मानपान …
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
सूनबाई उठल्यावर फ्रेश होऊन कुठल्याही कामाला हात न लावता आयत्या ताटावर बसल्या आहेत, सासूबाई नाश्त्यासाठी बनवलेले गरम गरम डोसे बनवून आग्रहाने खाऊ घालत आहेत हे दृश्य पाहून मंगलाला अगदी कसचंच झालं. ‘सासू लाख म्हणेल हो तू बस सगळ्यांसोबत नाश्त्याला पण सुनेला अक्कल नको. मोठ्यांचा मानपान, रीतभात कळायला नको’ ताटातला कुरकुरीत डोसा खाता खाता मंगलाबाई स्वतःशीच संवाद साधत होत्या. ‘फार कौतुक चालले आहे सुनेचे. हीच सून कस्पटासारखी बाजूला काढेल तेव्हा अक्कल येईल आमच्या बहिणाबाईंना’ ताटलीतले डोसे संपवून उगीचच सगळ्यांकडे बघत हसत मंगला हात धुवायला उठली.
“तू बस आता. मी घालते उरलेले डोसे” आपल्या बहिणीच्या हातातून उलथने काढून घेत मंगला म्हंटली.
“चार दिवस पाहुणी म्हणून रहायला आलेल्या मोठ्या बहिणीला काम सांगितलं तर पाप लागेल मला. तू बस बघू आरामात. झालंच आहे माझं” खुर्ची पुढे ओढत मंगलताईला त्यावर बसवत सीमा म्हणाली.
“बहिणीला काम सांगितलं तर पाप लागेल आणि सुनेला सागितलं तर” मंगलाताई जरा रागातच म्हणाल्या.
“आई तुम्ही नाष्टा करा. उरलेले डोसे मी करते” सीमाची सुनबाई बोलत आत आली त्यामुळे दोघी बहिणींचे उर्वरीत बोलणे खुंटले.
मंगला आणि सीमा आत्येमामे बहिणी. मंगला सीमाहून अवघी आठ नऊ महिन्यांनी मोठी. एकाच वयाच्या असल्याने दोघींचं अगदी छान जमायचं. जिवाभावाच्या मैत्रिणींसारखं पटायचं. सुट्टी लागताक्षणी मंगलाला मामाच्या गावी जायचे वेध लागायचे तर कधी सीमा सुद्धा निमित्त शोधत आत्याकडे मुक्कामाला यायची. दोघींची लग्न ठरेपर्यंत नित्यनेम सुरू होता पण लग्न झाल्यानंतर दोघी संसारात, मुलांबाळात रमल्या. नियमित होणाऱ्या भेटीगाठी कमी होऊ लागल्या. सीमा एकत्रित कुटुंबात पडली. जवाबदारी ओघानेच अंगावर आली. मोठं कुटुंब परिस्थिती बेताची त्यामुळे सीमाला बहिणीला घरी बोलवता आले नाही. मंगलाही आठ दहा जणांच्या कुटुंबात अजून एकाची भर नको म्हणून सीमाच्या घरी जायचं टाळायची. मंगलाचे मिस्टर रेल्वेत नोकरीला होते दर दोन तीन वर्षानी बदली ठरलेली. तिला बदलीच्या ठिकाणी बिऱ्हाड हलवावे लागायचे. सीमाला तिकडे जाणे जमायचे नाही. लग्नकार्य, निम्मितमात्रे कधीतरी भेट व्हायची पण त्यात लग्नाआधीचा निवांतपणा नसायचा. त्यामुळे दोघी बहिणी हळहळायच्या. पण आता चित्र बदललं होतं मुलं मोठी झाली होती. सुना, जावई आले होते. नातवंडानी घर भरले होते. दोघी काही प्रमाणात का होईना जबाबदारी मुक्त झाल्या होत्या आणि म्हणूनच सीमा लाडक्या मंगलताईला घरी यायचा आग्रह करत होती. अनेक वर्ष छोट्या जागेत काटकसरीने संसार केलेल्या आपल्या बहिणीचे वैभव पाहण्यासाठी, तिला सुखाच्या राशीत लोळताना बघण्याची उत्सुकता मंगलाला देखील लागली होती.
“सीमा चार दिवस रहायला, लेकाने बांधलेलं घर पहायला बोलावते आहे. वास्तुशांतीच्या वेळी तुमचे मोतीबिंदूचे ऑपरेशन निघाले त्यामुळे जाता आले नाही.” मंगलाने जेवताना आपल्या नवऱ्याकडे अरविंदकडे पहात घरातल्या सगळ्यांना विचारले.
“विचारतेस काय आई? खुशाल जा. मी तर म्हणतो तुम्ही दोघंही जा.” लेक प्रशांत म्हणाला.
“रिझर्व्हेशन कर प्रशांत, जाताना आई एकटी जाईल. आठ, दहा दिवस रहायचं तितके राहील. मी घ्यायला जाईन. दोघी बहिणीत माझी उगाच लुडबुड नको” अरविंद हसत म्हणाले.
नोकरचाकर, सून दिमतीला असेल, सीमा ऑर्डर सोडत आराम करत असेल असे चित्र डोळ्यासमोर ठेवत मंगला सीमाच्या घरी पोहोचली पण तिकडचे दृश्य बघून तिचा एकदम भ्रमनिरास झाला. सीमा अजूनही सासुरवाशीण असल्यासारखी वागत होती. पूर्वी सासूची आज्ञा पाळत होती आता सुनेच्या पुढेमागे करत होती.
सीमाची सुनबाई रेवती सकाळी उठून फक्त आपलं आवरून नोकरीला जात होती. लेकाचा डब्बा, सगळ्यांचा चहा नाश्ता, नवऱ्याच्या साग्रसंगीत पूजेची तयारी, नातवाला उठवणे, त्याच्या शाळेच्या वेळा सांभाळणे, तयार करणे, पाणी भरणे, वॉशिंग मशीन लावणे इतरही अनेक कामे सीमा या वयातही बारा हत्तीचे बळ असल्यागत करत होती.
सुरुवातीला मंगलाला वाटले हत्तीचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे तसं या दोघी सासूसुनांच वागणं असेल. शेवटी काहीही झालं तरी सीमा आपली बहीण, आपण नाही का कोणी आलंगेलं की कामाचे डोंगर उचलत असल्याचा आव आणतो तसंच. आपले गुण तिच्यात येणारच, गुण नाही तरी वाण लागणारच पण असं काहीच नव्हतं. मंगलाला सीमाकडे येऊन चार दिवस होऊन गेले आहेत तरी समोरच चित्र बदलत नव्हतं.
मंगला पहिल्या पासूनच खमकी होती तर सीमा अगदी भोळसट होती. तिच्या याच स्वभावाचा तिची सून रेवती फायदा घेत आहे. गोड बोलून तिला कामाला लावत आहे चाणाक्ष मंगलाने लागलीच ओळखले. आपल्या बहिणीची कानउघडणी करायचे ठरवले.
“आल्यापासून बघते आहे, जरा उसंत नाही तुझ्या जीवाला. तू आपली सतत कामात. काही जबाबदाऱ्या दे की सुनेकडे.” दुपारच्या निवांतवेळी मंगलाने सीमाकडे विषय काढला. तिला खटकत असलेल्या गोष्टी बोलून दाखवल्या.
“बाकी सगळ्या कामांना बाई आहे. स्वयंपाक तर करायचा असतो मला.”
“तिला लवकर उठून करून जायला काय होतं?”
“तिची सकाळची शाळा, पावणे सातच्या आधी घर सोडावं लागतं, किती लवकर उठणार ती. मीच म्हटलं तिला तुझं आवरून जात जा. मी करेन सगळं. घरी आली तरी आराम नाही जीवाला, कधी पेपर तपासा तर कधी पेपर काढा, कधी इलेक्शन ड्यूटी तर कधी कुठल्या सर्व्हेचं काम” सीमा रेवतीची बाजू मांडत म्हंटली.
“सकाळी घाई होते ठीक आहे, रात्रीच्या स्वयंपाकाच तरी तिने बघावं. तेव्हाही रेवतीला तुझी मदत लागते आणि तू सुद्धा मी कुकर लावते, आमटी करते करत लुडबुडायला जातेस. नातवाला तरी पाळणाघरात ठेवायला सांग. त्याच्या पुढेमागे करून किती दमछाक होते तुझी.”
“तो आहे म्हणून आमचा छान वेळ जातो. घर भरल्यासारखं वाटतं नाहीतर एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघे करणार काय?”
“मी तर सरळ सांगितलं, तुमची मुलं तुम्ही सांभाळा. मला जमणार नाही. ह्या नातवंडांची लोढणी आपल्या गळ्यात घालणार नोकरी करणार वर आपल्यालाच मिजास दाखवणार.” मंगला तोंड वाकड करत म्हणाली.
“फार वर्षापूर्वी ह्यांनी जागा घेऊन ठेवली होती. घर बांधणे काही केल्या जमत नव्हते. केदार आणि रेवतीने लोन काढलं म्हणून आमचं स्वप्न सत्यात उतरलं. रेवतीच्या नोकरीमुळे जमलं केदारला. एकाच्या पगारात थोडीच शक्य आहे. ती दोघे एवढे करतात म्हणून मग मला जमेल तेवढं मी ही करते.” बोलता बोलता सीमाला गहिवरून आलं.
“काही उपकार करत नाहीत. कर्तव्य आहे त्याचं ते. तू नुसती राबतच आहेस सासूरवाशीन होतीस तेव्हाही आणि सून आली तरीही. सून आल्यापासून मी स्वयंपाकघरात फिरकतही नाही. पोळपाट लाटणं शेवटचं कधी हातात घेतलं होतं आठवावे लागेल.” मंगला ठामपणे बोलत, आपल्या बहीणीला कसं वागायचं हे सुचवत होती. सीमा ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत मंगलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. खरं तर सीमा मंगलताईच्या वागण्याला, सारखं सारखं त्याच त्याच बोलण्याला कंटाळली होती. तरी उपदेशाचे डोस देत मंगला सीमाला आपल्या सुनेविरुद्ध भडकवण्याची एकही संधी सोडत नव्हती.
“मान देणं म्हणजे नक्की काय ग? प्रत्येक गोष्ट विचारून करायची. सासू सासऱ्यांच्या पंक्तीला बसायचं नाही. सासूला कुठल्या कामाला हात लावू द्यायचा नाही” अखेर चिडून सीमा मंगलाला म्हणाली.
“उशिरा का होईना तुझी ट्यूब पेटली बाई. माझ्या घरी माझ्या मर्जीशिवाय पानसुद्धा हलत नाही. धाकात ठेवलं आहे मी दोघींना.” मंगला ठसक्यात बोलली.
“तुला मिळणारा मान वरवरचा दिखावा आहे. चारचौघात तुला तुझ्या सुना मान देतात पण मनातून मात्र रागराग करतात. आठ दिवस झाले तुला इथे येऊन एकीने तरी फोन केला का? कशा आहात? कधी घरी येताय, काही तरी विचारलं का?” सीमाने मंगलाला वास्तवाची जाणीव करून दिली.
नवरा सोडला तर इतर कोणीही आपली विचारपूस केली नाही ही गोष्ट मंगलाला देखील खटकली होती.
“अशीच वागत राहिलीस तर एकटी पडशील, मुलं, नातवंड दुरावतील. मोठी वेगळी झालीच आहे, धाकटी पण तिच्या पावलावर पाऊल टाकेल. मान मागून मिळवण्याची गोष्ट नाही, तो सदाचरणातून कमवावा लागतो. अजून वेळ गेली नाही ताई, विचार कर.” सीमाच्या समजावणीच्या सूरात म्हणाली.
रेवती आणि सीमा दोघी एकत्र खरेदीला जात होत्या, कधी नाटक बघत होत्या. सीमा सुनेसाठी जाईजुईचा गजरा गुंफून ठेवत होती तर रेवती सासूसासऱ्यांना औषध गोळ्यांची आठवण करून देत होती. छान अंगतपंगत होऊन जेवणं पार पडत होती. आपल्याकडे यापैकी काहीच नाही. सगळा लपवाछपवीचा कारभार, कामापुरता संवाद. नकळतच मंगलाच्या मनाने तुलना सुरु केली.
“एकमेकांच्या मताचा आदर करत समजून उमजून वागलात तर तुझ्या घराचेही गोकुळ होईल” गप्प झालेल्या मंगलाकडे पहात सीमा म्हणाली.
मंगलाला आपली चूक उमगली. मोठेपणा, माझं तेच खरं करण्याच्या नादात काय गमावलं याची जाणीव झाली. आपलं वागणं बदलण्याचा निर्णय घेत, सामानाची बांधाबांध करत, नात्यातला हरवलेला संवाद शोधायला ती त्वरित आपल्या घरी निघाली.
समाप्त.
©®मृणाल महेश शिंपी.
टीम - सुप्रिया
टीम - सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा