Login

सुन नव्हे लेक भाग १

सुन नव्हे लेक भाग १
भाग १

"अगं प्राची, ऐकतेस काय ? आवर लवकर ! आज आपल्याला सत्य नारायाणाची पुजा करायची आहे. " सुजय म्हणाला.

" हो हो रे , आवरतेय मी ! पण सुजय, आधी सासूबाईंना विचारून घे की पूजेचं ताट तयार आहे का ? गुरुजी येतीलच आता थोड्या वेळात. आणि हो, त्या हलवायाला सांगा की , बुंदीचे लाडू एकदम ताजे हवेत."

प्राची आपली भरजरी पैठणी सावरत आणि नथ नीट करत हसून म्हणाली.

कोल्हापूरच्या राजारामपुरी भागातील त्या आलिशान बंगल्यात आज चैतन्याचे वातावरण होते. वात्सल्य नावाच्या या बंगल्याच्या दारासमोर काढलेली रंगीबेरंगी रांगोळी काढली होती. दाराला बांधलेली आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांची तोरणे अजूनही टवटवीत होती.

सुजय आणि प्राचीच्या लग्नाला अवघे चार पाच दिवस झाले होते. कोल्हापुरी थाटात झालेल्या त्या शाही लग्नाच्या आठवणी अजूनही पाहुण्यांच्या चर्चेत होत्या.

सकाळची वेळ होती. सुजय आपल्या बेडरूममध्ये आरशासमोर उभा राहून आपला भरजरी कुडता नीट करण्यात मग्न होता.

" अगं प्राची, ऐकतेस काय ? आवर ना लवकर ! आज आपल्याला सत्य नारायाणाची पुजा करायची आहे. उदया संध्याकाळी साताऱ्याच्या आणि कोल्हापूरच्या सगळ्या पाहुण्यांसाठी मोठं रिसेप्शन ठेवलंय.

कोल्हापुरात आपल्या लग्नाची आणि आजच्या पार्टीची चर्चा पुढचे महिना भर व्हायला हवी, असा माझा बेत आहे ! " सुजयने आरशात पाहून स्वतःशीच हसत उत्साहात म्हणाला.

सुजयने हसत हसत मान डोलवली. त्यांचं अरेंज मॅरेज होत. त्यांची चांगली मैत्री झाली होती. घरात सनईचे सूर वाजत होते, पाहुण्यांची ये-जा सुरू होती. सगळीकडे अत्तर-फुलांचा सुगंध दरवळत होता. सुजय आणि प्राचीच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा काळ होता. नवीन स्वप्ने, नवीन संसार आणि भविष्यातील योजनांच्या गप्पा सुरू होत्या. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

त्या आनंदी सुसंवादामध्ये आणि लग्नाच्या गडबडीत अचानक एक मोठा आवाज झाला.

'धप्प!'

जणू काहीतरी खूप जड वस्तू उंचावरून खाली कोसळली होती. त्या आवाजाने संपूर्ण घर हादरले. क्षणाचाही विलंब न करता , त्यानंतर एक काळजाचा थरकाप उडवणारी आणि वेदनेने भरलेली किंकाळी घराच्या वरच्या मजल्यावरून ऐकू आली.

"आई ss ! "

सुजयच्या तोंडचा शब्द फुटला. प्राची आणि सुजयने क्षणाचाही विचार न करता वरच्या मजल्याच्या दिशेने धाव घेतली. तिथे बाथरूमच्या उघड्या दारापाशी तिच्या सासूबाई, सुशिलाबाई जमिनीवर पालथ्या पडल्या होत्या. जमिनीवर पाणी सांडले होते, बहुधा पाय घसरून त्या जोरात पडल्या होत्या.

" आई ss ! अगं काय झालं ? कशी पडलीस ? "

सुजयने त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. पण सुशिलाबाईंच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांचा चेहरा वेदनेने काळा निळा पडला होता आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. जेव्हा सुजयने त्यांना थोडे हलवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या तोंडातून पुन्हा एक मोठी किंकाळी बाहेर पडली.

घरातील पाहुणे गोळा झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. तातडीने अँब्युलन्स बोलावण्यात आली आणि त्यांना कोल्हापूरच्या सिटी  हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुजय आणि प्राचीच्या अंगावर पूजेसाठी नेसलेले भरजरी कपडे होते, पण मनावर मात्र चिंतेचे डोंगर कोसळले होते.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तातडीने एक्स-रे आणि स्कॅन केले. अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले, त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य पाहून सुजयच्या काळजाचा ठोका चुकला.

" सुजय, परिस्थिती थोडी गंभीर आहे. सुशिला बाईंच्या मणक्याला मोठे फ्रॅक्चर झाले आहे. वयोमानानुसार हा मार खूप मोठा आहे. आम्हाला त्यांच्या कमरे पासून खाली प्लास्टर घालावं लागेल. किमान तीन महिने कंप्लीट बेड रेस्ट आवश्यक आहे. त्यांना हालचाल करणे तर सोडाच, साधे कुशीवर वळणे ही सध्या धोक्याचे आहे."

हे शब्द ऐकताच सुजयच्या पायाखालची जमीन सरकली. तीन महिने ? अंथरुणाला खिळून ? प्राची तर सुन्न झाली होती. ज्या घरात काही वेळापूर्वी सनईचे सूर वाजत होते, तिथे आता फक्त मशीनचे बीप बीप आवाज आणि भीतीदायक शांतता पसरली होती.

सगळं एका क्षणात विरून गेलं होतं. घरामध्ये आता दिव्यांचा झगमगाट नव्हता. तर दवाखान्याच्या औषधांचा वास होता. येणाऱ्या संकटाची चाहूल होती. कोल्हापूरच्या त्या मोठ्या घराच्या जबाबदारीचे ओझे आता या नवीन जोडप्याच्या खांद्यावर पडले होते.

आता काय करायचं ?

" हे बघ सुजय, आईची ही अवस्था पाहून आम्हालाही खूप वाईट वाटतंय रे. पण आता आई तर अंथरुणाला खिळली आहे. आपलं जे रिसेप्शन होणार होतं, ते तर आता कॅन्सल झालंय.

मग आता इथे बसून आम्ही तरी काय करणार ? मुंबईला माझ्या ऑफिसचं खूप काम पेंडिंग आहे आणि मनीषालाही तिच्या माहेरी जायचंय."

अजितने सुजयला बाजूला नेले आणि कपाळावर आठ्या घालत म्हटले होते.