Login

मतलबी भाग एक

स्वतःच्या स्वार्थासाठी नंदेने माहेरी किती हस्तक्षेप करावा
मतलबी


“वहिनी दाजीच्या उपचारांसाठी आतापर्यंत मी पिंकीला तीन लाख दिले आहे, काल तिचा परत फोन आला होता आणि तिने पैशाची मागणी केली. मी काय म्हणतो खरंच एवढे पैसे लागत आहेत का त्यांच्या उपचारांकरिता? की…………” प्रदीप एक मध्यमवर्गीय शेतकरी होता. जावयाच्या उपचाराकरिता त्याने आतापर्यंत पुष्कळ पैसा दिला होता पण बहिणीची पैशाची मागणी मात्र संपत नव्हती.

“नाही नाही भाऊजी, दाजींच्या उपचाराला खरंच तेवढे पैसे लागत आहेत. तुम्हाला तर माहिती आहे की त्यांचा कर्करोग तिसऱ्या स्टेजला कळला होता. त्यामुळे उपचाराला जरा जास्तच खर्च लागतो आहे.” मीनाने तिच्या लहान दिराला समजावण्याचा प्रयत्न केला.

“तसं नाही वहिनी आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. मला पण बी बियाण्याला खर्च लागतोच ना! एवढा पैसा पिंकीच्या नवऱ्याला लावल्यानंतर शेतात काय टाकू हाच प्रश्न माझ्यासमोर उभा आहे.” प्रदीपने त्याची पैशाची अडचण मीनाला सांगितले.

“तुमचंही बरोबर आहे भाऊजी, आम्ही पण आतापर्यंत लाख, दीड लाख दिलेच आहेत दाजींच्या उपचाराकरिता. दिवसेंदिवस दवाखान्याचा खर्च आणि महागाई वाढतच चालली आहे त्यामुळे सगळ्यांनाच पैशाची अडचण आहे. तुम्हाला तर तुमच्या भावाची सगळी आर्थिक बाजू माहिती आहे. मुलांच्या शाळा, गणवेश, वह्या पुस्तकं, दप्तर, डबे, पाण्याच्या बाटल्या, शिवाय शाळेची फी त्यामुळे आमचाही हात रिकामाच आहे.” मीनानेही तिची पैशाची चणचण लहान दिराला सांगितली.

“वहिनी तुम्ही पिंकीशी बोलून, तिच्या जवळचं सोनं गहाण ठेवून काही पैशांची व्यवस्था होते का ते विचाराना?” प्रदीपने पैशाच्या व्यवस्थेचा एक मार्ग सुचवला.

मीनाने लहान नणंद पिंकीशी बोलून पाहिले पण तिने सरळ हात वर केले.

“वहिनी माझं स्रीधन मला माझ्या आई-वडिलांनी लग्नात दिलं होतं. मी काही ते गहाण ठेवणार नाही. पुढे ते सोनं सोडवता नाही आलं तर मी काय करणार? माझ्या मुलींच्या लग्नासाठी मी ते ठेवलं आहे.”

शेवटी प्रदीपने उसनवारी करून, शेतात बी पेरलं. पिंकीचा नवरा ज्या इस्पितळात दाखल होता तिथे फोनची अजिबात रेंज येत नव्हती. पिंकी सारखी मीनाच्या नवऱ्याकडे आणि लहान भाऊ प्रदीपकडे फोनसाठी तगादा लावत होती.

“दादा या दवाखान्यात फोनला अजिबात रेंज येत नाही आणि माझा फोनही व्यवस्थित चालत नाही. त्या प्रदीपला आतापर्यंत चार वेळा सांगून झालं पण त्याची शेतीची कामच संपत नाहीत. मागल्या महिन्यात त्याने माझ्या नवऱ्यासमोरच म्हटलं होतं की ‘तुला नवीन फोन घेऊन देईल.’ माझ्या सासरची मंडळी सारखी फोन करत राहतात, नवऱ्याच्या तब्येतीची विचारपूस करतात. एका नवीन फोनची मला तातडीने गरज आहे.” पिंकी तिच्या भावाला फोन घेऊन देण्यासाठी एक सारखी भुणभुण लावत होती. जणू भावांकडून फोन घेणं हा तिचा जन्मसिद्ध हक्कच होता.

दोघेही भाऊ आर्थिक अडचणीत असल्यामुळे शेवटी मीनानेच स्वतःचा फोन तिने वापरावे असे सुचवले. पण पिंकी मात्र नवीन फोनसाठी अडून बसली.

“मी काय म्हणते पिंकी ताई, सध्या पैशाची थोडी अडचण आहे तर तुम्ही माझा फोन वापरा ना!” मीनाने स्वतःचा फोन देण्याची तयारी दाखवली.

“तुमचा फोन मी का बरं वापरणार? हे बघा वहिनी मला माझा वेगळा फोन हवा आहे तो पण नवीन.” पिंकी तोऱ्यात बोलली.

मीनाच्या नवऱ्याने कसेतरी इकडून तिकडून पैसे जमा करून पिंकीला साधा फोन घेऊन दिला तर तिने तो घेण्याला साफ नकार दिला.

पुढल्या भागात बघूया पिंकीला नवीन फोन मिळतो का?

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.


0

🎭 Series Post

View all