स्थैर्य-2

स्थैर्य
माधवीने नवऱ्याला विचारलं,

"आपण का आलो आहोत? म्हणजे काही महत्वाचं काम आहे का??"

"काय म्हणायचं आहे तुला? महत्वाचं काम असल्यावरच आई वडिलांना भेटायचं का?"

"तसं नाही ओ, तुम्ही पाहिलं ना त्यांची किती धावपळ सुरू आहे ते..त्यात आपण येऊन बसलोय.."

"काही होत नाही.."

बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे त्याने ठरवलंच होतं..

माधवीला मात्र सासुबाईंची तारांबळ दिसत होती. सुनेला त्या अगदी जीवापाड जपत त्यामुळे माधवी कधीही गेली तरी अगदी साग्रसंगीत भोजन बनवत. पण माधवीने यावेळी हट्ट धरला. घरातलं सगळं मी पाहून घेईन म्हणून..

माधवी मदतीला होती म्हणून सासूबाई निवांत शेतातील कामं करायला जाऊ लागल्या. माधवीने घरातलं सगळं आवरलं आणि शेतातही मदत करायला गेली..

तिथल्या मजूर स्त्रिया आपापसात कुजबूज करू लागल्या,

"बघा, शहरातली आहे पण कामाला कशी कडक आहे, घरातलं आवरून आणखी शेतात आली कामं करायला.."

सासूबाईंना माधवीचं कौतुक वाटायचं. संध्याकाळी त्या सुनेशी गप्पा मारत बसल्या,

"पोरी सगळं ठीक चाललंय ना?"

"हो आई अगदी मजेत.."

"तू ते कसलेतरी क्लास घेत होतीस त्याचं काय झालं.."

"सुरू आहेत..बऱ्याच सुट्ट्या पडतात पण.."

माधवी नाराज होऊन बोलू लागली..

"का गं?"

"काही नाही, हे बऱ्याचदा अचानक कुठेही जायचं नियोजन करतात.."

सासूबाईंना सुनेच्या मनातलं कळलं..

"बाईच्या जातीला स्थैर्य नसलं की तिची चिडचिड होते, तरी मी कितीदा सांगते याला की माधवीला सतत फिरवत जाऊ नकोस..माणसांना काय, भटकायला आवडतं कायम.."

सासूबाईंनी अगदी मनातलं ओळखलं म्हणून माधवीनेही मन मोकळं केलं..

"हो ना, आता बघा सोसायटीच्या बायकांनी यावेळी गणपतीत छान आरास करायची ठरवली होती, त्यासाठी आज सर्वजणी जमणार होत्या...त्यात माझा योगा क्लास होणार होता..पण सगळंच बारगळलं..म्हणजे गैरसमज करू नका सासूबाई, मला इथे यायला खूप आवडतं.. पण माझं एवढंच म्हणणं आहे की पुर्वनियोजन असेल तर मीही तयारीत राहत जाईन.."
*****

🎭 Series Post

View all