Login

शापित वाडा भाग -२

शापित वाडा
भाग -२

पहिल्या रात्री रमेशला एक विचित्र बेचैनी जाणवत होती. गावच्या शेवटच्या टोकाला उभा असलेला तो जुना वाडा, जिथे तो आईवडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच राहायला आला होता, त्या शांततेत खूप काही दडलेलं भासत होतं.

मध्यरात्री अचानक कानावर हलकासा आवाज आला जणू कोणी जिन्यावरून सावकाश चालत आहे. पावलांचा तो लयबद्ध ठेका त्याच्या मनाला खुपू लागला. तो गडबडून उठला, कान देऊन ऐकत राहिला. आवाज जसा आला तसाच थांबला. झोप पुन्हा काही लागेना.

रात्र कसाबसा ढकलून सकाळ झाली. पण मनात एकच प्रश्न फिरत होता
“खरंच आवाज आला होता का? की फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत?”

तो वाड्याच्या आत फिरू लागला. जुन्या दारांची कडाकड, कोळ्यांची जाळी, हवेत पसरलेला ओलसर वास सगळं मनावर दबाव आणत होतं. जिन्याजवळ तो थबकला. धुळीत पावलांच्या खुणा स्पष्ट उमटलेल्या होत्या. पण आश्चर्य म्हणजे त्या खुणा मधोमध गायब झाल्या होत्या. ना वर गेल्या, ना खाली उतरल्या. जणू चालणारा एखाद्या क्षणी हवेतच विरून गेला होता.

त्याच्या अंगावर सरसर काटा आला.
“हे कसले कोडं आहे?” तो पुटपुटला.

दिवसाचा वेळ सरावा म्हणून त्याने साफसफाई सुरू केली. जुन्या पडद्यांचा वास, ढासळलेली लाकडी फर्निचर, जमिनीवर साचलेली धूळ हे सगळं करताना अचानक त्याचं लक्ष मागच्या भिंतीवर गेलं. तो थबकून गेला.

भिंतीवर गडद लाल रंगात शब्द उमटलेले होते “जा… निघून जा…”

ते अक्षरं बोटांनी खरचटल्यासारखी होती. भिंतीवर रक्त सांडल्याचा भास होत होता. रमेशचा घसा कोरडा पडला. श्वास रंध्रात अडकला. काल रात्री तिथे काहीच नव्हतं, मग हे कसं शक्य आहे?

तो थेट घराबाहेर धावत गेला. चौकात त्याला पुजारी भेटले.
“बाळा, तुला सांगितलं होतं ना त्या वाड्यात राहू नकोस. तो झपाटलेला आहे.”

रमेश चिडून म्हणाला,
“भूत-प्रेत वगैरे नसतं. नक्की कुणीतरी माझी थट्टा करतोय.”

पुजारी मात्र गंभीर चेहऱ्याने म्हणाले,
“थट्टा नाही बाळा. तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो वाडा रिकामा झाला, पण रिकामं घर कधीच रिकामं राहत नाही. तिथे काहीतरी स्थिरावत तेच झाले आहे.”

रमेशला राग आला. तो परत वाड्यात गेला. स्वतःला समजावलं की हे सगळं योगायोग आहे.

पण रात्री पुन्हा वातावरण बदललं.

तो अंधारात बिछान्यावर पडून डोळे मिटायचा प्रयत्न करत होता. पंख्याचा आवाजही बंद वाटत होता. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. त्याने नकळत आरशाकडे पाहिलं
आरशात त्याचं प्रतिबिंब उभं होतं, पण चेहरा बदललेला. लालसर डोळे, ओठांवर एक थंडगार, अनोळखी हास्य.

तो हादरला. गडबडून दिवा लावला. प्रकाश पडताच आरशात सर्व काही सामान्य दिसलं.

त्याचा घाम गळ्यापर्यंत आला होता.
“मीच वेडा होतोय का?” तो स्वतःशीच पुटपुटला.

पण त्या रात्री, पहिल्यांदाच, त्याला अगदी स्पष्ट जाणवलं कोणी तरी त्याच्या शेजारी उभं होतं. त्याच्या श्वासाच्या तालात नाही, पण त्याच्याच सावलीत.

कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all