शील - भाग 3
तिनं दोन ताटं काढली. दोन वेगवेगळ्या आकाराची ती ताटं जुनाट आणि फाटलेली होती. कधीकाळी केलेला भात आणि बाजूला तिखटाची चटणी असं तिने ताटात वाढलं आणि यशसमोर सरकवलं. गपगुमान दोघं जेवू लागले. यशने मग माठातून एका हाताने दोघांसाठीही पाणी आणले. एक हात उष्टा असल्याने तो त्याने ग्लासला लावला नाही. त्याची ती तारेवरची कसरत बघुन त्या स्थितीतही त्या बाईला हसू आले. यशने ते बघितले आणि तोपण जरा हसला.
जेवण झालं तसं त्या बाईने सगळं नीट आवरुन ठेवलं. आणि ती पुन्हा एका कोप-यात जाऊन बसली. वातवरण थोडं normal झाल्यासारखं वाटल्याकारणाने यशने ब-याच वेळापासून मनात असलेला प्रश्न विचारला.
“मगाशी तुम्ही का ओरडलात? काय झालं?”
“…”
“हे बघा नसेल सांगायचं तर राहू द्या. काही हरकत नाही. It’s ok.”
“नाय असं कायबी नाय. काय लपवनार.. आपलंच नशीब खराब त्याला कोन काय करनार?”
“नाव काय तुमचं? आणि ते गेले त्यांचं काय नाव?” त्या माणसाला आपण नावंच नाही विचारले हे आत्ता ध्यानात आले त्याच्या.
“माया नाव रखमा अन् त्यो माया नवरा बाबुराव. नवरा पन का म्हनावं. कुटल्या जन्माचं वैरी हाय काय मायात. माया बहिनीला मारलं आन आता माया जीव घेतोय. ते पोर माया बहिनीचंच लक्सीचं. बाबुराव आन तिचं लगीन झालं आन पोर आलं तोवर best चाललं. मंग कुटून काय मायात याला दारुची संग लागली आन समदं बिघडलं. लक्सीला रोज मारायचा. तेपन सोसलं तिनं पन किती सोसनार ना. येक्दा लाय वरडली. तर ह्यानं इकली तिला. तिला सहन नाय झालं तर जीव दिला. मला ती समदं सांगायची. ती गेली आन पोर माय बिगर कसं राहिल म्हनुन माज़ं लगीन करवलं. माया कोनिबी येक्लं नाय. आता पन तुमी येन्याच्या अगोदर मला तुमच्यासोबत रात्र….” रखमाला पुढे बोलवत नव्हतं. तिने एका दमात सगळं सांगून दिलं. जणुकाही मनातलं दुखाचं ओझं उतरलं होतं.
यशने हे सगळं ऐकलं आणि तो सुन्न झाला.
“पन म्या लडनार हाय. माया लक्सीसाटी. तिच्या पोरासाटी. स्वतालाबी जपनार आन पोरालाबी.”
“पण काय करणार तू?”
“धुनीभांडी करुन शिक्तेपन म्या. आमच्या बाई आमाला चांगलं काम देनार हायत. थोडा पैका जमला की माया पोराला घेऊन निघून जाईन इथुन आन या मेल्याची पोलिसात तक्रार बी करन.”
“ती तर तू आत्ता पण करु शकतेस.”
“ व्हय पन सोपं नाय ना साहेब एक्ल्या बाईला राहनं. आन पैकाबी तर लाग्तुया.”
“पन त्यानं पुन्हा असं काही केलं तर? सगळेच काही सरळ नसतात.”
“माया लढा मीच लढला पायजे ना साहेब”
रखमा असं बोलली आणि यश विचारात पडला. काय चुकीचं बोलली ती? माझा लढा मीच लढला पाहिजे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा