Login

लग्न – एक छलावा भाग १५

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
" याला थोडा वेळ याच्या बायकोला आत जाऊन भेटू द्या आणि हो फक्त थोड्या वेळासाठी तुझ्या बायकोला भेटणार आहे.... तोपर्यंत इकडे पोलीस स्टेशनमध्ये कोणताही आरडाओरडा करायचा नाही...... " मुख्याधिकारी धर्मेश कडे पाहून त्याला वॉर्निंग देतात आणि आपल्या हवालदारांकडे पाहून त्यांना इशारा करतात..... तसे ते दोन हवालदार धर्मेशला भार्गवी जिकडे असते तिकडे घेऊन जातात.....

आत्ता पुढें,

धर्मेश त्या हवालदारा सोबत भार्गवी ला ज्या जेल मध्ये ठेवलेले होते तीकडे आला..... धर्मेश ला समोर पाहून भार्गवी चे मन भरून आले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले....

हवालदार दरवाजा खोलतो तसा धर्मेश पटकन आत येतो.... तो पुढे येत असताना त्याचे लक्ष्य तिच्यापासून काही अंतर मागे उभ्या असलेल्या मिस्टर विश्वास वर जाते.... तसा धर्मेश बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागतो.... त्याला तिकडे पाहून अचानक धर्मेशच्या मनामध्ये राग निर्माण होऊ लागतो.....

" हवालदार मला माझ्या बायको सोबत थोडा वेळ बोलायचे होते..... मी बोलू शकतो का ? " धर्मेश मिस्टर विश्वास कडे पाहतच आवाजात जरब आणत बोलतो....

" हो तुम्हाला बोलायची परमिशन मिळाली आहे म्हणूनच तर इकडे घेऊन आलो आहे ना , पण जास्त वेळ देता येणार नाही त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते लवकर बोलून घ्या.... " हवालदार बोलतच तिकडून निघून जातो.... त्याला धर्मेशच्या बोलण्याचा अर्थ समजत नाही, पण मिस्टर विश्वास यांना मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ बरोबर समजलेला असतो त्यामुळे ते पण काही न बोलता तिकडून बाहेर पडतात..... जाताना त्यांची नजर भार्गवी वर असते....


' शिट यार! एवढी मेहनत करून मी तिला बोलायला भाग पाडले होते पण मध्येच धर्मेश ने येऊन सगळी वाट लावली....अजून थोडा वेळ फक्त जर हिचा नवरा आला नसता , तर आता  पर्यंत भार्गवीने तिला हे सगळं कशासाठी करावे लागले हे सगळं मला सांगितले असते... त्या पैशांच्या घोटाळ्याबद्दलही समजले असते...' मिस्टर विश्वास बाहेरून जाताना धर्मेश कडे पाहत  मनामध्ये विचार करतच जातात.... धर्मेश ही त्यांच्याकडे रागाने पाहत असतो.....

" हा माणूस इकडे काय करत होता भार्गवी ? तो इकडे नक्की कशासाठी आला होता ? " धर्मेश भार्गवी कडे पाहून तिला रागानेच प्रश्न विचारतो.....

" धर्मेश मला तो माणूस समजदार वाटतो....  आपण जर त्याच्याशी बोलून त्याला आपला प्रॉब्लेम सांगण्याचा प्रयत्न केला तर तो आपली नक्की मदत करेल..... " भार्गवी मिस्टर विश्वास यांचे बोलणे आठवत धर्मेशला सांगू लागते....

" भार्गवी,  तू वेडी आहेस का ग! अग तो पोलिसांचा माणूस आहे..... त्याला जर आपण सगळी गोष्ट सांगितली,  तर आपण  जास्तच मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकू... " धर्मेश चिडून तिच्याकडे पाहून बोलू लागतो....

" नाही धर्मेश तो पोलिसांचा माणूस नाही आहे.... तो फक्त पोलिसांच्या बोलण्यावरून इकडे  आपल्या लॅपटॉप मध्ये काही भेटतं का नाही , ते शोधायला आला होता....  बस अजून काही नाही.... त्याचा पोलिसांसोबत काहीही संबंध नाही..... " भार्गवी धर्मेश कडे पाहून त्याला समजावण्याचा प्रयत्न करते.....

" हो का आणि ही गोष्ट तुला कोणी सांगितली ? " धर्मेश रागाने तिच्याकडे पाहून तिला विचारतो....

" मिस्टर विश्वास यांनी स्वतः मला आता थोड्या वेळापूर्वी ही गोष्ट सांगितली आणि ते मला असेही बोलले की , ते आपले चांगले मित्र बनून आपल्याला या प्रॉब्लेम मधून काढण्याचाही प्रयत्न करतील फक्त जे काय झालं आहे ते त्यांना सांगावे लागेल..... " भार्गवी त्यांचं बोलणं आठवून धर्मेशला सांगू लागते....

" ते बोलले तुला आणि तू त्यांच्यावर विश्वास पण ठेवलास , एवढं असे किती दिवस ओळख आहे तुमची ? कालचा आलेला तो माणूस दोन शब्द तुझ्यासोबत गोड बोलतो काय आणि तू लगेच डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ही ठेवून मोकळी होते.... " धर्मेश रागाने तिच्याकडे पाहून बडबड करू लागतो...

" धर्मेश अरे तू असं का बोलत आहेस ? आता सध्या आपल्याला मदतीची गरज आहे आणि कोणी जर समोरून येऊन आपली मदत करत असेल,  तर चांगलंच आहे ना.... शिवाय त्यांच्या बोलण्यावरून ते मला चांगले वाटले...." भार्गवी काकुळीने धर्मेश कडे पाहून त्याला सांगण्याचा प्रयत्न करते..... सकाळी पोलीस तिला हातकडी घालून सगळ्यांसमोर पोलीस स्टेशनला घेऊन आलेले असतात.... आजचा पूर्ण दिवस तिने या पोलीस स्टेशनच्या कस्टडी मध्ये काढलेला असतो त्यामुळे सध्या तिच्या मनाची व्यथा ही फक्त तिलाच समजत असते....

" भार्गवी मूर्खासारखे काहीही बोलू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव , कोणी कितीही गोड बोलून तुला विचारायचा प्रयत्न केला तरी तू कोणाला काहीही सांगणार नाही आहेस.... " धर्मेश तिला वॉर्निंग देतो.....

" धर्मेश जर मी कोणाला काही सांगितले नाही,  तर मग कोण माझी मदत करणार..... मला या जेलमध्ये राहायचे नाही....  मला कोण इकडून बाहेर काढणार आहे.....  तू सांग मला , तू काढशील का बाहेर मला इकडून ?  सकाळी हे पोलीस घरातून मला इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि तू , तू आता संध्याकाळी मला भेटायला इकडे आला आहेस..... अरे मी तर सकाळपासून तुझी आतुरतेने वाट पाहत होते.... मला वाटलं होतं माझा नवरा धावत पळत माझ्या मागे येईल , पण तू माझ्यासाठी या पोलीस स्टेशनमध्ये यायलाही संध्याकाळ केलीस..... " आता हळूहळू भार्गवी चा पारा ही चढू लागतो आणि ती रागामध्येच धर्मेश कडे पाहून बोलते.....

" भार्गवी खरंच एका महत्त्वाच्या कामांमध्ये अडकलो होतो म्हणून लवकर इकडे येऊ शकलो नाही आणि मी जे काही करत आहे,  ते आपल्या सगळ्यांसाठीच करत आहे ना..... " धर्मेश लगेच स्वतःचा चेहरा शांत करत तिच्याकडे पाहून बोलतो....

" धर्मेश असे कोणते महत्त्वाचे काम होते की,  ज्याच्यासाठी तुला मला इकडे एकटीला असे सोडून जावे लागले..... आपल्या बायकोला पोलीस पकडून घेऊन गेले आहे, ते पण अशा गुन्ह्यासाठी जो गुन्हा तीने आपल्या नवऱ्यासाठीच केला आहे....  याच्या पेक्षाही दुसरे महत्त्वाचे काम असू शकते का ? " भार्गवी त्याच्या डोळ्यात पाहून त्याला प्रश्न विचारते....

" Shhhh..... भार्गवी प्लीज शांत रहा आणि आता तो विषय इकडे काढू नकोस.... इकडे जर का कोणी ऐकले तर परत मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल..... " तिचं बोलणं मध्येच तोडत धर्मेश तिला शांत करून घाबरूनच आजूबाजूला पाहू लागतो...... कोणी चुकून जर का बोलणं ऐकलं तर तोही मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकेल,  याची भीती त्याच्या मनाला वाटू लागते त्यामुळे तो घाबरूनच आजूबाजूला कोणी आहे का नाही हे बघण्यासाठी सगळीकडे नजर फिरवतो.....

" आता काय झालं धर्मेश इतका वेळ तर मला समजावत होतास आणि जेव्हा गोष्ट आता तुझ्यावर आली तेव्हा बरोबर घाबरलास...... " भार्गवी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत त्याला बोलते....

" हे बघ भार्गवी तू शांत हो आणि इकडे बस..... आधी मी काय बोलत आहे ते व्यवस्थित ऐकून घे आणि मगच तुला पुढे काय करायचं आहे त्याचा विचार कर.... " धर्मेश तिला शांत करत त्या कोपऱ्यात असलेल्या बाकड्याच्या जवळ घेऊन जाऊन तिला बसवतो....

" तुझ्याकडे अजूनही बोलायला काही आहे का ? " भार्गवी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारते.....

" हो , आता माझ्याकडे बोलायला जरी काही नसले तरी एक असा व्हिडिओ आहे , जो तुला दाखवला तर तुझी पण बोलती बंद होईल..... " धर्मेश शांतपणे बाजूला बसत तिच्या कडे बघून बोलतो .....

" व्हिडिओ , कसला व्हिडिओ.... " त्याचं बोलणं ऐकून आता भार्गवीच्या मनातही वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात.....

" हे बघ..... " असे बोलून धर्मेश आपला मोबाईल खिशातून बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ ओपन करून भार्गवीच्या हातात देतो...... भार्गवी व्यवस्थितपणे तो व्हिडिओ पाहू लागते,  पण ती जसा तो व्हिडिओ पाहत असते , तशी तिच्या  चेहऱ्यावर काळजी दाटून येऊ लागते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात......

धर्मेश तिच्या बाजूला बसूनच एक नजर त्या व्हिडिओकडे पाहून भार्गवीच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत असतो....सोबतच कोणी त्यांच्या दिशेला येत तर नाही ना , यासाठी बाहेरही नजर ठेवत असतो.....

" धर्मेश हे sss हे सगळं काय आहे ? हे कोणी केले ? धर्मेश प्लीज काहीतरी करा..... काही नाही झालं पाहिजे , वाचवा.... धर्मेश प्लीज काहीतरी बोला...... हे sss हे सगळं, हा व्हिडिओ तुमच्याकडे कसं काय आला ? " फोन मधला तो व्हिडिओ बघून भार्गवी खूपच घाबरून गेलेली असते...  तिच्या डोळ्यातून कंटिन्यूअसली अश्रू वाहू लागतात.... भार्गवीला काय करावे ते सुचत नसते..... खूपच घाबरल्यामुळे तिचे संपूर्ण शरीर थरथर करू लागते.... भीतीने तोंडातून शब्द पण फुटत नाही.....

" म्हणूनच तर मी तुला सांगत होतो भार्गवी.... तू कोणाला काही सांगू नको , नाहीतर खूप वाईट होईल....." धर्मेश शांतपणे तिच्याकडे पाहून बोलतो.....