Link

Written by

आम्ही गावातंच शिकलो, तसं शहरात शिकायला जाण्यासाठी फारसे पैसेही नव्हते आणि तसं जाणं आम्हाला कधी गरजेचंही नाही वाटलं आणि कदाचित घरात त्याला विरोधच झाला असता.

घरापाठी भवानीमातेच्या मंदिरात आमची शाळा भरायची, शाळेला आत्ता कुठं इमारत मिळाली मागच्या वर्षी. मंदिरात सकाळ झाल्या झाल्याचं जाऊन बसायचो, घरात फारसं काही आवराव नाही लागायचं ते सगळं बिचारी आईच करायची आणि काही काम जरी उरलंच तरी ते अर्थात ताईवरतीच पडायचं !

मला अगदी ५वी- ६वी पर्यंत फार काही मोठं काम केल्याचं आठवतच नाही !

खरंतर ६वी च वयही काम वैगरे करायचं नसतंच पण गावात आणि खास करून आमच्या घरात पोरांना लहानपानापासूनच चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून काळजी घेतली जायची.

मी तेव्हापासूनच धुणं -भांडी करायला शिकले. सुरुवातीला धुणं धुवायच्या नावावर ओढ्यावर जाऊन तासंतास पाण्यात खेळत बसायला फार गम्मत यायची ! माझ्यासोबत पंडी कायम असायची ! हो पंडी !

माझी बालमैत्रीण प्रज्ञा ! तिचं असं पूर्ण नाव घेताना कसंतरीच वाटतं ! भयंकर वेंधळी !

अनेकदा तर घरून जेवता जेवता तशीच यायची आणि आमच्या घरी येऊन हात धुवायची ! पण कायम माझ्यासोबत ! माझी सगळी गुपितं तिला ठाऊक असायची, माझी बाहुली कुठं लपवून ठेवली आहे, ते ,घरात फळीवर बरणीमागे ठेवलेले २ रुपये घेऊन मी कितीवेळा चिंचा आणलेल्या होत्या

तिथपासून ते माझ्या कॉलेज मधला तो शाहिद कपूरसारखा दिसणारा राहुल मला कित्ती आवडतो तिथपर्यंत आणि त्यापुढचंही खूप काही  !

नंतर नंतर हि गुपितं बदलत गेली पण ती गुपितं जिवापेक्षा जास्त जपणारी ‘पंडीच’ होती ! गावात माझे मित्र मैत्रिणी फारसे नव्हतेच. खेळताना आम्ही सगळे एकत्रच असायचो पण ती तेवढ्यापुरती  ‘ओळख’ होती मैत्री नव्हती.

मागच्या पेठेतला सुबोध आमच्यासोबत यायचा,आम्ही तिघे मिळून गावात अक्षरशः कल्ला करायचो ! सगळ्यांच्या एवढ्या शिव्या खाऊन सुद्धा आम्ही गावातल्या कुणालाही सोडायचो नाही, पेरूची, चिंचेची आणि आंब्याची झाडं  तर आमची अगदी पेटंट ठिकाणं होती. आम्ही गावातले देव आणि मंदिरही सोडायचो नाही. गावात मनसोक्त हुंदडून झाल्यावर, पेरू,जांभळं,चिंचा,कैऱ्या,त्या आठ आण्याला मूठभरून येणाऱ्या आंबटगोड गोळ्या, बोरकुट,शाळेसमोरच्या म्हातारीकडून घेतलेली आंबट बोरं आणि या सगळ्यावर मोफत मिळणाऱ्या शिव्या आणि काहीवेळा मार…!

दिवेलागणीच्या वेळी मग आम्ही थेट देवळात परतायचो ! घरातून जोपर्यंत बोलावणं येत नाही किंवा कुणीतरी स्वतः तिथं आमची हजरी घ्यायला  येत नाही तोपर्यंत  मग आम्ही देवळातच बसायचो !

त्या देवळासमोर,आमच्या  शाळेच्या वेळेत,आंबट बोरं,बोरकुट आणि असं चटरफटर विकायला बसणारी ती  म्हातारी संध्याकाळी आम्हाला बसवून गोष्टी सांगायची. तिच्याकडं फारशा गोष्टी नव्हत्या पण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायला फार गंमत यायची !

गावात सगळीकडं शुकशुकाट असायचा.त्यावेळी गाभाऱ्यातल्या देवीचा आणि अगदी तल्लीन होऊन देवांच्या-राक्षसांच्या कहाण्या सांगणाऱ्या त्या म्हातारीचा तो सुरकुत्या पडलेला चेहराही समईच्या उजेडात उजळून जायचा !

आम्ही तीन चार जण तिच्याभोवती कोंडाळं करायचो आणि मग  म्हातारी मनापासून त्या गोष्टी सांगायची !

ते दिवसभर मळलेले कपडे, ते फुटलेले गुडघे,पायात बोचलेले काटे आणि दिवसभर हुंदडल्यामुळं दुखणारे पाय या सगळ्यांसोबत आम्ही  त्या गोष्टी ऐकायचो !

मी पुण्यात आल्यावर मध्यंतरी एका संस्थेच्या मेडिटेशन शिबिराला गेले होते तेव्हा लक्षात आलं कि विकत घेतलेली हि मनःशांती आम्हाला ती म्हातारी अगदी रोज, फुकटात आणि मनापासून देत होती !

सकाळी सकाळी शाळेत फारसं कुणी आलेलं नसायचं पण आमचे गुरुजी मात्र हमखास हजार असायचे मग त्यांना आम्ही मनात येतील ते सगळे प्रश्न विचारायचो आणि ते पण न कंटाळता उत्तरं द्यायचे.

मला तर असं कित्त्येक वर्ष वाटायचं कि या जगात आमच्या गुरुजींना माहित नाही असं काहीच नसणार ! आणि ते खरंच होत एका अर्थानं !

गुरुजींमुळंच मला वाचायची आणि ऐकायची सवय लागली, ते आम्हाला नेहमी सांगायचे कि “जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपले कान आणि डोळे सतत उघडे असले पाहिजेत” त्यावेळी मला हे वाक्क्य गंमतीदारच वाटायचं पण हळूहळू त्याचा अर्थ समजायला लागला !

त्यानंतर मी कॉलेजला गेले. तेदेखील गावातच होत.त्या कॉलेजची सुरुवात आमच्याच बॅचपासून झाली, ते कॉलेज आमच्या आमदाराने बांधलेलं होत. तिथं शिकवणं वगरे जेमतेमच होत पण गावातल्या सगळ्यांना आणि विशेष म्हणजे आम्हाला त्या कॉलेजचं  फार कौतुक वाटायचं !

प्रत्त्येक कॉलेज प्रमाणे आम्हीही वर्गांपेक्षा कॅन्टीन मधेच जास्त गर्दी करायचो. कॉलेजमध्ये शाळेसारखी मजा नाही यायची पण कॅन्टीनच खाणं, मुलामुलींचे ग्रुप,कॉलेजच्या निवडणुका, कोकणात गेलेल्या सहली, मुलांशी,त्यांच्या आयुष्याशी वाढलेली जवळीक या सगळ्यामुळं आयुष्य जादुई वाटायचं !

आमचं गाव छोटंसं जरी असलं  तरी तिथलं एकूणच वातावरण खूप स्वछ आणि छान होत. इंटरनेट असण्याचा संबंधच नव्हता,television होते पण त्यांचाही प्रमाण फार कमी होत त्यामुळं बाहेरच्या जगाशी आमचा फारसा संबंध यायचाच नाही

पण आज प्रगती इतकी झालीये कि ज्या गोष्टी अगदी कॉलेजला गेल्यावरसुद्धा आमच्या गावीही नसायच्या त्याबद्दल

आज माझ्या सातवीतल्या मुलीच्या मैत्रिणी अगदी बिनधास्त गप्पा मारतात आणि तेही आईबापासमोर !

 

 

“होतंय कि नाही लिहून तुझं ? उद्या शेवटची तारीख आहे submission  ची,त्यानंतर तुलाच वाचत बसावं लागेल हे.”

अनुने मध्येच हे बोलून माझी लिंक तोडली.कधी नव्हे ते एवढं छान सुचत होतं.

आमचं शेवटचं वर्ष आहे हे कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या मॅगझीन साठी सगळ्यांकडून लिखाण मागवून घेतलंय.मला आवडतं लिहायला मग म्हणलं ह्या संधीचा फायदा घ्यावा…

मी पुण्यातच लहानाची मोठी झाले,ह्या गोष्टीतल्या पात्रासारखं मला खेडेगावात राहता नाही आलं .कधीतरी मैत्रिणीच्या घरी गेली असेन तेवढंच म्हणून मग असं काहीतरी लिहून ते सगळं जगायचा आणि अनुभवायचा प्रयत्न करत असते.

 

हिनं खरंच लिंक तोडली…पुढचं काहीच नाही सुचते…ठीके सुरुवात तरी चांगली झालीये…बघू कधी पुन्हा मूड येतोय आणि कायकाय सुचतंय ते….

 

 

 

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा