स्थैर्य-1

स्थैर्य

"माधवी चल बॅग भरायला घे, संध्याकाळी गावी निघायचं आहे.."

"आज?"

"हो..."

त्याने बायकोला आदेश दिला अन स्वतः मस्त बेडवर मोबाईल चाळत बसला. माधवीची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. आज संध्याकाळी मुगभजी काढायची म्हणून तिने डाळ भिजवली होती, गॅलरीत कुंड्यांची नवीन आरास करत नवीन फुलझाडं लावली होती, संध्याकाळी सोसायटीच्या बायकांना चहाला बोलावलं होतं आणि योगा क्लास घेण्यासाठी संध्याकाळी 7 ची वेळ दिली होती.

संध्याकाळी गावाला निघायचं म्हणजे तिला तिचं सगळं वेळापत्रक बदलावं लागलं.

नवऱ्याच्या या वागण्याचा तिला खुप त्रास व्हायचा..ती त्याला समजवायचा प्रयत्न करायची.

"अहो, तुम्ही असं अचानक कुठेही जायचं जाहीर करता..तेही कुठली पूर्वसूचना न देता..माझी धावपळ होते की मग.."

"कसली धावपळ? तुला कुठे जागतिक संघटनेच्या मिटिंग घ्यायच्या असतात?"

"असं कसं बोलता तुम्ही? मी योगा क्लास घेते, सोसायटीच्या बायका मिळून आमचे नवनवीन उपक्रम चालतात...अचानक कुठे जायचं म्हटलं की सगळं वेळापत्रक बिघडतं.. असं काय करताय?"

"योगा क्लास अन बायकांच्या भेटी इतक्या महत्वाच्या नाहीत, उगाच काहीही कटकट घालू नकोस.."

"घराचं लाईटबिल आणि पेपर बिल त्याच पैशांतून सुटतं माहितीये ना तुम्हाला? माझ्या अश्या अचानक क्लासला सुट्टी देण्यामुळे बरीच मुलं क्लास सोडून देताय..एकाने तर बोलूनही दाखवलं की मॅडम योगा मध्ये सातत्य नसेल तर काय उपयोग?"

नवऱ्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं..संध्याकाळी आवरून दोघेही गावी गेले.

गावी गेल्यावर तिकडे सर्वांची शेतीच्या कामांची गडबड सुरू होती. गावी तिच्या सासूबाई, सासरे आणि लहान दिर राहायचे. सर्वजण शेतीच्या कामाला जात. हे दोघेही तिकडे गेले तसं घरच्यांनी त्यांचं स्वागत केलं खरं पण त्यांच्या कामाची धावपळ स्पष्ट दिसत होती.

🎭 Series Post

View all