Login

राधा भाग आठ

असेच राहायचे नवरा बायकोने . हक्क दाखवण्यापेक्षा निखळ असे नाते रुजले जाते तेव्हा ते ओझे वाटत नाही. मुळात कोणतेच नाते ओझे वाटत नाही. ते नाते हवहवेसे वाटते. समीप वाटते.”


कथेचे शीर्षक – राधा
विषय – कौटुंबिक
फेरी – राजस्तरीय करंडक कथामालिका.
संघ – रायगड रत्नागिरी

गेल्या भागात आपण पाहीले चित्रकलेच्या स्पर्धेत विकासचा प्रथम क्रमांक आला. गौरीआणि राधाने विकासचे अभिनंदन केले. इथे विकास, राधाशी बोलून प्रचंड खुश झाला होता. त्याला वाटत होते राधाला त्याच्या मनातल्या तिच्याविषयी ज्या भावना आहेत त्या आज नाहीतर उद्या नक्कीच कळतील. आता पुढे..

राधा, विकासचे अभिनंदन तर केले पण नंतर तिला अस्वस्थता जाणवू लागली. अपराधीपणाची भावना दाटून आली. घरी जात असताना ती गौरीला म्हणाली,

“गौरी, प्लीज माझं ऐकशील का?”

“बोल ना राधा”

गौरीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

“गौरी, बघ आपण खरंच छान मैत्रिणी आहोत. मी माझं आयुष्य आधीच तुझ्या समोर उलगडले आहे. माझ्या आयुष्यात काय हवे आहे, मला काय करायचे आहे ते आधीच मी ठरवलं आहे..”

बोलत असताना राधाचा आवाज खोलवर गेला. गौरी लक्ष देऊन ऐकत होती. राधा पुढे बोलू लागली.

“गौरी, बघ तू म्हणालीस म्हणून मी विकासचे अभिनंदन केले. मला आधीच कल्पना आहे की, त्याला मी आवडते. तुलाही ते माहीतच आहे. गौरी मला असे वाटते की, मी त्याच्या जवळ गेले, बोलले तर त्याला माझ्याविषयी ओढ अजून वाढेल. मला हे सर्व होऊ द्यायचे नाही आहे. का म्हणून मी त्याच्या भावनांशी खेळू? मला माहीत आहे माझा रस्ता काय आहे? मला विनाकारण त्याला माझ्यात गुंतवायचे नाही.. अजिबात नाही..”

गौरीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली,

“राधा, ठीक आहे;पण आपण फक्त अभिनंदन केले. त्यात इतकं काय?”

राधा हसली आणि पुढे बोलू लागली.

“गौरी, तुला असे वाटते की फक्त अभिनंदन केले. तू एक गोष्ट पाहिलीस का? तो मला किती टक लावून बघत होता. मी जेव्हा त्याला अभिनंदन केले तेव्हा धन्यवाद बोलायचे सोडून तो फक्त आणि फक्त मला पाहण्यात दंग होता. राजने त्याला चिमटा काढला तेव्हा कुठे तो भानावर आला..”

गौरी तो प्रसंग आठवू लागली.

“तू बरोबर बोलते आहेस राधा.. आय ऍम सॉरी. हे सर्व माझ्यामुळे झाले. मी सहजच म्हणाले की आपण त्याचे अभिनंदन करूयात. माझं चुकले राधा. मी विचार करायला हवा होता. खरंच सॉरी.. ”

“वेडी आहेस का गौरी? सॉरी काय बोलते आहेस? तू काही चूक केली नाही. मला माहीत आहे तुझा लहरी स्वभाव.. ज्या क्षणी जे वाटते ते करून मोकळे व्हायचे. तू वाहती नदी आहेस राणी.. फक्त मला इतकं म्हणायचे आहे की ह्यापुढे विकाससोबत मी तरी बोलू शकत नाही. त्याला गैरसमज होईल. बाकी काही नाही..”

गौरीने होकारार्थी मान डोलावली. राधाचे बोलणे तिला पटले.

विकास तर इतका खुश झाला होता की, घरी आल्यावर त्याने राधाचे चित्र काढलं आणि त्यावर आजची तारीख लिहिली. आज खास दिवस होता. त्याचे प्रेम पहिल्यांदा त्याच्या इतक्या जवळ आले होते. खूप जवळ.. सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. त्याने तो कागद बॅगमध्ये जपून ठेवला.

सकाळ कधी होते ह्याची वाट पाहू लागला. कधी एकदा कॉलेजला जातो आणि राधाला पाहतो असे त्याला झाले होते. इतक्यात त्याच्या आईने कांताने त्याला आवाज दिला.

“विकास, वृंदा.. ताट वाढले आहे.. जेवायला बसा..”

विकासची लहान बहीण वृंदा त्याला पाहताच चिडवू लागली. विकासने तिची वेणी जोरात खेचली तशी वृंदा जोरात ओरडली,

“ए आई सांग ना दादाला, बघ माझी वेणी खेचली”

आई पाण्याचे ग्लास टेबलवर ठेवत म्हणाली,

“लहान राहीले आहात का तुम्ही दोघे? जेव्हा बघावे तेव्हा टॉम अँड जेरी सारखे भांडत असता.कधी मोठे होणार माहीत नाही..”

विकास वृंदाकडे रागाने कटाक्ष टाकत म्हणाला,

“आई, हिनेच आधी सुरवात केली. मला चिडवत होती..”

“लहान आहे ती, तिला समजून सांगायचे.”

आई विकासकडे पाहून म्हणाली तसं विकास मान डोलवतच म्हणाला,

“आई, ही काही लहान नाही. सातवीत गेली आहे की चांगली आणि म्हणे लहान. सगळे काही बरोबर कळते हिला. वृंदा म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आहे.चांगला ओळखतो मी हिला..”

वृंदा नाकावर आलेला घाम पुसत म्हणाली,

“तू काय म्हणालास दादा?”

विकासचे वडील विनायक दारात बूट काढत म्हणाले,

“दादा म्हणाला वृंदा पापा की परी आहे..”

बाबांना पाहून वृंदा आणि विकास खुश झाले. तब्बल एक महिन्याने ते घरी परतले होते. ते कामानिमित्त बाहेर होते. वृंदा आणि विकासने बाबांना मिठी मारली. कांता देखील डोळे भरून नवऱ्याला पाहत होती. विनायक कांताकडे गेला. तिच्या हनुवटीवरअलगद हात ठेवला आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाला,

“आमची वाघीण का बरं रडते आहे?”

हे ऐकून सगळेच हसू लागले. कांता डोळे पुसतच विनायकला म्हणाली,

“ते तुम्हाला कळणार नाही. "

पदर खोचतच म्हणाली.

"तुम्ही पण बसा जेवायला. गरम गरम जेवण वाढते..”

“मॅडम, जशी तुमची आज्ञा..लगेच आलो मी फ्रेश होऊन..”

असं म्हणून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. घरात आनंदाचे वातावरण होते. विनायकला पाहून सगळेच खुश झाले होते. वेगळाच उल्हास होता. जेवण नेहमीपेक्षाही गोड लागत होते. चार घास जास्तीचे गेले.

संध्याकाळ झाली. उकळत्या चहाचा सुगंध घरभर पसरला होता. आज तर घरात स्पेशल चहा बनत होता. विनायकच्या हातचा. वृंदा आणि कांता मस्त गप्पा मारत होत्या आणि विनायक पोह्यासाठी कांदे चिरत होता. कांद्यामुळे विनायकच्या डोळ्यात पाणी आले होते. विकासला पाहिले तसे तो म्हणाला,

“पाहिलेस विकी? लग्न केल्यावर काय हाल होतात ते? पुरुषाचे फक्त हाल हाल होतात बघ..”

कांताला ऐकायला जाईल या स्वरात तो मुद्दाम बोलत होता. मुद्दाम कांताही चढलेल्या आवाजात म्हणाली,

“काय चालू आहे आत? कसली कुजबूज चालू आहे? चहा आणि पोहे झाले की नाही? अजून किती वेळ लागणार आहे?”

वृंदा आणि विकास दोघांना आई बाबांची जुगलबंदी पाहून कुतुहुल वाटत होते. विनायक उगाच घाबरल्याचा आव आणत म्हणाला,

“मॅडम फक्त पाच मिनिटात चहा आणि पोहे हाजीर करतो..”

विकास तेलात तळलेले शेंगदाणे खातच विनायकला म्हणाला,

“बाबा, तुम्ही आणि आई परफेक्ट कपल आहात. तुम्ही दोघे नवरा बायको वाटत नाही. मित्र,मैत्रिणीच वाटता.”

“वाटतो म्हणजे? आम्ही आहोतच मित्र मैत्रिण. माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे कांता. माझं जग आहे तुझी आई. माझी खासम खास मैत्रीण. जीवाला जीव देणारी.”

विनायक कांताकडे पाहून म्हणाला.

“ग्रेटच..”

विकासच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले. विनायक हसून म्हणाला,

“हयात काहीही ग्रेट वैगेरे नाही हा विकी. हे असेच राहायचे नवरा बायकोने. हक्क दाखवण्यापेक्षा निखळ असे नाते रुजले जाते तेव्हा ते ओझे वाटत नाही. मुळात कोणतेच नाते ओझे वाटत नाही. ते नाते हवहवेसे वाटते. समीप वाटते.”

विकासला राधाचा चेहरा आठवला. तो किंचितसा हसला. विनायक, विकासला चहाचा कप देत म्हणाला,

“मलाही सांग तो जोक ?”

“जोक ? कोणता जोक ?”

“जो आता तुझ्या डोक्यात घोळत आहे आणि त्यामुळे तू हसतो आहेस तोच जोक ऐकायला आवडेल.”

“नाही नाही ते मी आपलं असंच तुमचे ऐकत होतो म्हणून हसू आले.”

“मी हसण्यासारखे काही बोललो? काय भानगड आहे? मी असे काही बोललो आणि मलाच माहीत नाही?”

विषय बदलण्यासाठी विकास म्हणाला

“बाबा, चित्रकलेत पहिला क्रमांक आला माझा..”

“एक नंबर विकी. चल आज माझ्याकडून मस्त पार्टी.”

विनायक आनंदाने म्हणाला. कांता किचनमध्ये येत म्हणाली,

“कसली पार्टी?”

“अगं आपला लेक चित्रकलेत पहिला आला.”
आईचा चेहरा खुलला.

“खूप छान विकी. मस्त मस्त.. आता तर पार्टी झालीच पाहिजे."

विकासच्या घरी खेळीमेळीचे वातावरण होते. तो तर इथे राधाला ह्या घराचा हिस्सा बनवण्याचे स्वप्न पाहू लागला होता. तिथे राधा त्याच्यापासून अंतर ठेवत होती.

क्रमश:
अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all