Login

हक्क की कर्तव्य भाग -३

हक्क की कर्तव्य The duty that the rights
भाग ३

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, सूर्याच्या केशरी झळाळीत गावाचा चौक जिवंत होऊ लागला. कुणी शेतीवरून दमलेलं शरीर घेऊन आलं होतं, कुणी गुरं बांधून मोकळं झालं होतं, तर कुणी दिवसभराचं काम संपवून थकलेले पाय ओढत येत होतं.

वडाच्या छायेखाली राधा उभी होती. हातात वही घट्ट पकडलेली, चेहऱ्यावर निश्चयाची रेषा. तिच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज होतं.

“माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे,” ती शांतपणे म्हणाली, पण आवाजात ठामपणा जाणवत होता.
“आपल्या शाळेची अवस्था तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. पण ती पुन्हा सुरू करायची असेल, तर आपल्यालाच पुढे यावं लागेल. मुलांना कामावर पाठवणं म्हणजे त्यांच्या भविष्यात कुलूप लावणं आहे.”

क्षणभर गावभर कुजबुज झाली. कुणीतरी हळूच विचारलं, “पण शिकवणार कोण? पैसा कुठून येणार?”

राधाच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू उमटलं.
“पहिल्या काही महिन्यांसाठी मी शिकवेन. खर्चासाठी आपण सगळे मिळून थोडं-थोडं करू. दुरुस्तीचं काम आपणच करू. इच्छा ठाम असेल, तर काहीही अशक्य नाही.”

सरपंचबाई पुढे आल्या. त्यांच्या आवाजात ठामपणा होता,
“राधा बरोबर आहे. ही फक्त तिची लढाई नाही, ही आपली सगळ्यांची आहे.”

हळूहळू चेहऱ्यावरचा संदेह ओसरू लागला. कुणीतरी म्हणालं,
“मी भिंती रंगवतो.”
दुसरा म्हणाला, “माझ्याकडे जुनी बाकं आहेत, ती देतो.”
तिसरा पुढे येत म्हणाला, “मी रोज पाणी भरून देतो.”

त्या संध्याकाळी चौकात फक्त चर्चा झाली नाही, तर एका स्वप्नाचा पाया रचला गेला. राधाने मनाशीच ठरवलं,
“ही शाळा पुन्हा हसेल आणि यावेळी कधीच बंद होणार नाही.”

तिसऱ्याच दिवशी शाळेच्या आवारात वेगळीच लगबग होती. पुरुषांनी हातात फावडे, हथोडे घेतले. बायका धूळ झाडण्यासाठी झाडू आणल्या. लहान मुलं पाण्याने बादल्या भरत होती.

राधा सगळ्यांचं काम नीट वाटत होती.
“ताई, हे बाक इथं ठेवू का?”
“हो, पण आधी धूळ पुसा,” ती हसून म्हणाली.

कोणी छप्पराला आधार देत होतं, तर कुणी तुटलेल्या खिडक्यांना नवं जीवन देत होतं. भिंतींवर पांढऱ्या चुन्याचा ताजा थर चढत होता. हवेत चुन्याचा मंद गंध आणि लोकांच्या गप्पांचा स्वर मिसळून जणू त्या ओसाड शाळेत पुन्हा श्वास फुंकत होता.

दुपारी थोडा विराम घेताना राधा एका कोपऱ्यात उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोर श्रमाने दमलेले गावकरी होते, पण त्या सगळ्या थकव्यावर हसरा आनंदाचा थर जाणवत होता.
“हे फक्त दगड-मातीचं काम नाही,” ती मनाशीच म्हणाली, “हे भविष्य घडवायचं काम आहे.”

चार दिवसांच्या अखंड मेहनतीनंतर शाळेचं रूप पूर्ण बदलून गेलं. वर्षानुवर्षे धूळ आणि डागांनी माखलेल्या भिंती आता स्वच्छ झळकत होत्या. पाटीवर ताजा काळा रंग, बाकं नीट रचलेली, अंगण स्वच्छ झाडलेलं. जणू एखाद्या मंदीराला नवसंजीवनी मिळाली होती.

पाचव्या दिवशी सकाळी राधा नव्या पाटीसमोर उभी होती. हातात जुनी पण नीट घासून चमकवलेली पितळी घंटा. आजूबाजूला मुलं रांगेत उभी होती कुणी नवीन गणवेश घालून, तर कुणी घरच्याच साध्या कपड्यांत. पण प्रत्येक चेहऱ्यावर एकच भाव उत्सुकता आणि आनंद.

राधाने घंटा उचलली आणि हलकेच वाजवली.
“ठण… ठण… ठण…”
घंटानाद हवेत घुमला, आणि जणू शाळेने नव्या श्वासाने आपला प्रवास सुरू केला.

मुलांच्या टाळ्यांचा गजर, गावकऱ्यांच्या डोळ्यांतलं समाधान तो क्षण अविस्मरणीय झाला. सरपंचबाई अभिमानाने म्हणाल्या,
“ही फक्त शाळेची सुरुवात नाही, हा आपल्या गावाच्या नव्या वाटचालीचा पहिला पाऊल आहे.”

राधाच्या मनात समाधानाची एक उब दाटली.
“हो… स्वप्नं खरी होतात, जेव्हा ती आपण एकट्याची न ठेवता सगळ्यांची करतो.”

काही महिने असेच गेले. सकाळी घंटानाद होताच मुलांचा हसरा गजर, पाठांतराचे स्वर संपूर्ण गावात घुमू लागले. रोज पाटीवर नव्या खडूने अक्षरं उमटू लागली, आणि राधाच्या हातून अनेक स्वप्नांना आकार मिळू लागला.

एका दुपारी वर्ग संपल्यावर राधा पाटी पुसत होती. एवढ्यात सरपंचबाई दाराशी उभ्या राहिल्या. हातात एक पत्र होतं.
“राधा, हे तुझ्यासाठी आलंय.”

राधाने पत्र उघडलं आणि काही क्षण स्तब्ध राहिली. जिल्हा परिषदेने तिची अधिकृतपणे शिक्षक म्हणून नेमणूक मान्य केली होती. इतकंच नव्हे तर गावाच्या शैक्षणिक पुनरुज्जीवनासाठी तिचं कौतुक करण्याचा निर्णय घेतला होता.

डोळ्यांत पाणी तरळलं, ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली.
“मी नेहमीच स्वतःसाठी काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहिलं होतं. पण आज कळतंय, खरं मोठेपण म्हणजे दुसऱ्यांचं भविष्य उजळवणं.”

त्या संध्याकाळी शाळेच्या अंगणात छोटेखानी समारंभ झाला. मुलांनी फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घातल्या. गावकऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात आकाश जणू सांगत होतं,
“एक स्वप्न, जेव्हा सगळ्यांचं होतं, तेव्हा त्याला अस्त कधीच नसतो.”

राधाने मुलांकडे पाहिलं आणि मनाशीच म्हणाली,
“ही शाळा… हे हसू… आणि माझी ही ओढ… कायम राहणार आहे.”

शाळा फक्त इमारत नसते, ती भविष्याची पायरी असते.

एकेकाळी ओसाड झालेलं ज्ञानमंदिर
आज पुन्हा घंटानादाने, हसऱ्या चेहऱ्यांनी
आणि नव्या स्वप्नांनी गजबजलं आहे.
शिक्षण हीच खरी आपली माती,
आणि आपणच तिचे माळी.


कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all