मतलबी अंतिम भाग
“काय बाई माझे भाऊ आहेत! जावयाच्या आजारपणाचा पैसा सुद्धा परत मागतात. आणि आई तू पण माझ्याजवळ पैसे मागायला येते. थोडा तरी माझा विचार कर. मला पण दोन लहान मुली आहेत. माझा पण संसार आहे. जावयाला आजारपणात दिलेला खर्च कोणी परत मागत का?” पिंकी स्वतः जवळचा एकही रुपया देणार नव्हती हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.
प्रदीपने शेवटी पतसंस्थेचे कर्ज काढलं आणि शेतात पेरणी केली. मीना पण घरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरत होती. पण पिंकीच्या माहेराकडूनच्या अपेक्षा संपता संपत नव्हत्या.
त्यातच अधिक महिना आल्याने आता तर पिंकीच्या मागण्यांना काही मर्यादाच राहिली नव्हती. पिंकीच्या आईने तिला साडीकरिता दोन हजार रुपये दिले होते.
“हे बरं आहे आई तुझं. मला साडीला पैसे दिले की तुझं कर्तव्य संपलं. अगं मला नवरा आहे. दोन मुली आहेत. तुझ्या या दोन हजारात मी काय काय करणार? ते काही नाही रीतीला अनुसरून तुला सगळंच करावं लागेल.”
“सगळं म्हणजे काय ग? तुझे भाऊ काही क्लासवन ऑफिसर नाही, की टाटा, अंबानी नाही. तुला कितीही दिलं तरी तुझं मन भरत नाही. तुझ्या माहेरची परिस्थिती इतकी बेताची असूनही, तुला त्याची काहीच जाणीव नाही. वेळप्रसंगी आम्ही आमच्या सगळ्या हौस-मौज बाजूला ठेवून, पोटाला चिमटा देऊन, तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो आणि तूच आमच्या डोक्यावर नाचते. प्रत्येक वेळी, तू मागितलेली प्रत्येक वस्तू, तुला पाहिजेच असते. या घरची लेक म्हणून, भावांची बहीण म्हणून तुझं काहीच कर्तव्य नाही का? तुझ्या अपेक्षांचा ओझं तू नेहमी तुझ्या भावांच्या पाठीवर का लादतेस? मोठ्याने त्याच्या अंधणातला फ्रिज दिला तर तो तुला नको होता, नवीन हवा होता, त्याने फ्रिज विकून आणि प्रदीपने कर्ज काढून तुला फ्रीज घेऊन दिला. फोनसाठीही तू तशीच भुनभुन केली. नवऱ्याच्या आजारपणाची तुला इतकी काळजी होती तर माझी मुलं पैसे जमवायला वेळ लावतात म्हणून गावभर शिमगा कशाला केलास? तुझ्याजवळ सोनं होतं ते गहाण ठेवायचं होतं. ते तर तू तुझ्या मुलींसाठी ठेवलं. स्वतःचा मतलब कसा समजतो तुला? तुझ्या भावांची पण लग्न झाली आहेत. त्यांचा पण संसार आहे. त्यांनाही मुलं बाळ आहेत. पण ते तुझ्या लक्षातच येत नाही. प्रत्येक वेळी तुला सगळं माहेराहूनच हवं असतं.”
“मागे जावयाची गाडी बिघडली तर दुरुस्त करायला तू प्रदीपकडे पाठवली, त्यांने काही दिवस ती गाडी वापरली तर त्याला तू वाट्टेल तसं बोलली. जावयाच्या आजारपणात माझी मुलं खर्च करू शकतात, तुला आणि जावयाला भरभरून आहेर देऊ शकतात, आणि महिना दोन महिने त्यांची गाडी वापरली तर तुझं काय मोठं नुकसान झालं ग? पिंके यानंतर जर तू एका रुपयानेही आणि एका शब्दानेही माझ्या दोन्ही मुलांना त्रास दिला तर याद राख गाठ माझ्याशी आहे.” पिंकीच्या आईने पिंकीचे चांगलेच कान उघडले.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
********************