री सगळे झोपले. मुलं मात्र आईच्या कुशीत थरथरत होती. त"साक्षीचा थरथरता हात सुनंदाच्या हातात घट्ट होता.
सुनंदा छताकडे बघत होती… पण डोळ्यांत पाणी नव्हतं. फक्त एक खोल शांतता होती… जी वादळाची नांदी होती.
* * *
सकाळी ५ वाजता ती उठली. कुणीही उठायच्या आत.
कपाट उघडलं. एक पिशवी काढली. त्यात भांडी न्हाल्याचा कपडा, मुलांच्या वह्या, गरजेच सामान.
साक्षीला झोपेतून उचललं, रोहितच्या खांद्यावर बॅग टाकली.
“आई, आपण कुठे जातोय?” रोहितने विचारलं.
सुनंदा थांबली. मुलांकडे पाहिलं. त्यांच्या भोवतीचं घर… हे घर नव्हतंच… हे एक कैदखाना होता – जिथं तिचं स्वत्त्व दररोज मरत होतं, आणि आता तिच्या लेकरांचंही काही उरलं नव्हतं.
“बाळा… आपण आपलं खरं घर शोधायला निघतोय. जिथं आपल्याला कोण मारणार नाही, शिव्या देणार नाही, उपाशी ठेवणार नाही.”
* * *
सुनंदा मुलांना घेऊन दार उघडून बाहेर पडली.
कुणी अडवलं नाही.
कुणी थांबवलं नाही.
कोणी विचारलं नाही, “कुठे चाललीस?”
कारण तिच्या जगण्यात कोणालाही रस नव्हता — पण आता ती जगणं नव्याने सुरू करणार होती.
ती चाळीच्या गल्लीतून बाहेर पडली, आणि अंधुक प्रकाशात तिच्या पाठीवर फक्त एक जुनी पिशवी नव्हती… तिच्या पाठीवर एक नव्या जगाची जबाबदारी होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा