Login

श्वासातून... श्वासापर्यंत भाग:१

पती आणि पत्नीच्या भावनिक संघर्षाची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - श्वासातून... श्वासापर्यंत
भाग: १


"काय?" प्रेग्नेंसी डिटेक्शन किटवर आलेल्या दोन गुलाबी रेषा पाहून मानसीच्या चेहऱ्यावर हास्य आले.

तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला आपला आनंद कसा व्यक्त करावा हेच समजत नव्हते.

ती धावत आपल्या बेडरूममध्ये आली. पलंगावर रोहन आरामात झोपला होता. तिने त्याच्या अंगावरची चादर ओढली आणि त्याला गदगदा उठवले.

"काय गं? झोपू दे ना जरा." रोहनने बाजूची उशी काढून आपल्या कानावर धरली.
मानसीने ती उशी काढून दूर फेकली, "ए रोहन, बघ तरी."

"काय झाले?" रोहनने डोळे न उघडताच विचारले.

मानसीने 'प्रेग्नेंसी डिटेक्शन किट' त्याच्या डोळ्यासमोर धरली. त्याने हळूच डोळे उघडले आणि 'किट'कडे पाहिले.

"तू बाबा होणार आहेस." मानसीने हळू आवाजात सांगितले.

हे ऐकताच झोपेत असलेला रोहन गडबडून जागा झाला आणि उठून पलंगावरच मांडी घालून बसला. त्याने तिच्या हातातली 'किट' आपल्या हातात घेतली.

"खरंच का?" त्याने मानसीकडे पाहत पुन्हा विचारले.

"हो रे बाबा." मानसी हसली.

"अगं, पण तुला नक्की माहित आहे ना? म्हणजे कसे वापरायचे ते. दोन लाईन म्हणजे पॉझिटिव्ह? अगं कोणाला तरी विचारून बघ."

"त्याची काही गरज नाही. मला माहित आहे." मानसीने पुन्हा हसत म्हटले.

हे ऐकताच रोहनच्या चेहऱ्यावरही हसू आले. त्याने आपला खालचा ओठ दाताने दाबत, तिला ओढत आपल्या कुशीत घेतले.

रोहनच्या चेहऱ्यावरची खुशी स्पष्टपणे दिसत होती.

"आय लव यू. खरंच अजुनही विश्वास बसत नाही. गेली सहा वर्षे या क्षणाची वाट पाहत होतो."

"हो रे, फायनली. मी पण. लोकांनी तर हैराण करून सोडले होते. 'कधी होणार? कधी चान्स घेता? प्लॅनिंग करत आहात का?' कोणी विचारत होतं. 'डॉक्टरला भेटलेत? काही जणींनी तर गायनाकॉलॉजिस्टचे नंबर पण पाठवले होते. वैताग आला होता रे. याचमुळे कुठेही फंक्शनला, कार्यक्रमाला जावेच असे वाटत नव्हते."

"मला सुद्धा टोमणे मारायचे मित्र. माझ्यामागे खूप काही काही बोलत होते." रोहनने मानसीचा हात हातात घेत म्हटले.

"असू दे, जे झाले ते झाले. आता आपण या क्षणाचा आनंद घेऊया."

"मानसी, आपल्या दोघांचे आई-बाबा असते तर किती छान झाले असते, नाही गं? माझ्या आई-बाबांना या क्षणाचा आनंद घेता आला नाही, याचे दुःख वाटते. आई असती तर आनंदाने वेडी झाली असती. ही बातमी शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगत सुटली असती आणि बाबा… ते तर नेहमीच म्हणायचे, ' नातवंडे अंगावर खेळवली की जन्माचे सार्थक झाले असे समजायचे.' पण दैवाने कसा खेळ खेळला बघ, त्यांना हा आनंद उपभोगूच दिला नाही."

"मी पण माझ्या आई-बाबांना खूप मिस करते रे. आई असती तर माझे पहिले बाळंतपण माहेरीच केले असते. मला काय हवे, काय नको, ते सगळे पाहिले असते. मी पण माझे सगळे डोहाळे तिच्याकडून पुरवून घेतले असते. पण आता आपले कसे होणार?"

"कसे होणार म्हणजे काय गं? आपल्याला कशाची कमी आहे? मी पुरवतो ना तुझे डोहाळे."

"मी त्याबद्दल म्हणत नाही. बाळंतपण म्हणजे सोपी गोष्ट नाही रे रोहन. दोघांच्याही नोकऱ्या सांभाळून हे नऊ महिने तारेवरची कसरत करावी लागणार आहे आपल्याला."

"मी असताना तू कशाला घाबरतेस? तू बिनधास्त रहा. मी तुला कशाचीच उणीव भासू देणार नाही. आता मीच तुझी आई, मीच तुझा बाबा, मीच तुझी सासू आणि मीच तुझा सासरा."

" माहित आहे मला, माझा नवरा खूप 'स्ट्राँग' आहे."