Diary of a ‘Little’ girl!

Written by

 

 

मी कालच मावशीकडून आले. माझ्या मावशीच घर खूप मोठं आहे. तो एक मोठ्ठा bungalow आहे. गावाबाहेरच्या त्या बंगल्यात ती एकटीच राहते. तिथे आजूबाजूला खूप सारी झाड लावलेली आहेत. मावशीच्या शेजारी जोशी काकू राहतात आणि त्या सारख्या मावशीकडे साखर मागायला येतात. मावशीच्या अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो. मागे खूप सारी आंब्याची झाड आहेत. आई मला तिकडं गेल्यावर फारवेळ बाहेर थांबून देत नाही. मला पारिजातकाचा गजरा घालायला खूप आवडतं.

श्वेता आमच्या शेजारी राहायला आलेली आहे. ती खूप हुशार आहे पण तिला टॉम अँड जेरी आवडत नाही. ती कायम मोबाईल घेऊन बसते. मला मोबाईल थोडाच आवडतो. त्यावर माझी आई सकाळी उठल्यावर जुनी गाणी लावते. तिला जुनी गाणीच आवडतात. मला क्रिश खूप आवडतो. मी त्याला एकदा भेटणार आहे. आईला मे महिन्याची सुट्टी असते. तेंव्हाच मी त्याला भेटायला जाईन. श्वेताचे बाबा डॉक्टर आहेत. त्यांना मी कुलकर्णी काका म्हणते. ते कायम हसत बोलतात. ते मला नेहमी घरी बोलवतात पण श्वेता आणि तिची आई घरी असल्या शिवाय माझी आई मला तिच्याकडे जाऊन देत नाही. माझ्या आईला कुलकर्णी काका आवडत नाहीत. त्यामुळं आत्तापासून मलापण ते आवडत नाहीत. मावशीकडे आल्यावर मला खूप छान वाटत. पण इथं आल्यावर मला आई बाहेर जाऊनच देत नाही कारण इथं आल्यावर माझ्या पोटात खूप दुखत. आई मला दर महिन्याला मावशीसोबत इकडे पाठवते.

रश्मी माझी मैत्रीण आहे.आधी आम्ही खूप खेळायचो.आता ती जास्त येत नाही मला तिचे घर माहित नाही.ती घरी आल्यावर माझ्यापेक्षा आईशीच जास्त बोलत बसते.माझ्याकडं डॉल्स चा मोठ्ठा सेट आहे.रश्मीला पण डॉल्स खूप आवडतात पण ती आता खेळायला येत नाही.मला तिचा खूप राग येतो.मला श्वेता चा राग येत नाही.आम्ही तिच्याकडे कॉम्पुटर गेम्स सुद्धा खेळतो. आमच्या खेळात कधी कधी शुभम येऊन बसतो.शुभम हे तिच्या दादाच नाव आहे.तो माझ्याशी नीट बोलत नाही पण सारखा माझ्याकडं बघत बसतो.मला तो आवडत नाही.तो मला मंद म्हणून पण चिडवतो.त्याला मी एकदा माझं मार्कशीट दाखवणार आहे.

शाळेत मला नेहमी तू मोठी झालीयेस असं म्हणतात आणि आई मला विचारते कि तू मोठी कधी होणार ग? मला confuse व्हायला होत…

माझ्याकडं खूप ड्रेस आहेत. मला मुलांचे खेळ खेळायला आवडत पण आई आता मला त्यांच्यात जाऊन देत नाही बहुतेक तिला घरी एकटीला भीती वाटत असावी.

आवरल्यावर आईनं मला कॉफी दिली. मला कॉफी आवडते. आईनं कॉफी पिली नाही. तिला सकाळी वेळच नसतो. आमच्या बाबांसारखं मलापण आमच्या हॉल मध्ये बसून कॉफी प्यायला खूप आवडत. पप्पा आता कॉफी पित नाहीत. ते आता या जगातच नाहीत. आई मला सांगते त्यांची आठवण काढून रडायचं नाही. पण ती स्वतःच कधी कधी आमच्या जिन्याखाली रडत बसते. मी तिला थांबवायला जात नाही. तिला थांबवायला गेलं की मलाच रडायला येत. माझ्या आज्जीकडेच फक्त तिला रडताना थांबवायची जादू आहे.

आई काल देशमुख काकांना भेटून आली आणि ती मला सांगत होती की आपण उद्या एका ठिकाणी जाऊन आलो कीकि थोड्याच दिवसात आपलं आयुष्य बदलेल.

मी रश्मीच्या लग्नाला गेले होते.मला परीवाला ड्रेस खूप आवडतो मी तो कधीकधीच घालते. आई मला सुंदर दिसतियेस असं म्हणाली होती. तिथं गेल्यावर मला त्या रश्मीच्या नवऱ्यासोबत फोटो काढायचा होता. फोटोग्राफरने मला लांब उभं राहायला संगितलं. मी चिडून फोटो मध्ये गेल्यावर आईने मला ओढून नेलं आणि सगळ्यांसमोर मला मारलं. माझी आई मला मारून माझ्याबरोबर रडते. मला तेव्हा बाबांची खूप आठवण आली.

सकाळी उठून मी कॉफी पिली .मला जीन्स टॉप घालायला जास्त आवडत नाही. आईनं मला बाहेर जायचं असं संगितलं आहे.आम्ही आईच्या गाडीवरून या मोठ्या घरासमोर आलेलो आहे. घरासमोर खूप सारी झाड लावलेली आहेत. घरात कुणीच नाहीये असं वाटतंय. इथं गेटवर बेल नाहीये. इथंतर देवळात असते तशी घंटा आहे. आईनं ती वाजवायला चाललेली आहे. तिथल्या भिंतीवर एक पाटी लावलेली आहे…    “Mr. Gokhale  (Psychologist)”

 

 

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत