My deep diploma

Written by

My Deep Diploma……

मी तिसर्‍या वर्षाला गेलो तोवर बर्‍यापैकी धाक जमवला होता कॉलेजमधे.नाशिकची कार्टी वाटेत उभी दिसली की इतर पब्लिक दुसरी वाट शोधणे पसंत करायचे. अगदीच वाह्यात नव्हतो पण खोड्या करणे,मागून टॉंन्ट मारणे किंवा कुणाची फ़जिती करणे यातच आमचा आनंद. आमच्या वर्गात शंभर पोरं आणि चार पोरी. शेवटचे वर्ष असल्याने एकंदर धमाल होती वर्गात.

तर किस्सा असा आहे !….यावर्षी प्रत्येक वर्गात तीस मुली नव्याने आलेल्या होत्या त्यामुळे कॉलेज हिरवेगार दिसत होते.नुकतीच मिसरुड फ़ुटलेली पोरं कॉलेजच्या आवारात भटकत असायची. (डिप्लोमा इंजिनियरींगची मुलं अशीच शोभतात बहुधा) फ़र्स्ट ईअरच्या मुली सहसा फ़िरत नसत. त्या कॅंटिनजवळच्या निंबाखाली अभ्यास करत बसलेल्या असायच्या. इंग्रज काळात दारुगोळा साठवायची जागा कॉलेज म्हणून रुपांतरीत केलेली होती. किती कमाल ना….त्याच कॉलेजात माझ्यासारखी क्षेपणास्त्रे तयार झाली हे काही नवल नसावे…

माझ्या सायकलचे स्टॅंड तुटलेले होते त्यामुळे सायकल एका भिंतीला लावून मी मुद्दाम कॅंटीनच्या रस्त्याने गेलो. ती पारावर बसून अप्लाईड मेकॅनिक्सचे पुस्तक चाळत बसलेली होती. मला पाहून पटकन खाली पडलेली ओढणी गळ्यात घेत तिने पुढे केलेले पाय दुमडून घेतले आणि मान खाली घातली. पोरगी अगदी सालस होती. केस कपाळावरुन खाली आल्याने तिचा चेहरा जवळून बघण्याचा योगायोग जरी टळला तरी तिला बघून मला एक वेगळाच आनंद झाला होता. गव्हाळ रंग काळेभोर केस,पायात नुकतीच घेतली चामडी चप्पल आणि अबोली रंगाचा चुडीदार बघत मी तिथून पुढे आलो. बागेच्या कंपाऊंडवर बसून विन्या,दिप्या,वाघ्या,पर्‍या आणि योगिता माझी गंमत बघत होते. मला बघून ए संत्या ए संत्या शुक शुक अशा हाका मारल्यावर मागे पारावर बसलेली”ती” बॅग खांद्यावर टाकून पटकन पसार झाली.

ही बैताल गाभ्र समोर बसलेली असतील याची कल्पनाही नव्हती मला. घसा खाकरत डोळ्यांनी खुणावत योगिताने मला जे विचारले ते मी न बोलता तिला तोंड वाकडं करुन सांगून टाकलं. आमचे प्रॅक्टिकल कॅन्सल झाले होते त्यामुळे सगळीच मुलं टाईमपास करत बसली होती. मी विन्याला म्हटलं चल रे जरा फ़र्स्ट ईयरकडे चक्कर मारुन येऊ. तो उडी मारुन तयारच होता. तिच्या वर्गाजवळ गेल्यावर मी कॉलर केस नीट करुन घेतले. शर्टाची इन नीट खोचत दारातुन आत डोकावलो. ७-८ मुंडकी पुस्तकात खुपसुन बसलेली दिसली. मधल्या बेंचवर ती होती. (पोटात गोळा आला) विन्याला कळले होते की मी कुणासाठी आलोय. त्याने मागून ढुंगणाला धक्का मारुन मला आत लोटले. पायांचा आवाज ऐकुन तिने मान वर करुन मला पाहिले. मला पुन्हा एकदा पाहून थोडी घाबरली होती. सिनिअर वर्गात आले हे पाहून उरलेली मुंडकीही थरथरत होती. तसे आम्ही सगळे अवलिये होतो त्यामुळे आमची किर्ति सगळ्या ब्रांचेसमध्ये पसरलेली होती. तिच्याशेजारी बसलेल्या मुलीने आवंढा गिळला हेही पाहिले मी. तिला डोळे भरुन पाहून विन्याला ओढत खाली घेऊन आलो. का कोण जाणे पण छाती धडधडत होती. पोरगी घाबरट वाटत होती पण तिचे डोळे मात्र खुपकाही सांगत होते. मी आणि विन्या कॅंटिनच्या शहाबादी फ़रशीवर येऊन बसलो. एका वेगळ्याच आनंदाने की भितीने पण माझे पाय मात्र लटपटत होते. कळकटलेल्या काचेच्या ग्लासात दोन कटिंग ढोसून आम्ही बाहेर आलो.

आमच्या वर्गातल्या चौघींना मी तिचा तपास काढायला सांगितला. तासाभरात सर्व माहिती माझ्यापर्यंत पोहोचली.पंढरपुरजवळच्या छोट्याशा गावातून ती आलेली होती. नाव तनुजा आत्माराम कुलकर्णी. दहावीत ९४ टक्के मिळवून पहिली आलेली. धुळ्यात टेलेफ़ोन कॉलनीत तिचे मामा-बिमा राहतात त्यांच्याकडे राहत होती. या एवढ्याशा माहितीने मी पुरता हुरळून गेलो. काहीही करुन तिच्याशी बोलायचंच यासाठी मी शक्कल लढवत होतो.कॉलेज पाच वाजता सुटले तेव्हा मी माझी रेंजर सायकल घेऊन बाहेर उभा होतो. ती आणि तिच्या मैत्रिणी काहीतरी बडबडत समोरुन जाईपर्यंत मी तिला पुन्हा नखशिखांत न्याहाळून घेतले.

नेहमी कॉलेजला यायला अळमटळम करणारा मी आज पावणेअकरालाच पोर्चमधे उभा होतो. नुकतीच शिवलेली निळ्या रंगाची पॅरलल पॅंट आणि वर आकाशी चौकटीच्या शर्टमधे मी भारी दिसतो असे मित्र म्हणायचे. म्हणून मी तोच ड्रेस घालून आलो होतो. होस्टेलमधली बाकी मुलं यायला उशीर होता. तेवढ्यात मला गेटमधून ती येताना दिसली. मला वाटले होते तिने मान वर करुन मला एकदा बघावे पण बाईची मान काही वर होत नव्हती. तिच्या ड्रेसची फ़ॅशन गावाकडची होती तरी नीटनेटका होता ड्रेस. खांद्यावर लटकलेला मिनी ड्राफ़्टर ,एका हातात ड्रॉईंग शीट ठेवायचा लाल पोंगा आणि खांद्यावर पन्नास किलोची बॅग घेऊन ती हळूहळू माझ्या अगदी समोर आली. मी निर्लज्जपणे(नकळतपणे) बोलुन गेलो…” अय तुझं नाव तनुजा आहे ना?”…..ती दचकून जागेवरच थांबली. फ़क्त एक तुसडा “हो” म्हणून ती पुढे जाऊ लागली…..” मी मंतोष साटवाडे… सॉरी संतोष वाटपाडे…थर्ड ईयर मेकॅनिकल…काही प्रोब्लेम आला तर मला विचारत जा”… पुन्हा एकदा “हो” म्हणून ती जिना चढून वर निघून गेली..

“ए संत्या..पोपट झाला का?”….शैल्या लांबून ओरडला….शैल्या आणि विन्या होस्टेलच्या रस्त्याने सायकल लोटत येत होते.(आयला यांनाही हीच वेळ सापडली का यायला) दोघांशी मी काय बोलत होतो आणि काय ऐकत होतो काहीही कळत नव्हते.पाय फ़क्त त्यांचे चालायचे काम करत होते. वर्गात येऊन बसलो. मास्तर येऊन शिकवत होते जात होते पण माझ्या कानात तनुचा “हो” सतत घुमत होता… पहिले तीन तास कसेबसे संपवून मी नव्या बिल्डिंगकडे धाव घेतली…

( क्रमश:)

Comments are closed.