Login

सासरची सावली भाग २

सासरची सावली
दुपारचं ऊन अंगणावर पडलेलं होतं, पण अंजलीच्या मनात मात्र सावल्यांचं थैमान होतं. ती कपडे वाळत घालत होती, हातात चिमटा, पण विचार दुसरीकडे. झाडाच्या फांद्या वाऱ्याशिवायच हलत होत्या, जणू काही न बोलताच सगळं सांगत होत्या.

इतक्यात आतून मामीचा आवाज आला.“अंजली, इकडे ये ग! जरा गरजेचं बोलायचं आहे.”

अंजलीनं चटकन हात झटकले आणि आत गेली. टेबलावर पेढ्याची डबी होती आणि मामीचं चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळीच चमक होती.
“काय झालं मामी?” – अंजलीनं विचारलं.

मामीने डोळे लुकलुकत हसून उत्तर दिलं,“तुझ्यासाठी मागणी आलीये ग! आणि तीही फार श्रीमंत घरातून. शहरात बंगला, गाड्या, आणि मोठा व्यवसाय. मुलगा इंजिनिअर आहे – नीटनेटका, सुसंस्कृत!”


अंजली काही क्षण स्तब्ध झाली. जणू तिला काहीच समजेनासं झालं. ती काहीही बोलली नाही. डोळ्यांनी मामीकडे पाहत राहिली.
“काय झालं ग? काही बोलत नाहीस?”मामीने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

अंजली हळू आवाजात म्हणाली,“इतक्या मोठ्या घरातून? पण… मी तर…”

“बस ग! एवढं नको विचार करू. तुझं नशीब चांगलं आहे म्हणायचं. मीच म्हटलं त्या लोकांना – मुलगी हुशार आहे, चांगली शिकलेली आहे. कामाला लाजत नाही आणि आवाज नाही. त्यांनाही आवडलं सगळं ऐकून. आता फक्त बघायला यायचं आहे.”

मामीचा चेहरा हसरा होता, पण तिचं हास्य अंजलीच्या मनात अजूनच संशय निर्माण करत होतं.

ती काही बोलली नाही. फक्त हलकंसं हसून उठली.रात्री…
काजल झोपली होती, पण अंजली मात्र खिडकीशी शांत बसली होती. आकाशाकडे पाहत. चंद्र ढगांआड लपलेला होता – जणू तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता.

तिच्या कानावर मामीचा आणि मामाचा संवाद आला. आवाज हलका होता, पण शब्द टोचत होते.

“…ती मागणी अंजलीसाठी नाही ग, पण नाव तिचंच द्यावं लागलं. त्या लोकांना शिकलेली, कामसू मुलगी हवी होती. आपली काजल तशी नाही… नको नंतर प्रॉब्लेम व्हायला.” – मामी बोलत होती.
मामा थोडा साशंक होता,“मग तू अंजलीचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावणार का?”

“अरे लग्न म्हणजे व्यापार नाही, पण आजकाल चालतोयच असंच. अंजली तशी काही विचारणारी नाही.
उद्या जर तिला त्या घरात पाठवलं, तर आपल्या काजलसाठी पण सोयीचं होईल. एकदा ओळख झाली की दोघी बहिणी एकत्र – आणि मग…”

अंजलीच्या कानात हे सगळं शब्दशः घुसलं. डोळ्यांतून पाणी न वाहता, मनाला झोंबत होतं. तिच्या आयुष्याचा सौदा तिच्या नकळत होत होता.दुसऱ्या दिवशी सकाळी…


मामीने पेढा आणून तिच्या हातात ठेवला,“ही घे, खा ग! मागणी नक्की होत चालली आहे. थोड्या दिवसांत बघायला पण येतील.”
अंजलीनं तो पेढा उचलला –
पण खाल्ला नाही. तो तिच्या हातातच राहिला.तो गोड नव्हता. तो स्वतःच्या इच्छेविरुद्ध ठोठावलेल्या निर्णयाचा कडवट घास होता.


मामी मात्र पुढच्या तयारीत गुंतलेली होती. तिच्या मनात फक्त “काजलचं भवितव्य” होतं. अंजलीसाठी ती योजना नव्हती — ती एक सोयीची शिडी होती.

0

🎭 Series Post

View all