Login

हक्क की कर्तव्य ? भाग २

सुनेचे फक्त कर्तव्य नसावे तिचा हक्क ही असावा...
आता एक गोष्ट स्पष्ट झाली  त्याच्याकडे एक जबाबदारी आहे.... परंतु त्याचं कार्य फक्त या दोन गोष्टींना एकत्र करण्याचं होतं....

आत्ता पुढें,

दिवस जात होते, पण घरातील वातावरणातला ताण कमी होत नव्हता.... वरचे वर तर सगळं सुरळीत  नाश्ता, जेवण,  ऑफिस, कॉलेज पण हसण्यातला ऊबदारपणा कमी होत होता....

एका रविवारी सकाळी, आदित्य ऑफिसला जाण्यापूर्वी अंगणात बसला होता.... आई चहा देत म्हणाल्या,

“आदित्य, या महिन्याच्या शेवटी रुचिराचं कॉलेज ची फी भरायचं आहे....  साधारण पंचवीस हजार होतील..... ”

आदित्य – “हो आई, पण आधी मी बघतो, या महिन्यात काही खर्च जास्त झाले आहेत..... ”
तेवढ्यात अन्विता स्वयंपाकघरातून बाहेर आली....

“आई, फी भरायची आहे तर मला आधी कळवा, मी सुद्धा काही रक्कम टाकते. पण…”

सुमतीताईने वाक्य अडवलं, “पण वगैरे काही नाही.... बहिणीची फी भरायची म्हणजे भावाचं कर्तव्य..... त्यात सुनेचं योगदान कसल ?”

अन्विता शांत झाली, पण आतल्या आत तिला त्रास झाला... तिला वाटलं  मीही या घराचा भाग आहे, मग माझं म्हणणं ‘हक्क’ नसून ‘हस्तक्षेप’ कसं?

त्या दिवशी दुपारी रुचिरा कॉलेजवरून आली.... अन्विताने तिला पाणी दिलं,

“रुचिरा, तुझ्या फीबाबत मी आईशी बोलले, मी पण काही रक्कम भरते म्हणाले...” अन्विता ने थोड्या शांत आवाजात तिला सांगितले....

रुचिरा थोडी संकोचली, “वहिनी, मला वाईट वाटतं.... आईला वाटेल तुम्ही जबाबदारी घेत आहात म्हणजे भाऊचं कर्तव्य कमी होतंय...”

तेवढ्यात आई हॉलमध्ये आल्या, “हो तर! आम्हाला बाहेरच्यांची मदत लागते का मुलांचं शिक्षण पूर्ण करायला?”

अन्विताच्या डोळ्यांत पाणी आलं, पण ती काही बोलली नाही.... तिने स्वतःला शांत ठेवत हळूच खोलीत निघून गेली....

आदित्य संध्याकाळी आला तेव्हा त्याला सगळं समजलं.... तो दोघींना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला,

“आई, अन्विताने मदत करण्याचं म्हटलं म्हणजे ती आपल्याला कमी लेखते असं नाही... ती आपलं कुटुंब मानते म्हणूनच मदत करायला तयार आहे....”

आईने भुवया उंचावत उत्तर दिलं, “आमचं कुटुंब म्हणजे तुझं आणि माझं.... सून ही पाहुणी असते, हक्काने घर चालवत नाही....”

हे ऐकून आदित्यच्या मनात खूप वाईट भावना दाटून आल्या... त्याला माहीत होतं की अन्विता हे ऐकून किती दुखावली असेल.......

त्या रात्री आदित्य आपल्या खोलीत अन्विताजवळ बसला....

" मला माहीत आहे, आईच्या शब्दांनी तुला त्रास झाला... पण तू मनावर घेऊ नकोस...” तिला समजावण्याचा प्रयत्न करत तो बोलला...


“मी प्रयत्न करते, आदित्य.... पण रोजचं असं काही ना काही होतं......  मला वाटतं, मी या घरात माझं योगदान देत असले तरी मला फक्त ‘कर्तव्य’ आठवण करून दिलं जातं, आणि ‘हक्क’ मान्यच नाही केला जात...” अन्विता ने थोड्या स्पष्ट शब्दातच उत्तर दिले...


आदित्यने तिचा हात धरला, “मी आहे तुझ्या सोबत.... पण मला आईलाही समजावायचं आहे की नातं फक्त एका बाजूच्या अपेक्षांवर चालत नाही.....” आदित्य शांत चेहऱ्याने तिच्याकडे पाहून मनाला...


काही दिवसांनी आदित्य कामासाठी बाहेर गेला होता तेव्हा घरात पाहुणे आले आईचे चुलत भाऊ व त्यांची पत्नी.... गप्पा चालल्या होत्या....


त्यांनी विचारलं, “अन्विताबाई, तुमच्या आई-वडिलांकडे कधी जाता का? की नोकरी आणि घरातच वेळ जातो?”

अन्विता हसून उत्तर देणार तेवढ्यात सुमतीताई म्हणाल्या,

“अहो, हिचं घर म्हणजे इथेच..... तिकडे जायचं म्हणजे आमचं काम मागे टाकून..... नोकरीला जाऊन आलेली असते, बाकी वेळ घरातलं कर्तव्य....”

पाहुण्यांनी हसत उडवून लावलं, पण अन्विताच्या मनात ते शब्द ठसले.... तिला जाणवलं  इथे माझं अस्तित्व फक्त ‘कर्तव्य’ म्हणूनच पाहिलं जातं....


आदित्यला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो त्या रात्री अंगणात बसून विचार करत होता.... आई आणि पत्नी  दोघी त्याच्यासाठी सारख्याच महत्त्वाच्या. पण एकीकडे आईचा पारंपरिक विचार, तर दुसरीकडे अन्विताचा आत्मसन्मान....  दोघींचा समतोल राखणं त्याच्यासाठी अवघड होत होतं.....

त्याने मनाशी काहीतरी ठाम पने ठरवलं आता एकदा दोघींशी या विषयावर उघडपणे बोलायलाच हवं....

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, आदित्यने हॉलमध्ये आई आणि अन्विता दोघींना बोलावलं... . त्याचा आवाज ठाम होता ... आवाजात एका प्रकारचा आत्मविश्वास झळकत होता...

“आज आपण तिघे एकत्र बसून सगळं साफ बोलणार आहोत... कारण हक्क आणि कर्तव्य यामध्ये इतका गोंधळ झाला आहे की,  आता नातं ताणलं गेलंय.... मला माझं कुटुंब टिकवायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला एकमेकांच्या भावनांचा आदर करावा लागेल....”

दोघी शांतपणे बसल्या....  घरातील वातावरण जणू एखाद्या निर्णायक क्षणासाठी तयार झालं होतं....