Login

श्शू...! आवाज कोणाचा? भाग ४

एक भीतीदायक कथा
श्शू…! आवाज कोणाचा? भाग ४

मागच्या भागात आपण बघीतलं की नयनाला असं विचित्र पद्धतीने बोलताना बघून प्रतिकला काही कळत नव्हतं त्यात त्या स्वयंपाक करणा-या बाई काही तरी विचित्र बोलल्यामुळे प्रतिकचं माथं ठणकलं. पुढे काय झालं ते आता बघू.

सकाळी प्रतिकला जाग आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचं अंग अखडून गेलय. त्याच्या लक्षात आलं आपण रात्रभर ऊताणंच झोपलो होतो त्यात मान उशीवर कशीतरी वेडीवाकडी ठेवल्यामुळे मानही अखडली होती. तेवढ्यात त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. त्याचा हात नयना ने घट्ट पकडून ठेवला होता. तोही रात्रभर. त्याला आठवलं रात्री मध्येच त्याला जाग आली तेव्हा त्याने आपला हात सोडवून डाव्या कुशीवर वळण्याचा प्रयत्न केला पण झोपेत असूनही नयनाने त्वरीत त्याच्या हातावरची पकड घट्ट केली आणि झोपेतच बडबडली,

" प्रतिक तू जाऊ नकोस नं. मला भीती वाटतेय."

हे ऐकल्यावर प्रतिक आपला हात सोडवण्यासाठी प्रयत्न न करता तसाच झोपला कारण त्याच्याही डोळ्यांवर झोपेची झापड होती.

हे आत्ता सगळं प्रतिकला आठवलं. नयनाच्या थकलेला चेहरा बघून त्याचं मन गलबललं. प्रतिकच्या हाताला पकडून झोपल्यामुळे नयनाचा चेहरा ती थकली होती तरी शांत दिसत होता.

आता काय करायचं हे प्रतिकला कळलं नाही तरी आपला हात नयनाच्या हातातून सोडवून घ्यायला हवा हे त्याच्या लक्षात आलं.

हळुवारपणे प्रतिकने आपला हात नयनाच्या हातातून सोडवून घेतला.हे करत असताना नयनाची झोप मोड होणार नाही याची त्याने काळजी घेतली.

आपला हात सोडवून घेत प्रतिक हळूच पलंगावरून उठला. नयनाच्या अंगावरचं पांघरूण नीट करून तो नयनाचा आणि स्वतःचा मोबाईल घेऊन खोलीबाहेर आला. खोलीच दार अलगद लोटून ठेवलं.

प्रतिक फ्रेश होऊन स्वयंपाक घरात चहा करायला गेला.
चहा करून स्वतःचा कप घेऊन प्रतिक बाहेरच्या खोलीत आला.आजचा पेपर दाराला लटकवलेला होता.तो काढून सोफ्यावर बसून चहा आणि पेपर हा रोजचा कार्यक्रम सुरू झाला.

***

थोड्यावेळाने बाई आल्या. खूप अनिच्छेने प्रतिकने त्यांना दार उघडलं. त्यांचा चेहरा बघताच बाईंना कळलं प्रतिक आपल्यावर चिडलेला आहे. कालचा राग गेलेला नाही. त्याही सूज्ञपणे काही न बोलता घरात शिरल्या. न बोलताच थेट बाथरूम मधे हात पाय धुवायला गेल्या.

बाई काही न बोलता स्वयंपाकाला लागल्या. प्रतिकच्या कपाळावर आठ्या होत्या. प्रतिक ऑफीसचं काम करू लागला.

स्वयंपाक,नाश्ता तयार करून झाल्यावर बाई आपली पर्स घेऊन जायला निघाल्या पण दाराशीच घुटमळू लागल्या.त्यांच्या चेहे-यावर भीती होती कारण त्यांना जे प्रतिकला सांगायचं होतं ते सांगितलं म्हणजे प्रतीक रागावणार तर नाही आणि रागावला तर काय बोलेल याचा त्या विचार करत होत्या. त्यांच्या हाताची अस्वस्थ चुळबुळ सुरू होती.

लॅपटॉप वर काम करता करता अचानक प्रतीकच बाईंकडे लक्ष गेलं.

" काय हवंय? झाला का स्वयंपाक?"

" हो."

" मग कशाकरीता थांबलात?"

प्रतिकने प्रश्नार्थक चेहे-याने बाईंकडे बघत विचारलं.

" नयना ताई कशा आहेत?"

" कालपेक्षा ठीक आहे."

" मी म्हणत होते एकडाव झाडफुक करणारे असतात त्यासनी दाखवा की नयना ताईंना "

बाई एका दमात बोलून गप्प बसल्या. त्यांच्या चेह-यावर भीती होती.

" तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की या अशा फालतू गोष्टी करू नका तरी तुम्ही आज मला विचारता?"

रागावर शक्यतो नियंत्रण ठेवत प्रतीक बाईंना म्हणाला.

" हो तुम्ही काल सांगितलं होतं.पण नयना ताई बऱ्या व्हायला पाहिजे न?"

" होईल ती बरी. ती काही आजारी नाही. कामाच्या ताणामुळे तिची ही अवस्था झाली आहे."

" आमच्या गावाकड याला पछाडल असं म्हणतात. झाड धरलं म्हणतात."

हे बोलताना बाईंचा चेहरा दुःखाने विदीर्ण झाला. त्याचं बोलणं संपतं न संपत तोच प्रतीक कडाडला.

" काय फालतूपणा चालवला आहे? हे असलं बोलायचं असेल तर येऊ नका उद्यापासून कामाला. कळलं?"

बाई प्रतीकने लावलेला सुर ऐकून घाबरल्या. त्यातून एवढ्या पैशाचं काम हातातून जाईल हे कळताच गर्भगळीत झाल्या.

" नाई जी.मी ताईंच्या काळजीपोटी बोलले."

" मी आहे नं ताईंची काळजी घ्यायला. डॉक्टर आहेत ते घेतील काळजी. तुमच्या या उपचारांची गरज नाही. पुन्हा सांगतो कामाला यायचं असेल तर मुकाट्याने या काम करा आणि जा. जर अशी चर्चा करायची असेल तर आजच तुमचा हिशोब करुन पैसे देतो. आम्ही दुसरी बाई बघू. कळलं?"

" साॅरी साहेब मी मनापासून बोलले जी. तुमास्नी ते फालतू वाटून राहिलं पन तसं नाय ते."

बाई प्रतिकच्या दर्डावणीने स्तब्ध झाल्या. तरी हिम्मत करून एवढं बोलल्या. त्यांना प्रतीक असं काही बोलेल याची अपेक्षा नव्हती.

" तुम्हाला पुन्हा तेच सांगायचं का?"

" नाय जी.कळलं."

एवढं बोलून कशीबशी मान हलवून प्रतीकच्या बोलण्याला संमती दर्शवत हातात आपली पर्स घट्ट धरून प्रतिकच्य घराचं दार उघडून बाहेर पडतानाच शेजारची रूपा आली. बाई घाई घाईने रुपकडे न बघताच बाहेर पडल्या.

रूपाला बाईंचं वागणं बघून आश्र्चर्य वाटलं.

"या बाई अशा का तरतर गेल्या. एरवी हसतात माझ्याकडे बघून."

रूपा आश्चर्य चकित होऊन म्हणाली.

" काही नाही त्यांचं म्हणणं नयनाला कोणीतरी पछाडलं आहे. काहीतरी बडबडायचं. एरवी चांगली नाॅर्मल असते. पछाडलं असतं कोणी तर इतकी शांत राहिली नसती. तिला चांगलाच ताण आलेला आहे."

" या लोकांचा अशा गोष्टींवर विश्वास असतो. तुम्ही आज नयनाला डाॅक्टर कडे घेऊन जा." रूपा म्हणाली.

" हो.आज संध्याकाळी घेऊन जाईन.दवाखाना उघडला की नंबर लावीन. सकाळी नाही जाणार डाॅक्टरकडे कारण मी सहा वाजता संध्याकाळी लाॅगाऊट करीन मग घेऊन जाईन."

प्रतिक म्हणाला.

" काही हरकत नाही.आल्यावर मला सांगा डाॅक्टर काय म्हणाले."

" हो नक्की."

" निघते मी .तुमचं काम चालू द्या."

" थॅंक्यू "

प्रतिकने थॅंक्यू म्हणताच रूपाने मागे वळून विचारलं.

" थॅंक्यू कशाला?"

" तुम्ही आपुलकीने नयनाच्या तब्येतीची चवकशी करायला आलात ."

" अहो शेजारधर्म नावाची गोष्ट असते नं? मी तेच करतेय. त्यासाठी कशाला थॅंक्यू! निघते मी. चिनूच्या शाळेची वेळ होत आली."
रूपा निघून गेल्यावर प्रतिक पुन्हा काम करायला लागला.
***
प्रतिक लॅपटाॅपवर काम करत होता खरं पण त्याच्या डोक्यात मात्र नयनाच्या बदललेल्या वागणुकीबद्दल विचार चालू होते. आजपर्यंत म्हणजे या तीन वर्षात नयना कधीही असं विचित्र लागली नव्हती. तिचा स्वभाव मुळातच शांत आणि सगळ्या समस्यांना धीटपणे तोंड देण्याचा आहे मुळूमुळू रडण्याचा नाही. आताच असं का होतंय हा प्रश्नसर्प प्रतिकच्या मनात कालपासून वेटोळे घालून बसला होता. त्यात भर म्हणजे स्वयंपाक करणा-या बाईंचं बोलणं.

क्षणभर प्रतीकने डोळे मिटले. नंतर उठून त्याने डोळ्यांवर पाण्याचे हबके मारून चेहरा धुतला. त्याला जरा बरं वाटलं. मानेला एक झटका देऊन तो कामाला लागला.

***

प्रतिक ऑफीसचं कामच करत होता तेव्हा नयनाचा फोन वाजला. प्रतिकने बघीतलं नयनाच्या आईचा फोन होता.प्रतिकने फोन उचलला,

" काय ग नयना किती फोन करायचा तुला? एवढी कसली कामात बिझी असते?"

" आई मी प्रतिक बोलतोय."

नयनावर ओरडणा-या आई एकदम शांत झाल्या. त्यांना कळेना नयनाच्या फोनवरून प्रतिक का बोलतोय.

" प्रतिक तुम्ही कसं बोलताय? नयना कुठे आहे? यावेळी तर ती ऑफीसमध्ये पोचलेली असते."

" हो. तुमचं खरय. पण आज नयनाला जरा बरं नाही. ती झोपली आहे म्हणून मीच तिचा फोन बाहेरच्या खोलीत घेऊन आलो आहे. आत्ता तुमचा फोन आला म्हणून मी उचलला."

प्रतिकने त्यांना सविस्तर स्पष्टीकरण दिलं.

" बरं नाही. काय झालं? परवा माझ्याशी बोलली तेव्हा काही म्हणाली नाही. अचानक काय झालं?"

नयनाच्या आईला अचानक नयना आजारी कशी पडली हे कोडं काही सुटेना.

"तुम्ही टेन्शन घेऊ नका. सर्दी खोकला झाला आहे. खोकल्याची उबळ येते होती सारखी त्यामुळे रात्रभर तिला स्वस्थ झोप लागली नाही. आता जरा डोळा लागला आहे. ती उठली की मी तिला सांगतो तुम्हाला फोन करायला."

" हो सांगा आणि हो व्हिडिओ काॅल करायला सांगा. मला दिसेल माझी लेक तर जरा बरं वाटेल.'

नयनाच्या आईचा जीव टांगणीला लागला.

" अहो एक दिवस आधी आम्ही फोनवर बोललो आणि आता लगेच कशी ही आजारी पडली?

प्रतिकला नयनाच्या आई एवढ्या घाबरल्या का ते कळलं नाही. माणूस कधी आजारी पडेल हे कुठे सांगू शकतो. नयना सारख्या खंबीर मुलींची या खरच आई आहे नं!

हा प्रश्न मनात येताच प्रतिकला हसायला आलं. तेवढ्यात त्या पुढे म्हणाल्या,

"तुम्हाला सांगते ही नयना लहानपणापासून अशीच आहे. सगळं दुखणं अंगावर काढते. मग त्रास होतो आणि तो तिलाच होतो. तरी कळत नाही या मुलीला वेळेवर औषधपाणी करावं. माझं तर ऐकत नाही ती. तुम्ही तिला जरा धारेवर धरा. असं दुखणं सतत अंगावर काढून शरीराची किती झीज होते हे या मुलीला कळतच नाही. आत्ता तिला माझ्या बोलण्याचा कंटाळा येतो पण एकदा चाळीशी उलटली की शरीराची कशी कुरकूर सुरू होते ते तेव्हा कळेल. मग जीवाला स्वस्थता लाभणार नाही. मी इतकी वर्ष तिच्या मागे ओरडून थकले. तुम्हीच सुधारवा आता. तिला व्हिडिओ काॅलच करायला सांगा. नाहीतर मी करते."

" नको.मी सांगतो तिला. ती कधी उठेल माहिती नाही."

" ठीक आहे. ठेवते फोन "

असं म्हणून नयनाच्या आईने फोन ठेवला.

" चला कामाला लागू. एकदा जरा नयना मॅडम कडे बघू या."

असं स्वतःशीच बोलत लॅपटाॅप बाजूला ठेवून प्रतिक उठून बेडरूमकडे गेला.

प्रतिक बेडरूमच्या दाराजवळ पोचला आणि तो जागीच थबकला. प्रतिकला काय करावं कळत नव्हतं त्याची मती गुंग झाली आणि डोळे विस्फारले.

_________________________________
प्रतिकने असं काय बघीतलं? बघू पुढील भागात.


0

🎭 Series Post

View all