Login

श्वासातून... श्वासापर्यंत भाग:२

पती पत्नीच्या भावनिक संघर्षाची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - श्वासापासून... श्वासापर्यंत
भाग: २


असेच तीन महिने गेले.

रोहन मानसीची खूप काळजी घेत होता. डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की, गर्भावस्थेचे पहिले तीन महिने सर्वात महत्त्वाचे असतात. त्यामुळे तो तिला नाजुक फुलासारखी जपत असे. घरी तो तिला कुठलेच काम करु देत नव्हता.

"अरे, मला काहीतरी काम करू दे. अशी बसूनच राहिली, तर मी जाडी होईन." स्वयंपाक बनविणाऱ्या रोहनकडे बघत मानसीने म्हटले.

"लठ्ठ झाली तरी चालेल, पण मी तुला काम करू देणार नाही. तू ऑफिसला जाते-येते तेच खूप झाले. तू तिथे ऑफिसला असतेस, पण इथे माझा जीव वर खाली होतो. तुझ्यामुळे माझे माझ्या कामात लक्षच लागत नाही." रोहन आपले काम न थांबवता म्हणाला.

" मला एक सांग, तुला नक्की माझी काळजी आहे? की तुझ्या बाळाची? कारण या आधी तर तू मला कधीच अशी मदत करत नव्हतास." मानसीने हसत मस्करीने म्हटले.

"तुला हवं तर माझ्या बाळाचीच काळजी समज, पण तू काम करायचे नाहीस." रोहनने आदेशच दिला.

"बरं बाबा." असे म्हणत मानसीने वीणकाम हातात घेतले.

"अगं, हे सगळे कशाला करतेस?" रोहनने तिच्या हातातला दोरा आणि सूत पाहून म्हटले.

" कशाला म्हणजे? आपल्या बाळासाठी."

" आपण हे विकत आणू शकतो. कशाला त्रास करुन घेतेस?"

" स्वतःच्या हाताने बनवलेल्या या वस्तूंमध्ये आईच्या 'मायेचा स्पर्श 'असतो, तो विकत घेतलेल्या वस्तूंमध्ये नसतो."

" बापरे! आईची माया वगैरे केवढे मोठे शब्द वापरतेस? अगं, तुला काही खावेसे वगैरे वाटत नाही का?" बाहेर येऊन तिच्यापाशी बसत विचारले.

"खावेसे वाटत नाही म्हणजे? मी माझे जेवण बरोबर करते."

"अगं तसं नाही, डोहाळे वगैरे." रोहनने मोठ्या कुतूहलाने विचारले.

"तसे माहित नाही, ए रोहन, आज मला पाणीपुरी खावीशी वाटते."

"काय? पाणीपुरी?"

"हो, खरेच. प्लीज, आण ना रे एक. चल, आत्ताच घेऊन ये." मानसीने आपल्या मनातली इच्छा बोलून दाखविली.

"अगं, पण आता जेवण करायचे आहे, आणि आता मी तुला डोहाळ्यांबद्दल विचारले म्हणून तुला पाणीपुरी आठवली? उद्या आणतो."

"उद्या नको, मला आत्ताच पाहिजे." मानसीने हट्टच धरला.

"अगं पण ते पाणीपुरीवाले कुठले पाणी वापरतात, ते देवच जाणे. मी माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेणार नाही. मी तुला पाणीपुरी आणून देणार नाही." रोहनने स्पष्टपणे सांगितले.

" पण मला पाहिजे."

" नाही म्हणजे नाही."

" एकदाच, परत मागणार नाही... प्लीज, प्लीज, प्लीज." मानसी आशेने हात जोडत म्हणाली.

"बरं, आणतो." मानसीच्या हट्टापुढे रोहनला पराभव स्विकारावा लागला आणि तो मानसीसाठी पाणीपुरी आणायला गेला.

'डोहाळे कसे असतात ते आज समजले.' पाणीपुरी आणण्यासाठी जात असताना रोहन मनातच हसत म्हणाला.

या बाजूला रोहन बाहेर गेल्यानंतर मानसीच्या पोटात अचानक एक भयानक कळ आली. तिला खूप त्रास होऊ लागला. तिने आपले वीणकाम बाजूला ठेवले आणि ती तिथेच सोफ्यावर आडवी झाली.

काही वेळाने रोहन पाणीपुरी घेऊन घरी परतला.

" घ्या मॅडम, तुमची पाणीपुरी आणली आहे." रोहनने पाणीपुरीची पिशवी तिच्यासमोर धरत म्हटले.

मानसीने काहीच उत्तर दिले नाही. ती पोटाला धरुन होती.

"काय गं, काय झाले? तू अशी का झोपली आहेस?" रोहनने तिच्या अस्वस्थ चेहऱ्याकडे पाहून विचारले.

" पोटात या बाजूला जरा दुखत आहे." तिने डाव्या बाजूला हात ठेवत सांगितले.

"काळजी करू नकोस. प्रेग्नन्सीमध्ये कधी कधी पोटात अशा कळा येतातच."

"नाही रे रोहन, या तशा कळा नाहीत. हे जरा विचित्रच दुखत आहे."

"हो का, आपण डॉक्टरकडे जाऊया का?"

" नको. आता नको. उद्या जाऊ."

दुसऱ्या दिवशी रोहन मानसीला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्यांना 'स्कॅन' करायला सांगितले. काहीवेळाने रिपोर्टस पण आले.

रिपोर्टस् पाहून डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

" काय झाले डॉक्टर? काही चिंताजनक आहे का?"
रोहनने जरा घाबरुनच विचारले.

" रोहन, मानसीच्या आतड्याला अल्सर आहे."

क्रमशः

0

🎭 Series Post

View all