Login

स्वस्त आणि मस्त फराळ

फसवणूक
काय बाई लोक हल्ली खोट बोलून फसवायला लागले आहेत? मनाची नाहीतर जनाची तरी लाज बाळगावी माणसाने. आपलीच माणसे अशी वागली तर तक्रार करायची कोणाकडे, असे सेजल स्वत:शीच बोलत सकाळी हॉलमध्ये बसली होती. तेव्हा तिथे तिचा नवरा, अमोल आला आणि तो तिला म्हणाला,

“सेजल स्वत:शीच काय बोलत बसली आहेस?”

तेव्हा सेजल अमोलला म्हणाली,

“अरे आमच्या ऑफिसमधील चारुलता आहे ना तिच्या सासूबाई दरवर्षी घरगुती दिवाळीचा फराळ करतात. त्या दिवाळीच्या फराळाचा स्टॉल पण लावतात. तो स्टॉल आपल्या भाजी मार्केट जवळ आहे. सेजल दर वर्षी माझ्या मागे लागते. माझ्या सासूबाई फराळ खूप छान बनवतात. एकदा घेऊन बघ. मी दर वर्षी तिला सांगते आमच्याकडे विकतचा फराळ कोणाला आवडत नाही. काल रविवारी मी आपल्या भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेले. तेव्हा तिथे मला सेजल त्या स्टॉलवर बसलेली दिसली म्हणून मी तिच्याशी बोलायला गेले तर मला चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळया व करंजी ह्याचे नमुने खायला दिले.”

मी ते पदार्थ खात होते तेवढ्यात मला म्हणाली,

“कसा आहे फराळ, मस्त आहे ना. आवडली ना तुला फराळाची चव. आमच्याकडे आम्ही फराळ खुप स्वस्त विकतो. आम्ही फराळाला रिफाईन्ड तेल वापरतो, लाडवासाठी अजिबात डालडा वापरत नाही. शुद्ध तुपामध्येच आम्ही लाडू करतो. आम्ही होलसेल मार्केटमधून सगळा माल आणतो. माझ्या सासूबाई मागच्या वीस वर्ष हा व्यवसाय करत आहेत. आमच्या फराळाला परदेशात पण खूप मागणी आहे. आमच्याकडे काम करणार्‍या बायका एकदम स्वच्छ आहेत त्यामुळे आमचा फराळ पण एकदम स्वच्छ असतो.”

“अरे अमोल तिने नमुना म्हणून दिलेले फराळाचे सगळे पदार्थ छानच होते चवीला.”

त्यामुळे मी तिला म्हणाले,

“छान आहे सगळे फराळाचे पदार्थ. ते ऐकुन ती आनंदीत झाली आणि मला म्हणाली,

“मग एक एक किलो सर्व फराळाचे पदार्थ पॅक करते.

तेव्हा मी तिला म्हणाले, “अगं नको, मी तुला म्हणाले होते ना. आमच्या घरी नाही आवडत विकतचा फराळ. तू आता टेस्टला दिला म्हणून मी टेस्ट केला तुझा फराळ. तुझ्या सासूबाई खूपच छान फराळ बनवतात, पण सॉरी मी नाही घेऊ शकत फराळ विकत.”

त्यावेळी तिच्या सासूबाई म्हणल्या,”

“अगं सकाळी सकाळी आली आहेस दुकानात एक किलो नाहीतर अर्धा किलोची बोहणी कर. अशीच जाऊ नको. म्हणून मी अर्धा किलो चकल्या, अर्धा किलो रव्याचे लाडू विकत घेतले.”

“काल घरी आल्यावर कामाच्या गडबडीत ते फराळाचे मी विसरले. आज सकाळी प्राचीला शाळेत शॉर्ट ब्रेकला डब्यात कालची फराळाची चकली द्यावी म्हणुन चकलीचे पॅकेट फोडले आणि त्यातली एक चकली तोंडात घातली तर ती चकली मऊ लागली मला. प्राची अशी चकली खाणार नाही म्हणून मी रव्याच्या लाडवाचे पॅकेट फोडले त्याची चव घेतलीतर त्या लाडवामध्ये साखर आहे की नाही हा प्रश्न पडला मला, मी प्राचीला शॉर्ट ब्रेकला बिस्किटे दिली.”

त्यानंतर मी चारुलताला फोन लावून सगळा प्रकार सांगितला तर मला म्हणाली,

“असं होण शक्यच नाही.”

मी तिला म्हणाले,

“ऑफिसमध्ये आणते तो फराळ दाखवायला तर मला म्हणाली, नको ऑफिसमध्ये नको आणू फराळ दाखवायला. एखाद्यावेळी चुकून तुला मऊ चकल्या आणि शुगर फ्री रव्याचे लाडू गेले असतील. तू नीट बघुन घ्यायचे ना.”

मी तिला म्हणाले,

“काहीही काय बोलतेस चारुलता बाजारात मऊ चकल्या कधी विकायला असतात का? आणि तू मला खायला कुरकुरीत चकल्या आणि गोड रव्याचे लाडू खायला दिलेस आणि विकत अश्या मऊ चकल्या आणि शुगर फ्री लाडू दिलेस. ह्या लाडवाच्या पॅकेटवर कुठेही शुगर फ्री लाडू लिहले नाही आहे. तू माझ्याशी गोड व खोटे बोलून मऊ चकली आणि शुगर फ्री लाडू माझ्या गळ्यात मारलेस. मैत्री म्हणुन तुझ्यावर विश्वास ठेवून मी चकली व लाडू विकत घेतले आणि माझे पैसे पण वाया गेले.”

त्यावर ती मला म्हणाली,

“माझा काय संबध माझा फराळाचा व्यवसाय नाही माझ्या सासुबाईंचा आहे. मला काही त्या व्यवसायातले माहित नाही आणि मी खोटे बोलले, गोड बोलून तुझ्या गळ्यात फराळ मारला असे काहीही बोलायचे नाही. हे मी काही ऐकून घेणार नाही. माल विकत घेताना चेक करून घ्यायचा असतो. एवढे साधे तुला समजत नाही त्याला मी काय करणार? आणि माझ्या सासूबाई एकदा विकलेला व फोडलेला माल परत घेत नाही त्यामुळे तो माल परत द्यायला जाऊ नकोस. काही उपयोग होणार नाही. चल मी ठेवते फोन मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे.”

हे सर्व ऐकल्यावर अमोल सेजलला म्हणाला,

“आयुष्यात अजून एक वाईट मैत्रीचा अनुभवाची भर पडली म्हण आणि सोडून दे. विचार आणि बडबड करुन काय होणार? ज्यांना खोटे बोलून स्वत:चा फायदा करून घ्यायचा आहे त्यांना आपण अडवू शकत नाही.”
©️®️ ज्योती सिनफळ.


0