Login

शापित वाडा भाग -१

शापित वाडा
भाग -१

शहरातील गोंगाट, ऑफिसमधले तासन्‌तास चालणारे काम, आणि डेडलाईन्स या सगळ्यामुळे रमेशचं मन पूर्णपणे थकून गेलं होतं. एक दिवस त्याने ठरवलं आता पुरे झालं! नोकरी, फ्लॅट, शहरातली धावपळ सगळं सोडून तो आपल्या गावात परतणार.कायमचेच

गावाच्या कडेला असलेला त्यांचा वडिलोपार्जित दगडी वाडा त्याला नेहमीच आकर्षित करायचा. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत तो तिथे खेळायचा, भिंतींवरच्या भेगांमध्ये लपंडाव खेळायचा. पण आईवडील गेल्यानंतर आणि बाकी नातेवाईक शहरात स्थायिक झाल्यानंतर तो वाडा ओसाड पडून गेला. काळाच्या ओघात झाडाझुडपांनी त्याला जखडलं आणि लोकांच्या तोंडात त्याबद्दल भीतीदायक कुजबुज सुरू झाली.

गावात पाऊल टाकताच काहींनी त्याला प्रेमाने विचारपूस केली, तर काहीजण संशयाने त्याच्याकडे बघत राहिले. एका पांढऱ्या केसांच्या वृद्धाने थेट विचारलं

“रमेश, खरंच का तू त्या वाड्यात राहायला जाणार आहेस?”

रमेश हसून म्हणाला,
“का नाही? आपलं घर आहे ते. दुसरीकडे का राहू?”

वृद्धाने नजर वळवली, आणि मागे उभे असलेले काही गावकरी कुजबुजू लागले
“त्या घरात आत्म्याचा वास आहे”
“कुणी तिथे टिकत नाही शापित वाडा आहे तो”

रमेशने त्या कुजबुजीकडे दुर्लक्ष केलं.
“भूत-प्रेत वगैरे काही नसतं. ते सगळं मनाचे खेळ आहेत,” तो मनाशी म्हणाला.

संध्याकाळचे ऊन मावळत आलं तेव्हा रमेश हातात टॉर्च घेऊन वाड्याकडे निघाला. लोखंडी गजदार दरवाजा गंजून काळवंडला होता. कुलूप मोडकळीस आलं होतं. दार ढकलताच धुळीचा ढग हवेत उडाला आणि एक उग्र वास नाकात शिरला.

आत पाऊल टाकताच काळोखाने त्याला गिळलं. भिंतींवर जड ओलसर डाग होते, फर्निचर झाकलेल्या कापडाखाली कुजल्यासारखं भासत होतं. कोळ्यांची जाळी टॉर्चच्या प्रकाशात चमकत होती. वाड्याच्या लांब दालनात सावल्या ताणून धरल्यासारख्या थरथरत होत्या.

रात्र जसजशी गडद होत गेली तसतसे बाहेर किटकांचे आवाज, घुबडांचा हुंकार वातावरण अधिक भीतीदायक करू लागला. रमेशने दिवा लावून स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी पुस्तक उघडलं. पण त्याला सतत जाणवत होतं हवा नेहमीपेक्षा जड आहे, एखाद्या अदृश्य नजरेखाली तो बसला आहे.

अचानक धाडकन!
दार आपटलं. रमेश दचकला.
“कदाचित वारा असेल,” त्याने स्वतःला समजावलं.

पण लगेचच वरच्या लाकडी जिन्यावरून टकटक… टकटक… असा आवाज घुमला. कुणीतरी जड पावलं टाकत हळूहळू खाली येत असल्याचा भास होऊ लागला.

रमेशचा घसा कोरडा पडला. त्याच्या हातातून पुस्तक थरथरत खाली घसरलं. तो थेट टॉर्च उचलून जिन्याकडे वळला.

“कोण आहे तिथे?” त्याने मोठ्या आवाजात विचारलं.

उत्तर नाही.फक्त आवाज अचानक थांबला.

घरभर मृत्यूसारखी शांतता पसरली.

रमेशच्या लक्षात आलं पहिली नक्कीच इथे काहीतरी आहे पण काय कि कोण माझ्यासोबत खेळ करत आहे.


कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all