" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद कथालेखन (संघ कामिनी)
जलद कथालेखन (संघ कामिनी)
सिंहासन–एक रहस्यभेद!
©® भालचंद्र नरेंद्र देव
©® भालचंद्र नरेंद्र देव
भाग १
मुंबई शहरात पावसाचा जोर वाढलेला होता. रात्रीचे ११ वाजून गेले होते. महानंदा वस्तुसंग्रहालय, जे कुलाबामध्ये गेली चाळीस वर्षे दिमाखात मिरवत होते, तिथे या वेळी सामान्यतः पूर्ण शांती असायची. एखादे चिटपाखरू देखील आजूबाजूला फिरकत नसायचे; पण त्या रात्री मात्र काहीतरी वेगळे घडत होते.
पावसाचे थेंब म्युझियमच्या काचेवर थाप मारत होते; पण आतमध्ये त्याचा इवलासा देखील आवाज येत नव्हता. सुरक्षिततेसाठी लावलेले सायरन, सेन्सर्स सगळे काही व्यवस्थित चालू आहेत असे वाटत होते; पण सकाळी जेव्हा सिक्युरिटी इन्चार्ज चेतनने दरवाजे उघडले, तेव्हा एका धक्कादायक दृश्याने त्याच्या तोंडातून आवाजच निघाला नाही.
वस्तुसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण, 'नवरत्न सिंहासन' त्याच्या जागेवर नव्हते. ते अचानकपणे अदृश्य झाले होते.
हे सिंहासन १८व्या शतकातील होते. पूर्ण सोन्याचे आणि त्यावर ९ मौल्यवान रत्ने जडवलेली होती आणि त्याची किंमत सुमारे ₹१० कोटींहून अधिक असली पाहिजे होती. त्याची किंमत जास्त नसली तरी, खरे पहायला गेले तर ही चोरी म्हणजे फक्त संपत्तीची नव्हतीच, हा तर भारताच्या सांस्कृतिक वारशावर झालेला एक मोठा आघात होता.
तत्काळ पोलिसांना आणि नंतर सीबीआयला पाचारण करण्यात आले. सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले; पण सर्व कॅमेरे एका निश्चित वेळी ३ मिनिटे बंद झाले होते. त्यात कुठलीच हालचाल दिसत नव्हती, ना कोणताही आवाज येत होता.
ही काळजीपूर्वक आखलेली चोरी होती. कोणीतरी अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बंद करून आपले काम शिताफीने पुढे नेले होते. यात पोलीस कोणावरही शंका घेऊ शकत नव्हते कारण बाकी सगळ्या गोष्टी जशा होत्या तशाच दिसत होत्या.
सीबीआय अधिकारी डीएसपी कामिनी कुर्वे यांनी तपास सुरू केला होता. तिचे पहिले लक्ष वेधले गेले ते वस्तुसंग्रहालयाच्या आगंतुक नोंदवहीवर (व्हिजिटर लॉगबुक).
ते पाहताना तिला एक नाव सातत्याने दिसत होते, राघव राजे, वय २३. तो एक कला शाखेचा विद्यार्थी होता आणि गेल्या आठवड्यात त्याने पाच वेळा म्युझियमला भेट दिली होती.
प्रत्येकवेळी त्याने वेगवेगळ्या कोनातून सिंहासनाची चित्रे बनवली होती, अगदी त्याच्या खऱ्या मापांसकट आणि त्याने म्युझियमच्या कर्मचाऱ्याला देखील विचारले होते, “तुमच्या विजेचा पॉवर बॅकअप सिस्टम कसा आहे आणि कुठे आहे? मला आर्ट स्टुडन्ट म्हणून समजून घ्यायचे आहे की एवढ्या मोठ्या वस्तुसंग्रहालयात प्रकाशस्रोत कुठून आणि कसा येतो ते.”
तो प्रश्न थोडा निरागस वाटत होता; पण आता त्याचा संदर्भ संशयास्पद वाटत होता.
त्याचवेळी डीएसपी कामिनीने सुरक्षा इन्चार्ज चेतनला विचारले, “तू रात्रभर कुठे होतास?”
चेतन म्हणाला, “मी तर रात्री ९ वाजता घरी गेलो. त्या रात्री सिक्युरिटी इन्चार्ज जगताप सूर्यवंशी सर अनुपस्थित होते. त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणे, म्हणून त्यांच्या सहायिका सुप्रिया माने ड्युटीवर होत्या.”
सुप्रियाला विचारले असता ती घाबरली आणि तिने सांगितले की त्या रात्री तिला एक अनोळखी फोन आला होता, ज्या कॉलनंतर तिला काही ‘तांत्रिक समस्या’ सोडवायच्या होत्या म्हणून ती काही क्षणांसाठी कंट्रोल रूममधून बाहेर गेली होती.
'हाच तो ३ मिनिटांचा काळ!' कामिनीला लगेच कळले.
डीएसपी कामिनीच्या टीमने सुप्रियाच्या बँक खात्याची तपासणी केली आणि त्यांना आढळले की तिच्या खात्यात ३ दिवसांपूर्वी ₹५ लाख जमा झाले होते, कुठल्या तरी अनोळखी खात्यामधून, ज्या खात्याच्या मालकाचे पूर्ण विवरण त्याच्या बँकेकडे देखील नव्हते.
या गोष्टीत आता अधिक खोलवर जाण्याची गरज होती आणि कामिनीकडे वेळ खूप कमी होता. तिच्या वरच्या अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर ही केस सोडवण्यासाठी दबाव वाढत होता.
डीएसपी कामिनीच्या मनात सतत काही प्रश्न घोळत होते.
‘कोण आहे हा राघव राजे?’, ‘सुप्रियाच्या खात्यामध्ये इतके पैसे कोणी पाठवले होते?’ आणि ‘हे ३ मिनिटांचे गुपित काय फक्त चोरीचीच गोष्ट लपवत आहे की अजूनही काहीतरी आहे?’
‘कोण आहे हा राघव राजे?’, ‘सुप्रियाच्या खात्यामध्ये इतके पैसे कोणी पाठवले होते?’ आणि ‘हे ३ मिनिटांचे गुपित काय फक्त चोरीचीच गोष्ट लपवत आहे की अजूनही काहीतरी आहे?’
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव © ® ( संघ कामिनी )
भालचंद्र नरेंद्र देव © ® ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा