ती रविवारची सकाळ होती.
घरात गोड वरणाचा वास दरवळत होता. शर्वरीने बटाट्याची भाजी, कोशिंबीर आणि ताक लावून जेवण तयार ठेवलं.
सासूबाई स्वयंपाकघरात आल्या, आणि नकळत बोलून गेल्या,
“सगळं नीट, वेळेवर… पण तू आता फार वेगळी दिसतेस ग…”
शर्वरी थांबून त्यांच्याकडे पाहत म्हणाली,
“वेगळी… पण वाईट नसेल अशी आशा आहे.”
सासूबाईंनी डोळ्यांतले भाव सावरण्याचा प्रयत्न केला.
“वाईट नाही गं. पण… तुझ्यातली ‘पूर्वीची शर्वरी’ शोधते मी अधूनमधून…”
शर्वरी हसली नाही. शांतपणे म्हणाली,
“मी अजूनही तीच आहे. फक्त आता थोडी स्वतःसाठी जगायला शिकतेय.”
त्या शब्दांनी काहीसं हललं होतं. कारण सासूबाई जरा वेळ गप्प राहिल्या. मग हळूहळू खुर्चीत बसल्या आणि म्हणाल्या:
“कधी कधी वाटतं, आपण जास्तच गप्प राहिलो, म्हणूनच नव्या पिढीने बोलणं शिकून घेतलं.
मी सुद्धा कधीच स्वतःसाठी बोलले नाही. एकदाही नाही.
घर, नवरा, मुलं — आणि मी? मी कधी कुणाला आठवलेच नाही.”
शर्वरी थक्क झाली.
ती पहिल्यांदाच सासूबाईंच्या डोळ्यात ‘सून’साठी नाही, तर ‘स्वतःसाठी हरवलेल्या बाई’साठी अश्रू पाहत होती.
“आणि म्हणूनच… जे तू करत आहेस, ते बघून भीती वाटते – पण अभिमानही वाटतो,” सासूबाईंनी तिचा हात हातात घेतला.
“कारण मी नाही जमवलं ते, तू करून दाखवत आहेस.”
तेवढ्यात सासऱ्यांचा आवाज आला,
“चहा कोण करणार? माझी फाइल इथे कुठे ठेवलीय?”
शर्वरी उठली नाही.
सासूबाई हळूच म्हणाल्या,
“तू बस. आज मी करते.”
शर्वरी अवाक झाली.
“आई, तुम्ही?”
“हो. बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच वाटतं, की मीही काहीतरी वेगळं करू शकते…”
त्या दिवशी पहिल्यांदाच घरात चहा वेगळा लागला — कारण तो फक्त साखरेचा नव्हता,
तर एका ‘गप्प राहिलेल्या’ स्त्रीच्या धाडसाचा होता.
मिलिंदने हे सगळं पाहिलं. एक शांत पाऊल पुढे टाकून त्याने शर्वरीच्या शेजारी बसत म्हटलं –
“पायात उभी राहिलीस… आता आपण दोघं एकत्र चालूया.”
शर्वरी आज ऑफिसहून जरा लवकर आली होती. हातात छोटं कुत्र्याचं फूड होतं – बिल्डिंगमध्ये एका भटक्या पिलाला ती रोज खायला घालायची. हा छोटा गोंडस सवयीचा भाग तिच्या धकाधकीच्या जीवनातलं एक हसू होता.
ती घरात आली आणि ओटा स्वच्छ करत होती, इतक्यात मागून एक गंभीर, पण शांत आवाज आला –
“शर्वरी, थोडा वेळ आहे का तुझ्याकडे?”
सासरे होते.
ती एक क्षणासाठी स्तब्ध झाली.
हे पहिल्यांदाच होत होतं.
“हो बाबा… बसा.”
सगळं काम थांबवत ती त्यांच्या समोर बसली.
सासरे थोडे वेळ शांत राहिले. मग एकदम म्हणाले –
“तू बरी आहेस का?”
शर्वरीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उभं राहिलं.
“हो… म्हणजे, हो, आता बरी आहे.”
सासऱ्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.
“माझं जग खूप शिस्तीत गेलं. नियम, जबाबदाऱ्या, कडकपणा — हेच शिकवलं गेलं. तसंच पुढच्या पिढीकडून अपेक्षा ठेवल्या.
पण तू… तू वेगळी आहेस.
तुझ्यात ठामपणा आहे, पण उद्धटपणा नाही.
तुझं शांत वागणं त्रासदायक नाही, ते आरशासारखं आहे – माझा परावर्तित चेहरा दाखवणारं.”
शर्वरी गप्प होती. डोळ्यांत थोडं पाणी दाटलं होतं.
“मी कधीच कबूल केलं नाही, पण तू घरी आल्यावर घरात काही तरी बदललं…
तू तुझ्या कामावर लक्ष देऊनसुद्धा घराकडे पाठ फिरवत नाहीस.
आणि… आजकाल तुझ्या सासूबाई हसताना दिसतात, हे लक्षात येतं.”
शर्वरीचे डोळे आता स्पष्ट ओलावले होते. ती काही बोलली नाही. सासऱ्यांनीच पुढे एक वाक्य टाकलं –
“कदाचित मी तुझ्यासारखं वागायला कधी शिकलो नाही… पण तुझ्याकडून शिकण्याची वेळ आता आली आहे.”
ती फक्त एवढंच म्हणाली –
“शिकवणं माझं उद्दिष्ट नव्हतं… पण एकमेकांपासून शिकणं असेल, तर मी तयार आहे.”
सासरे उठले. एक क्षण तिच्या डोक्यावर हलकासा हात ठेवत म्हणाले –
“मी पहिल्यांदा ‘सून’ ऐवजी ‘मुलगी’ पाहतोय.”
त्यांच्या त्या हाताच्या स्पर्शात काहीतरी नवं होतं — एक आदर, एक स्वीकार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा