कुर्यात सदा मंगलम् भाग दोन
“रुद्र आतापर्यंत तुला कमीत कमी दहा ते बारा मुली सांगून आल्या. पण तू एकही मुलगी बघायला तयार नाहीस. अरे मुलगी बघायला गेलं म्हणजे आपण होकार दिलाच पाहिजे असं काही नाही ना!” रुद्रची आई त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती.
“अगं पण आई, मला नाही पटत हे असं मुली बघायला जाणं. दुकानात जाऊन वस्तू विकत घेण्याकरिता गेल्या सारखं वाटतं मला. शिवाय एकदा बघायला गेल्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांना आणि तिलाही काही ना काही उत्तर द्यावं लागणारच ना!” रुद्रने त्याच्या मनातली शंका आईला सांगितली.
“तुला मुलगी पसंत आली नाही तर, काय उत्तर द्यायचं याचं टेन्शन तू घेऊ नको. मी आणि तुझे बाबा बघून घेऊ. तू फक्त मुलगी बघायला चल.” रुद्रच्या आईने त्याला गळ घातली.
“अगं पण असं नुसतं बघून लग्न करणं कसं शक्य आहे? तिचे विचार आणि माझे विचार जुळायला नको का? तिचा स्वभाव, माझा स्वभाव, केवळ एकमेकांना बघून, परस्परांना कसा कळणार? फक्त बघून होकार दिल्यानंतर आमचे स्वभाव नाही जुळले तर? लग्नानंतर मला घरात वादविवाद आणि कटकटी नकोत.” रुद्रने लग्नाविषयीचा त्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला.
“अरे तू इतका पुढचा विचार का करतो आहेस? आधी मुलगी बघायला तर चल. जर तुला ती आवडली तर मग पुढच्या गोष्टींचा विचार करता येईल. मला एक सांग पूर्वीच्या काळीही मुलगी बघूनच लग्न व्हायची. ती टिकायची ना? ही आताची मागच्या वीस वर्षातली पद्धत, प्रेमविवाह किंवा लग्न करण्याकरिता एकमेकांचे स्वभाव जुळायला हवेत याचा आग्रह धरणारी! लग्न संस्था म्हणजे काय हेच तुम्हाला, आजच्या उच्चशिक्षित, आधुनिक पिढीला अजूनही कळलं नाही.” आईने रुद्रला समजावून सांगायला सुरुवात केली. “रुद्र मला सांग की दोन अतिशय वेगळ्या वातावरणात, दोन वेगळ्या कुटुंबात, वेगवेगळ्या संस्कारांमध्ये वाढलेल्या दोन व्यक्तींच एकदम कसं काय पटेल? एकमेकांचे विचार आचार मन जुळायला जरा वेळ द्यावाच लागेल. थोडीफार तडजोड लग्नात दोन्हीकडून अपेक्षित असते. अगदी सखे भाऊ-बहीण असो किंवा मित्र-मैत्रिणी, कधी ना कधी वाद होणारच, खटके उडणारच, म्हणून मग आपण नवीन नातीच बनवत नाही का? रेल्वे सुद्धा रूळ बदलताना खडखडाट करतेच ना? लग्न करताना परस्परांची पसंती महत्त्वाची असते. सहवासाने, सोबत राहिल्याने, हळूहळू एकमेकांच्या स्वभावाची सवय होते. कधी कधी विचार वेगळे असल्याने मतभेद होऊ शकतात, पण एकमेकांना समजून घेऊन, कठीण प्रसंगी साथ देऊन, एकमेकांना जपत, परस्परांचा वेगळेपण स्वीकारत लग्न करायचं असतं. आमचं पटणार नाही असं आधीच गृहीत धरलं तर नवीन नातं रुजणार नाही. केवळ वादविवाद आणि मतभेद होतील म्हणूआपण लग्नच करायचं नाही हा कुठला न्याय?” आईचं म्हणणं रुद्रला पटलं होतं.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि रुद्रला गौरी आवडली. एम.ए. मराठी शिकलेली गौरी दिसायला सुंदर नव्हती, पण नाकी डोळी सरस होती. नाकारण्यासारखं काहीच नसल्याने रुद्र आणि गौरीचं लग्न ठरलं.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.