मतलबी भाग 2
“दादा तुझी बायको स्मार्टफोन वापरते आणि मला तू हा असला साधा बटनावाला फोन दिला. मला पण वहिनीसारखाच स्मार्टफोन पाहिजे. तुला शक्य नव्हतं तर दवाखान्यात माझ्या नवऱ्यासमोर नवीन फोन घेऊन देण्याचा शब्द तरी का दिलास? साधा फोन बघून माझा नवरा मला काहीच बोलणार नाही असं वाटलं का तुला? ते काही नाही मला स्मार्टफोनच पाहिजे.” पिंकीचा हट्टी स्वभाव घरी सगळ्यांनाच माहिती होता. मीनाच्या नवऱ्याने आणलेला नवीन फोन दुकानात परत करून त्यात थोडे पैसे घालून पिंकीला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला. तेवढ्यावरही तिचं समाधान झालं नाही. तिच्या नवऱ्याला थोडं बरं वाटायला लागल्याने डॉक्टरांनी घरी जायची सुट्टी दिली. आता पिंकीच फ्रिज करिता नवीनच नाटक सुरू झालं होतं.
“आई, तुला तर माहिती आहे की तुझ्या जावयाची तब्येत तोळा मासा आहे. एवढ्या मोठ्या जीवावरच्या दुखण्यातून ते आत्ता कुठे बरे झाले आहेत. त्यांच्या पुष्कळ औषधी असतात आणि त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. म्हणून मला या दिवाळीत साडी ऐवजी फ्रीज घेऊन द्या.”
“अग पिंके जरा समजून घे. तुझ्या मोठ्या दादांनं घर बांधण्यासाठी कर्ज घेतलं आहे. प्रदीपच तर सगळं शेतीवरच अवलंबून आहे. आता तुला नवीन फ्रिज कुठून घेऊन द्यायचा? पिंकीच्या आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
“पिंकी, मी काय म्हणतो मला कंपनीकडून फ्रिज मिळाला आहे. माझ्या लग्नातला फ्रिज तसाच पडलेला आहे. तो घेऊन जा!” मीनाच्या नवऱ्याने स्वतःच्या लग्नातला फ्रिज पिंकीला देऊ केला. पण ऐकेल ती पिंकी कुठली?
“मला नको कुणाच्या आंधणातला फ्रिज! मला माझा नवीन, वेगळा फ्रिज हवा!”
शेवटी प्रदीपने शेतीतलं धान्य विकून, पिंकीला नवा फ्रिज घेऊन दिला. एवढं असूनही पिंकीचं समाधान झालं नाही. तिने तिच्या आईकडून महागातली साडी, नवरा आणि मुलींसाठी भारीतले कपडे घेतलेच.
पिंकीच्या नवऱ्याला त्याच्या कंपनीकडून आजारपणाचा थोडाफार खर्च परत मिळाला होता. आधी प्रदीपने मीनाला पिंकीकडे पैसे मागण्याची विनंती केली.
“वहिनी, यावर्षी पाहिजे तसं उत्पन्न आलं नाही आधीच ही कर्ज आहे. पिंकीच्या नवऱ्याला कंपनीकडून काही पैसे मिळाले आहेत. त्यातले थोडे मला द्यायला सांगा ना.”
“भाऊजी, नणंद बाईंच्या ऐवजी दुसरे कोणीही असते ना तर मी नक्कीच पैसे मागितले असते. पण पिंकी ताईंचा स्वभाव तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. मी काही त्यांना पैसे मागणार नाही आणि त्या पैसे देतील असेही मला वाटत नाही.” मीनाला एकंदरीतच स्वतःच्या नंणदेचा अंदाज आला होता.
प्रदीपने आईच्या मार्फत पिंकीकडे थोडीशी पैशाची मदत मागितली. पण पिंकीने भावाला अजिबात दाद दिली नाही.
“पिंकी तुझ्या नवऱ्याच्या आजारपणासाठी मोठ्याने आणि प्रदीपने पुष्कळ खर्च केला आहे. प्रदीपला थोडी पैशांची अडचण होती तर दाजींच्या उपचाराचा जो पैसा कंपनीकडून मिळाला आहे त्यातली थोडी मदत लहान भावाला कर.” प्रदीपच्या आईने घाबरतच पिंकीला पैसे मागितले.
पुढल्या भागात बघूया पिंकी तिच्या भावाला पैसे देते का?
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा