Login

सैनिक

सैनिक

         सर्वप्रथम मृत्यूला निधड्या छातीने सामोरे जाऊन पराक्रमाची ज्योत अखंड तेवत ठेवणार्या शूरवीरांसाठी तंत्र सैनिकांना माझा मानाचा मुजरा ! 

आज 14 फेब्रुवारी. आजचा दिवस सर्वत्र सगळीकडे व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो परंतु याच दिवशी आपल्या प्राणप्रिय मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या जवानांनी आपले प्राण हे आपल्या भारत भूमिसाठी अर्पण केले. ही वस्तुस्थिती आपल्याला विसरून चालणार नाही. या हल्ल्यामध्ये आपले निष्पाप, शूरवीर आपले 44 जवान शहीद झाले. किती मोठा त्याग केला असेल आपल्या जवानांनी! धैर्याच्या मशालीमध्ये पराक्रमाची ज्योत अखंड तेवत ठेवून तो आपल्या भारतभूमीसाठी लढत असतो. सै- सैन्याला, नि- निर्भय क -  करणारा तो म्हणजे सैनिक. ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता तो निस्वार्थपणे आपल्या कर्तव्यावर उभा असतो.  भारत मातेचा हा तिरंगा नेहमी डौलात फडकला पाहिजे म्हणून तो दिवस रात्र शत्रुंशी झुंज घेत असतो. त्याग आणि समर्पणाचे प्रतीक म्हणजे आपला वीर जवान ! आपला तिरंगा वाऱ्यामुळे नाही तर आपल्या सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो ही वस्तुस्थिती आहे.  आपण आपल्या घरी सणासुदीला गोडधोड पदार्थ बनवतो तेव्हा  सैनिक मात्र आपल्या छातीवर हसत हसत गोळ्या झेलत असतो.

       रात्री आपण सर्वजण  'गुड नाईट' चा मेसेज सर्वांना पाठवतो परंतु त्या ग्लेशियर सारख्या प्रचंड थंड, जिथे ऑक्सिजनचा लवलेशही नसतो अशा अठरा हजार फुटावर आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांची रात्र कधी गोड असेल का ?  हा विचार मनाला कधी टोचून जातो का ? त्याचाही कुटुंबकबिला आहे तो कधी आपल्या कुटुंबा मध्ये समरस होत असेल का ?  त्याच्या सर्व इच्छा आकांक्षावर पाणी फिरवून तो ' गर्दितलं होण्यापेक्षा ' वर्दीतल ' होण्याला  जास्त महत्त्व देतो. त्यामुळे आपल्या सैनिकांबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये आदर असणे गरजेचे आहे.

         जेव्हा एखादा सैनिक शहीद होतो तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला खूप मोठा जनसागर लोटला असतो.  परंतु तोच सैनिक जेव्हा सुट्टीच्या कालावधीमध्ये घरी येतो तेव्हा किती जण त्याला भेटायला जातात?  त्याची विचारपूस करतात ? हा गंभीर प्रश्न आहे.  सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच एसटी, बस, ट्रेन अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला हे जवान दिसतात तेव्हा आपण त्यांचा आदर करतो का ?  परवा एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहायला मिळाला ' एक सैनिक रस्त्यावर उभे राहून त्याला घरी जाण्यासाठी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण एकही गाडी त्याच्यासाठी थांबलेली नाही. ही गोष्ट मात्र मनाला लागून जाते. कोणासाठी लढतात हे  सैनिक ? स्वतःच्या शरीरावर ग्रेनेड हल्ले ,गोळ्या कोणासाठी झेलतात आपल्यासाठीच ना ! याची जाणीव आपल्याला असायला हवी ! 

             ते आहेत म्हणून आपण आहोत

          ते शहीद होतात म्हणून आपण जगतो ! 

                     कु.  स्नेहल गोविंद चव्हाण, देवरूख