तिनं आम्हाला सांगितलं कि,
पूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी तिथं एक छोटंसं बेट होतं आणि त्यावर एक म्हातारी तिच्या पाळलेल्या लाडक्या कुत्र्यासोबत राहायची.म्हातारीला जवळचं कुणी नव्हतं पण ती स्वभावानं फार चांगली होती.बाजूच्या जंगलातून लाकडं गोळा करून,त्याच्या मोळ्या विकून ती पोट भरायची.गावातल्या सावकाराला म्हातारीच्या झोपडीची जागा हवी होती.म्हातारी द्यायला तयार नव्हती,आता म्हातारीला मारून ती जमीन लाटणं त्याच्यासाठी अवघड होतं असं नाही पण म्हातारी अशी अचानक गायब झाली असती तर गावात सावकारबद्दलचा संशय वाढला असता आणि त्यातून गावच विरुद्ध जाण्याचा धोका होता.
सावकारानं तिला असं मारण्याऐवजी एक योजना आखली.म्हातारीबद्दल गावात ती माणूस नसून कुणीतरी चेटकीण आहे अशी अफवा पसरवली.म्हातारीचं असं एकटं राहणं,ते सुनसान जंगल,ती राहत असलेली ओढ्याकडेची जागा या गोष्टींनी या अफवेत अधिकच भर टाकली.गावकर्यांना हळू हळू त्या अफवेवर विश्वास बसायला लागला आणि सावकारानं डाव साधला.
अमावस्या होती.आपल्या लाडक्या कुत्र्याला खायला घालून म्हतारी झोपडीत तिचं तरट टाकून आडवी झाली.वयानं जर्जर झालेलं शरीर दिवसभराच्या कष्टानं झोपी गेलं.झोप लागून तासादोनतास झाले असावेत कि,अचानक बाहेर गडबड गोंधळ ऐकू यायला लागला.
जखम अजून ताजी होती,कुत्रं चारही पाय वर करून पडलेलं होतं.अवस्था विचित्र होती अगदी न पाहण्यासारखीच.डोक्याचा बराचसा भाग तुकडा मोडून काढल्यासारखा होता,आतलं मांस बाहेर लटकत होतं,रक्त वाहत होतं,हळूहळू घट्ट होऊन काळंहि पडू लागलं होतं.
म्हातारी ते बघून हबकलीच.जड पावलं टाकत त्या कुत्र्याजवळ आली,झुडपातून एक माणूस बाहेर आला,म्हातारीला धक्का दिला,म्हातारी तिथंच आडवी झाली,कसंबसं उठायच्या प्रयत्नात असताना तिच्या तोंडावर सोबत आणलेल्या भांड्यातून काहीतरी फेकलं आणि तो तिकडून पसार झाला.या सगळ्यात म्हातारीची शुद्धच हरपली.
अवघ्या चारपाच मिनिटात तिकडं गर्दी जमा झाली,प्रत्येकजण म्हातारीकडं भीतीनं बघत होता,म्हातारी एव्हाना भानावर येऊ लागली होती.
म्हातारी त्या निष्प्राण कुत्र्याजवळ जेव्हा धडपडत उठून बसली त्यावेळी लोकांनी जे दृश्य पाहिलं ते कुणी जन्मात विसरणार नव्हतं.
कुत्र्याचं शरीर आता आखडलेले होतं,डोळे बाहेर आलेले होते आणि त्यामागं ती म्हातारी बसलेली होती,तिच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं मगाशी त्या माणसं तिच्या तोंडावर रक्त फेकलेलं होतं.सावकार देखील त्याच्या पोराटोरांसोबत तिथं आला आणि त्यानं अफवा उठवली कि म्हातारीनं त्या कुत्र्याला खाण्यासाठीच ठार मारलं.एरवी हे पटलंच नसतं पण ती परिस्थिती बघून लोकांचा विश्वास बसायला वेळ लागला नाही.सगळ्या गावानं निर्णय घेतला कि म्हातारीला या गावातून हद्दपार करायचं आणि अखेर सावकाराचा डाव यशस्वी झाला.
गोष्ट पूर्ण होईपर्यंत रात्र झालेली असायची.सगळीकडं शुकशुकाट आणि गोष्ट पूर्ण झाली कि आंटी आम्हाला थोडावेळसुद्धा थांबून द्यायची नाही,अक्षरशः हाकलून द्यायची.मग आम्ही जे चारपाच जण गोष्ट संपेपर्यंत तिच्या घरात टिकायचो ते एकमेकांबरोबर हळूहळू करत घर गाठायचो.
पुन्हा दुसऱ्यादिवशीचा पूर्ण रविवार तिकडेच दौरा!