स्थैर्य-3

स्थैर्य
सासूबाईंना माधवीचं म्हणणं पटलं होतं, पण मुलाला समजावणार कसं? तोही त्याच्या वडिलांवर गेलेला.. त्याचे वडीलही तसेच होते. ते आठवून सासूबाईंना हसू आलं..

"काय झालं सासूबाई? का हसताय?"

"काही नाही... तुझे सासरेही असेच होते. बरं ते जाऊदे...आता मी काय सांगते तसं कर..म्हणजे तुझ्या नवऱ्याला शिकवण मिळेल चांगली.."

सासूबाई माधवीला एक प्लॅन सांगतात आणि माधवीच्या चेहऱ्यावर हसू फुलतं..

दोघेही परत आपल्या शहरात परतले. यावेळी माधवीने जाहीर केलं की,

"आपलं हे सतत येणंजाणं सुरू असतं त्यामुळे मला क्लास घेणं आणि सोसायटीच्या कामात लक्ष घालणं जमणार नाही..मी बंदच करून टाकते.."

"गुड.."

नवऱ्याला बरं वाटलं, यापुढे कुठे जाण्याबद्दल काही तक्रार बायको करणार नाही म्हणून. पुढे महिनाभर माधवी तो म्हणेल तिथे म्हणेल तेव्हा जायला तयार व्हायची. योगा क्लासची वेळ बदलून तिने गपचूप त्याच्या ऑफिसच्या वेळी ठेवली त्यामुळे क्लास सुरू होता.

महिना उलटला, माधवीच्या नवऱ्याने त्याच्या मित्रांसोबत शिमला जाण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याची पैशांची जमवाजमव सुरू होती. 4 हजार कमी पडत होते, त्याने माधवीला विचारलं,

"मला उसने चार हजार देतेस का?"

"माझ्याकडे कुठून येतील पैसे? क्लास बंद आहेत माझे...उलट तुम्हीच द्या मला, पेपरबील आणि दुधाचं बिल भरायचं आहे.."

नवऱ्याला टेन्शन आलं, आत्तापर्यंत हा खर्च बायको सांभाळत होती याचं अप्रूप त्याला नव्हतंच. आता पैशाची चणचण जाणवू लागली. त्याने कसेबसे पैसे जमवले. रविवारी त्यांच्या ग्रुपला शिमला निघायचं होतं त्यामुळे आदल्या दिवशी शनिवारी त्याची पॅकिंग सुरू होती, चांगलीच धावपळ होती त्याची. काही सामान आणायचं होतं आणि घड्याळात पावणे नऊ झालेले.

"अरे देवा, उद्या सकाळीच निघायचं आहे आणि आता दुकानं बंद होतील..लवकर जावं लागेल.."

असं म्हणत तो लगबगीने निघाला, तेवढ्यात त्याच्या आईचा फोन..

"अरे आम्ही इथे स्टेशनवर केव्हाचे उभे आहोत, आम्हाला घ्यायला ये..रिक्षा मिळत नाहीये.."

"तुम्ही कधी आलात? कळवलं नाही आधी.."

"मुलाच्या घरी यायला कळवायला हवं??"

तो ओशाळला..हेच वाक्य तो बायकोला म्हटल्याचं त्याला आठवलं..

तो घाईने स्टेशनवर गेला..आई वडिलांना घरी आणलं..रस्त्याने बघत चाललेला तर सगळी दुकानं बंद होती. त्याचे आईबाबा घरी आले, माधवीने त्यांना लगेच जेवायला वाढलं..आई म्हणाली,

"कसली धावपळ सुरू आहे तुझी? आणि ऐक.. उद्या आम्हाला इथल्या देवळात जायचं आहे, माझ्या काही जावा पण सोबत येणारेत..आम्हाला घेऊन चल.."
******

🎭 Series Post

View all