Login

समांतर रेखा भाग 1

प्रेमाची अगतिकता दाखवणारी एक हळवी कथा..
समांतर रेखा भाग : 1
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025.

अर्चनाचा नवरा गेला आणि तिचं जगणं जणू थांबूनचं गेलं. शरीराच्या कणाकणातून वाहणारा रक्तप्रवाह जणू गोठून गेला. काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. दृष्ट लागावी असा तिचा संसार एका क्षणात होत्याचा नव्हता झाला होता. सोन्यासारख्या नवऱ्यावर काळाने घाला घातला होता आणि अर्चना उध्वस्त झाली होती. कधी कोणाचं वाईट करणं तर सोडा पण तिने कधी चिंतलंही नव्हतं.

अर्चनाच्या सुरेख चेहऱ्यावरची रयाचं उतरून गेली. ती कोणाशी बोलेना, धड खात पितही नव्हती. कपाळावर सवयीप्रमाणे टिकली लावत तर होती पण चेहऱ्यावरचं तेज पार झाकोळून गेलं होतं. नवरा असतांना हौसेनं केलेलं, सोन्याचं भरगच्च गंठण ती पूर्वी रोज घालत असे, पण आता वैधव्य नशिबात आल्यावर गळ्यात नुसती एक सोन्याची चेन आली. कोणीतरी त्याच रात्री तिचं आवडतं गंठण तिच्या गळ्यातून काढून ठेवलं होतं. कधीमधी आरशात पाहिल्यावर त्या ओक्याबोक्या गळ्याला पाहून तिला रडू यायचं. पूर्वी हातात कायम हिरवा चुडा ल्यायलेल्या अर्चनाला आपले ओकेबोके हात भुंडे झाल्यासारखे वाटायचे. वाटायचं आपल्यासारखे आपले हातसुद्धा आताशा दुबळे आणि अगतिक होऊन गेले आहेत.

पण आता काहीही वाटलं आणि कितीही दुःख केलं तरी सत्य बदलणार नव्हतं. अर्चनाला मुलाबाळांची कोण हौस! लग्न होऊन पाच वर्ष उलटली पण तिची कूस मात्र उजवली नाही. त्या दोघांनी कित्येक उपाय केले पण फळ काही मिळालं नाही परंतु लहानसहान गोष्टीसाठीसुद्धा आपल्या मागे पुढे करणारा, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्यावर अवलंबून असणारा आपला नवरा तिच्या "आईपणाची" जणू हौस भागवत होता. आपण आपल्या नवऱ्याचं लहान लेकराप्रमाणे सगळं करतो आहोत ह्याचा कोण आनंद अर्चनाला व्हायचा. अर्चना संपूर्ण दिवस त्याच्याच नादात राहायची.

नवऱ्याला आवडतं ते रांधून ठेवणं, त्याच्या वस्तू जागच्या जागी लावून ठेवणं आणि नं जाणो त्याच्या कित्येक गोष्टींत ती रमलेली असायची. त्यानं तिच्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव हेंच तिचं संसार सुख होतं. त्यात अर्चनाला आनंद वाटायचा. तो सुद्धा अर्चनावर मनापासून प्रेम करायचा. जीव ओवाळून टाकेल इतकी भरभरून माया करायचा. त्यामुळे अर्चनाला आपल्याला मुल नाही ह्याचं फारसं दुःख कधी वाटलं नव्हतं. मनात तसा विचार आला की ती आपल्या भरल्या संसाराकडे पाहायची आणि दुःखाचा घोट सहज गिळून टाकायची.

पण अचानक आलेल्या मृत्यूने त्यांच्या गोड संसाराचा घास घेतला आणि सगळं चित्रंच पालटलं. सगळ्यांत आधी अर्चनाला आपण "आई" झालो नाहीत ही पोकळी जाणवू लागली. आई नाही पण आता आपण "पत्नी"सुद्धा नाही राहिलो म्हणून तिच्या काळजात तुटत राही. बोलणार तरी कोणाजवळ ती? मनातले कढ मनातचं जिरवत होती.


पहिला भाग क्रमशः........
©️®️सायली पराड कुलकर्णी

0

🎭 Series Post

View all