अनैतिक भाग दोन
“मधुली तुझ्यासारखी सुंदर, हुशार, गृहकृत्यदक्ष आणि कुटुंबावर भरभरून प्रेम करणारी बायको मला मिळाली मी खरंच खूप नशीबवान आहे.” लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अमित मधुलिला जवळ घेत तिच्यावर प्रेम वर्ष करत, मधलीचं कौतुक करत होता.
मधुलीचा आणि अमितचा चार चौघांसारखा सुखी संसार होता. लग्नापूर्वी एका कंपनीत नोकरी करणाऱ्या अमितचं मधुलीशी लग्न झालं आणि त्याला भरभर वरच्या पोस्टवर बढती मिळत गेल्या. सुरुवातीला अमितचा पगार फारच तोकडा असल्याने, मधुलीने एका ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला ती नोकरी मिळाली सुद्धा. मिळालेली नवी नोकरी, अमितचं प्रेम आणि सासू-सासर्यांची सेवा, यात रमलेल्या मधुलीने गोड बातमी दिली आणि मधुलीच्या घरी एक परी आली.
घरच्या जबाबदाऱ्या, नोकरीतले ताण, अमितच्या बढत्या आणि मातृत्वाची नवीन अनुभूती, मधुली त्यात पूर्णपणे गुंतून आणि रंगून गेली. पण त्यामुळे आता अमित आणि तिला निवांतपणाचे क्षण मिळणं अवघड झालं. अमित तसं तिला आडून आडून सुचवत असे. कित्येकदा तर त्याने बोलून सुद्धा दाखवलं, “मधुली आता तू पूर्ण काकूबाई झाली आहेस. तुला माझ्यात जराही इंटरेस्ट नाही, जरा वजन कमी कर, जरा प्रेझेंट टेबल राहत जा.”
“अमित मला तुझं म्हणणं पटते आहे पण मी काय करू? इतक्या मेहनतीने मिळालेली नोकरी आणि ही वरची पोस्ट, पगारही भरपूर आहे. घरातल्या जबाबदाऱ्या मलाच सांभाळाव्या लागतात. तू थोडं तरी घरात लक्ष देत जा ना!” मधुलीने एक दोनदा स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
“वा! तुझं हे बरं आहे, म्हणजे मी माझ्या विषयी, आपल्या नात्याबद्दल, माझ्या गरजांबद्दल आता काही बोललो की तू सरळ घरातल्या जबाबदाऱ्या मी घेत नाही असं म्हणून सगळं माझ्यावर ढकलून देतेस. मी तर म्हणतो की तू आता नोकरी सोडून दे, पूर्णवेळ घराला दे, पण तुला तेही जमत नाही ना! मीच कसा नालायक आहे आणि मला घरच्या जबाबदाऱ्या नको हे तू माझ्या लक्षात आणून द्यायला एकही संधी सोडत नाहीस.” अमितने मधुलीच्या म्हणण्याचा विपर्यास केला आणि तोंड विरुद्ध दिशेला फिरवून झोपला.
अमितच्या अशा वागण्याने मधुली प्रचंड दुखावली होती पण तरीही तिचं अमित वर जीवापाड प्रेम होतं. म्हणूनच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याची मन धरणी करण्यासाठी, मनात नसतानाही मधुली त्याला परत एकदा समर्पित झाली. आणि त्यानंतर असं अनेकदा घडलं. अमित ची इच्छा तर पूर्ण होत होती पण त्याला मधुली कडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. यावर काहीतरी उपाय शोधावा, मधुलीच्या मनाचा, भावनांचा, आपण थोडा तरी विचार करावा, तिला मानसिक आधार द्यावा असं त्याला कधी वाटलंच नाही.
या विरुद्ध त्याने स्वतःची गरज पुरवण्यासाठी बाहेर पर्याय शोधले. त्यातच मधुलीने परत एकदा गोड बातमी दिली, पण या गर्भारपणात काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्याने आता ती अमितच्या ‘त्या’ गरजा पूर्ण करू शकत नव्हती. अमितला तर हातात आयत कोलीतच मिळालं. अनेक ठिकाणाहून त्याने ते मिळवलंही.
पुढल्या भागात बघूया अमित आणि मधुलीच्या नात्याचं पुढे काय होणार?
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा