सांजवेल....भाग......03
सांजवेळ होती. पावसाने नुकतीच धरती ओली केली होती. झाडांच्या फांद्यांवरून थेंब अजून टिपकत होते. कबीर नेहमीप्रमाणे गावाच्या टोकाला असलेल्या तलावाच्या काठावर उभा होता. तिथेच तो आणि केतकी पहिल्यांदा भेटले होते आणि शेवटचंही.
केतकी ने कधीच कारण सांगितलं नव्हतं, का ती त्याला सोडून गेली. ना वाद, ना कटुता, फक्त एक मौन. एका सकाळी ती निघून गेली आणि कबीरच्या आयुष्यात अनंत प्रतिक्षेचं ओझं ठेवून गेली.
कबीरला वाटत होतं, उद्या ती परत येईल. मग दुसऱ्या दिवशी तोच विचार. दिवस महिन्यांत बदलले, महिने वर्षांमध्ये पण ती आली नाही. केतकीचं हास्य, प्रेम फक्त आठवणीत राहिलं. कबीर तिला विसरू शकला नाही.
तलावाच्या काठावर तो रोज यायचा. पावसाच्या सरींमध्येही, उन्हाळ्याच्या प्रखर दुपारीही, हिवाळ्याच्या शहारवणाऱ्या रात्रीही. त्याच्या नजरेत कायम एकच शोध केतकीचा. “आज तरी येईल का?” या आशेवर तो जीवन जगत होता पण नेहमीच त्याच्या पदरी निराशा येत होती आणि त्याचे डोळे ओले व्हायचे.
लोक म्हणू लागले “कबीर वेडा झाला. एक गेली, दुसरी शोध. एवढं आयुष्य आहे पुढे.”पण कबीरच्या मनाला दुसरी कुणी स्पर्शू शकली नाही. त्याच्या आत्म्यात केतकीचं नाव कोरलं गेलं होतं. एवढं की त्याचा आत्मचा तिला एकरूप झाला होता.
वर्षे गेली. कबीरच वय वाढत होत त्याच्या डोळ्यांखाली काळ्या सावल्या उतरल्या, केस पांढरे झाले पण तलावाच्या काठावर त्याची वाट पाहणारी नजर मात्र कधीही थकली नाही.
एका संध्याकाळी, अगदी ओली झालेली संध्या होती. आकाश रक्तवर्णी झालं होतं. कबीर नेहमीप्रमाणे तलावाच्या काठावर बसला होता. अचानक त्याच्या डोळ्यांसमोर धूसर होत चाललं. शरीर जड झालं.
तो कुजबुजला, “केतकी… आलीस का?” पण ती फक्त वाऱ्याची एक सरसर होती, की खरोखरच तिचा आवाज कोणी सांगू शकत नव्हतं.
तो कुजबुजला, “केतकी… आलीस का?” पण ती फक्त वाऱ्याची एक सरसर होती, की खरोखरच तिचा आवाज कोणी सांगू शकत नव्हतं.
त्या सांजवेळी तलावाच्या काठावर कबीरनं शेवटचा श्वास घेतला. ओठांवर केतकीचं नाव होतं, डोळ्यांत वाट पाहण्याची शेवटची व्याकुळता होती. पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडत होते जणू आभाळही त्याच्यासोबत रडत होतं आणि गावकऱ्यांना त्या दिवशी उमगलं होतं “ओल्या सांजवेळी” केवळ पावसाचा शोक नव्हता, तर एका हृदयाची अंतहीन प्रतिक्षाही होती.
.... ✍️ जगदीश लक्ष्मण वानखडे.
©® All Rights Reserved...
©® All Rights Reserved...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा