माझा लढा मीच लढला पाहिजे या विचारातंच यश झोपला. जाग आली तेव्हा पहाट झाली होती. लोकांची नित्याची कामे चालू झालेली. त्याने रखमाची चाहुल घेतली तर ती कपडे वाळत टाकत होती. तो उठलेला बघुन तिने त्याला मंजन दिले. दात घासून झाले तसे चहा दिला. तिने केलेला असा पाहुणचार बघुन त्याला अवघडल्यासारखेच झाले. तिला समजले तसे तिने म्हटले.
“तुमी समद्यांसारखे न्हाय.”
यश हसला. चहा झाल्यावर त्याने स्वत:चे आवरले आणि रखमाचा निरोप घेऊन निघू लागला. कुठे जायचंय हे तर त्याला माहीत नव्हते. पण जाणं तर भाग होतं. तेवढयात त्याला काही आठवले. हात नकळत खिशाकडे गेला. 500 च्या चार नोटा काढून रखमाला देऊ लागला. तसं रखमा म्हणाली,
“ज्यासंगं सौदा केला त्यालाच द्यावं.”
यशला तिच्या बोलण्यामागची वेदना जाणवली. तो थोडा शरमला. मग म्हणाला,”हे पैसे एका भावाकडून बहिणीला मदत आहे असं समज.”
“बाबूरावला समजलं तर राडा घालंल.”
“सांगू नकोस.” रखमानं ते पैसे घेतले आणि पदरात लपवले. तेवढ्यात बाबूराव आलाच पोराला घेऊन. यश जातोय बघुन त्याच्याकडून पैसे मागू लागला. त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही हे त्याच्या तोंडातून येणा-या वासावरुनच समजलं यशला. यशने अजुन 500 रुपये काढून बाबूरावला दिले.
“काय वं साहेब 2000 ठरंलं व्हतं ना?”
“एवढेच आहेत माझ्याकडे आत्ता. घ्यायचे तर घे.”
त्रासिक मुद्रेने बाबूरावने ते पैसे घेतले आणि रखमाला दोन शिव्या हासडल्या. मग तो डुलत डुलत खोपटात शिरला. यशने रखमाचा निरोप घेतला आणि आपल्या वाटेला लागला.
यश एका आलिशान सोसायटीत 1BHK च्या फ्लॅट मधे भाडेतत्वावर रहात होता. त्याचं ऑफिस 15 मिनिटांच्या अंतरावरंच होतं. परंतु पोलिस चौकशी होईल म्हणून तिकडे जावं की नाही या संभ्रमात तो होता. तेवढयात त्याला जुईली आठवली. जुईली त्याच्यासोबत कॉलेज मधे शिकायची. आयटी क्षेत्रातंच काम करत होती परंतु दुस-या कंपनीत. तीदेखील फ्लॅट घेऊन रहात होती. आणि महत्वाचं म्हणजे यशची चांगली मैत्रीण होती. मग यशने आपला मोर्चा जुईलीकडे वळवला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा