Login

हट्ट-5 अंतिम

मराठी कथा
याच काळात गावावरून काही नातेवाईक घरी आले. सहज भेटायला म्हणून. ते निघून गेले पण त्यांच्यावरून सासूबाई आणि सासरेबुवांमध्ये चांगलंच भांडण झालं. जमिनीचे काही जुने वाद, सासूबाईंना दिलेला त्रास अशी बरीच कारणं निघाली आणि त्यावरून दोघांचं कडाक्याचे भांडण झाले. ते भांडण चालू असताना राधा तिथे आली, तीही इतकं भयंकर भांडण बघून घाबरली. रोहन घरात नव्हता.

तिला समजेना काय करावं,

"आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून, या घरात पुन्हा पाय ठेऊ नकोस.." सासरेबुवा चवताळले

सासूबाईंचा स्वाभिमान ठेवला गेला, त्यांनीही लगेच बॅग भरली आणि तिथून निघाल्या, राधाने थांबवायचा प्रयत्न केला पण सासरेबुवांनी राधालाही सुनावलं.

सासूबाई बॅग घेऊन घराच्या बाहेर पडल्या, पण जाणार कुठे? आई वडील राहिले नव्हते, दोन्ही भाऊ..ते त्यांच्या संसारात रमलेले, त्यात भावजयांनी मागच्या वेळी अपमानित करून त्यांना रडवलं होतं..

सासूबाईंचे पाय थबकले,

"कुठे जाऊ? कोणाकडे जाऊ?"

त्यांनी हतबल होऊन रस्त्याच्या कडेला आसरा घेतला..

काही वेळाने लांबून सुनबाई येताना दिसली,

सासूबाई म्हणाल्या,

"काहीही झालं तरी मी परत येणार नाही.."

राधाने तिची पर्स उघडली, पर्समधून चावी बाहेर काढली आणि म्हणाली,

"येऊ नका पण इथे जा.."

"कसली चावी आहे?"

"घराची..माझ्या नावावर एक घर घेतलं होतं मी..त्याचीच चावी.."

सासूबाईंना प्रचंड समाधान वाटलं, किमान छप्पर तरी आहे राहायला..

"काळजी करू नका, तिकडे सगळी सोय आहे.."

"पण हे घर??"

"स्वावलंबी यालाच म्हणतात आई, म्हणून नोकरीसाठी हट्ट आहे माझा..आता समजलं मी का हट्ट धरते नोकरीचा?"

सासूबाईंचे डोळे उघडले, राधा म्हणाली,

"आणि हो, जास्त दिवस राहायची वेळ येणार नाही..मला खात्री आहे की सासरेबुवा लवकरच तुम्हाला सन्मानाने परत घेऊन येतील..तोपर्यंत तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही.."