Login

हक्क की कर्तव्य भाग -२

हक्क की कर्तव्य The duty that the rights
भाग २

त्या रात्री अंगणात शांतता दरवळत होती. पायऱ्यांवर सरपंचबाई स्थिर बसल्या होत्या. आकाशात चंद्र एका बाजूला झुकलेला, वाऱ्याच्या मंद झुळुकीने त्या आपल्या मनाला शांत करत होत्या पण नजर मात्र कुठेतरी दूर भिरभिरत होती.

घराचा दरवाजा अलगद उघडला, आणि राधा बाहेर आली. तिच्या डोळ्यांत त्याच्याविषयी काळजी दाटली होती.“इतक्या उशिरा इथे का बसलात?” तिने आपुलकीने त्यांना विचारले.सरपंचबाई हलकंसं स्मित करत म्हणाल्या,
“बस इथे मन शांत करायला बसले होते पण खरं सांगायचं तर मन अजूनही हलकं झालं नाही.”त्या थोडा वेळ गप्प राहिल्या आणि मग जड आवाजात पुढं म्हणाल्या,
“गावची शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे राधा. मुलं शिकायला येत नाहीत. सगळी शेतात, मोलमजुरीला जातायत. त्यांचं भविष्य अंधारात जातंय. काही केलं नाही तर ही पिढी हरवेल. आणि मला माहित आहे, त्यांच्यासाठी काही करू शकतेस ती फक्त तू.”

राधा त्यांचे बोलणे ऐकून वेगळ्याच विचार हरवली तिच्या मनात एकच विचार घुमत होता तसे ती सरपंचबाईंना म्हणाली “मी? पण माझी स्वप्नं... माझा हक्क.?”सरपंचबाईंच्या डोळ्यांत मात्र खात्री होती.“कधी कधी दुसऱ्याचं भविष्य घडवणं, हाच आपला खरा हक्क असतो राधा. आणि तुझं सगळ्यात मोठं यशही.”

राधा गप्प झाली. त्या रात्री बराच वेळ ती अंगणात उभी राहून आकाशाकडे पाहत होती. चंद्राचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता, पण तिच्या मनात मात्र गोंधळाच्या लाटा उसळत होत्या. असहायतेनंतर हळूहळू एक नवा प्रश्न जन्म घेत होता“कदाचित माझं स्वप्न ह्याच मार्गातून पूर्ण होणार असेल?”

थोड्याच वेळात तिचे पाय आपोआप शाळेकडे वळले. मागच्या बाजूने आत शिरताच तिच्या नजरेसमोर जे आलं, त्याने तिचे हृदय पिळवटलं जमिनीवर पडलेला फळा, भिंतींवर खोल पडलेल्या भेगा, छप्पर वाकलेलं, ओसाड अंगणात उभं असलेलं कोमेजलेलं झाड.एकेकाळी गावाचं हृदय असलेली जागा आता जणू प्रेतासारखी पडून होती.खंडर जणू

राधा थांबली, आणि तिला जुन्या आठवणी मनात गाजू लागल्या घंटाचा नाद, वहीच्या पानांवर उड्या मारणारी अक्षरं, आणि एका शिक्षकाच्या विश्वासाने बदललेलं तिचं आयुष्य.ते सर्व आठवून डोळ्यांत पाणी आलं, पण त्या पाण्यातूनच जिद्दीचा दिवा पेटला.“ही शाळा पुन्हा हसेल,” ती स्वतःशीच पुटपुटली आणि तिने आपल्या घरी आली.

पहाट झाली . कोवळा सूर्यप्रकाश झाडांच्या पानांवरून झिरपत होता. दवबिंदू मोत्यांसारखे चमकत होते. राधा अंगणात घागर भरत होती, पण मन मात्र पूर्णपणे शाळेत अडकून पडलं होतं.

नाश्ता उरकून तिने जुनी पिशवी खांद्यावर टाकली आणि पायवाटेने शाळेकडे निघाली. गेटवरची जंग लागलेली कडी उघडताना कर्कश्श आवाज झाला, जणू काळ आपला जुना जखमेचा किंकाळी देत होता.आत पाऊल टाकताच मोडकी बाकं, धुळीने झाकलेले अक्षरांचे तुकडे, भिंतींवर फिकट झालेली चित्रं सगळं काही पाहून तिने मन आपले घट्ट केले .
राधाने साडीचा पदर कमरेवर खोचला , झाडू हातात घेतला आणि अंगण साफ करायला सुरुवात केली. झाडूचा प्रत्येक फटका तिच्या मनात एकच ठसा उमटवत होता
“इथून पुन्हा घंटा वाजेल मुलं पुन्हा हसतील आणि ही शाळा पुन्हा जिवंत होईल.”

इतक्यात दोन-तीन लहान मुलं रस्त्यावरून जात होती. शाळेजवळ थांबून त्यांनी विचारलं,
“राधा ताई, शाळा उघडते का पुन्हा?”

राधा थोडंसं हसली, तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास चमकत होता.
“हो, आणि तुम्ही पहिल्या बाकावर बसणार.”

मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते निरागस हसू आणि राधाच्या डोळ्यांत चमकलेली खात्री यांनी त्या भग्न शाळेला पहिलं नवं जीवन दिलं.


कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all