मेहंदी ची जळमटे... (भाग दुसरा)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांची कथा..

मेहंदी ची जळमटे... (भाग दुसरा)

मेहंदी ची जळमटे... (भाग पहिला)

https://irablogging.com/blog/mehndi-chi-jalmate...-1

ती तिच्या विचारात गुंग होती. तितक्यात आदीचा कॉल येतो.

"हॅलो आभा."

"हमम्म."

"पाहिले मी फोटोज् तुझ्या मेहंदी चे. छान काढलीय. बरं मी काय म्हणतो, हॅलो हॅलो आभा ऐकतेस..?" आदी

"हमम्म."

"काय झालं तु रडतेयस का.?" आदी

"अरे नाही रे, थोड सेंटी झाले बाकी काही नाही." आभा

"अग तु रडू नकोस. मला वाटतं कि आपण भेटून बोलूया. माहीत नाही का पण तुला भेटायची खुप इच्छा झालीय" तितक्यात आभा च्या मैत्रिणीने येऊन तिचा फोन हिसकावून घेतला.

"जिजू आता लग्नानंतर पण थोड बोलायला ठेवा." म्हणत तिने कॉल कट केला आणि सगळ्या तिची छेड काढू लागल्या. आभा सुद्धा सगळ मनापासून एन्जॉय करत होती.

तिकडे आदित्य फोन कट झाल्याने कासावीस झाला होता. फोन आता तिच्या मैत्रिणीं कडेच असेल म्हणून त्याने पुन्हा कॉल करायचा विचार सोडून दिला.


दुसऱ्या दिवशी आईने आभा ला लवकर उठवून जवळच्या मंदिरात देवदर्शनाला घेऊन गेली. रात्री आभा ला भयानक स्वप्न पडल्याने ती दचकून जागी झाली होती, शिवाय नवरी मुलगी असल्याने तिच्या घरच्यांना तिची काळजी वाटत होती म्हणून बाबांनी आई ला सांगून तिला बर वाटावं म्हणून मंदिरात जाऊन यायला सांगितलं. तेवढंच मन शांत होईल. मंदिरात जाऊन आले तसे घरी तिला खायला दिलं मग आराम करायला सांगितलं. आज संध्याकाळी हळद असल्याने दगदग होईल म्हणून ती सुद्धा गादी टाकून झोपून गेली. झोपताना तिला, तिच्या आणि आदित्य च्या आठवणी मनात येऊ लागल्या. तिला आता तिच्या पुढच्या संसाराची स्वप्न वेध लागले होते.

इकडे आदी, आभा ला कॉल करून करून कंटाळुन गेला. कालपासून तिचा फोन सारखा स्विच ऑफ येत होता. काय झालं असेल तिकडे म्हणून त्याने आभा च्या भावाला कॉल केला.

"हा बोला जिजू." अभय

"अरे अभय काय झालं आभा कुठेय, तिचा फोन कालपासून स्विच ऑफ येतो आहे. तुझा पण फोन लागत नव्हता."

"हो घरात पाहुणे आहेत ना तर खूप गडबड गोंधळ आहे. माझ्या फोनची बॅटरी चार्ज करायला विसरलो होतो मी काल, आणि आभा झोपलीये."

"ह्या वेळी..? का काय झालं आहे का तिला?"

"नाही काही झालं नाहीये, फक्त जरा तिची दगदग झालीय ना म्हणून तिला आई आणि आज्जीने आराम करायला सांगितला आहे."

"अच्छा.."

"आणि आज हळदीचा कार्यक्रम पण आहे ना म्हणून मग आराम केला तर फ्रेश वाटेल. तसं ही आता तुम्हा दोघांना आता आराम करायला वेळ च नाही भेटणार."

"हमम्म.. बरं पण ती उठली की तिला बोल मला कॉल करायला."

"बरं सांगतो..अजुन काही?"

"नाही काही बाकी. Bye"

आभा ने मस्त झोप काढली असल्याने तिला आता फ्रेश वाटतं होत. ती गादीवर पडून च विचारात हरवली होती. तिला उगीचच काळीज धडाधडतय असं वाटतं होतं. तिला उठवायला तिच्या मैत्रिणी येतात आणि आवरायला घेऊन जातात. आवरत असताना तिच्या मैत्रिणी तिची खोडी काढायला सुरुवात करतात.

"वाह काय रंगलीय हा मेहंदी."

"हो मग, खूपच प्रेम आहे आमच्या भावजींच."

"काय मग काल मेहंदी आणि आज हळदीच्या रंगात न्हाऊन जाशील." आभा ची मैत्रीण

"आज आभा तुला आम्ही हळदी ने पूर्ण अंघोळ घालू."

"हो म्हणजे अजुन निखार येईल."

तितक्यात आई येते,
"अग नवऱ्याची उष्टी हळद लागेल ना तेव्हा खरा निखार येईल तिच्या चेहऱ्यावर. हो की नाही आभा?"

"काय गं आई तु पण." असं म्हणून सगळ्याच जणी हसू लागतात.

हळदीची सगळी तयारी झाली होती. आभा ने सुंदर अशी पिवळ्या रंगाची, हिरवी बॉर्डर त्यावर छान गोल्डन कलर ची नक्षी असलेली साडी नेसली होती. साधा मेकअप, केसांची हेअरस्टाईल घालून त्यावर गजरा माळला होता. गळ्यात छोटी चैन आणि आज्जीने दिलेला नजुकसा नेकलेस आणि त्यावर चे छोटे कानातले. पायात पैंजण वाजत होते. बाहेर अंगणात आली तशी सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. आईने तिची नजर काढली. आभा खुप सुंदर दिसत होती. तिच्यावर साडी खूप खुलून दिसत होती.

हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. सगळे एक एक करून तिला हळद लावत होते. तिच्या भावाने dj ठेवला होता. बाजूच्या बायका ठुमकत होत्या आणि एकमेकींना हळद लावत मस्ती करत होत्या. आभा च्या आईला ही त्यांनी पूर्ण हळद लावली. उद्यापासून आपली लेक तिच्या घरी निघून जाईल हे आठवून मध्येच त्यांचे डोळे सुद्धा पाणावत. सगळं वातावरण हळदीमय झालं होतं.

"दादा तुझा फोन वाजतोय केव्हाचा.हा घे"

"अरे मी विसरलो होतो. Thanks."

कोणत्या तरी unknown no. वरून कॉल येत होता.

"हॅलो.. हॅलो.. कोण? हा काय आवाज येतोय का? हॅलो.. एक मिनिट थांबा."

"....."

"हा बोला. तुम्ही आलात का उष्टी हळद घेऊन? सॉरी हं माझा फोन आत होता म्हणून कळलं नाही. तुम्ही कुठे आहात मी येतो घ्यायला."

"...."

"अजुन घरीच आहात? इथे सगळे वाट बघत बसलेत तुम्ही उष्टी हळद कधी आणताय ह्याची."

"....."

"हॅलो.. हॅलो.. तुम्ही बोलत का नाही आहात."

"....."

"काय...?"

अभय ने जे काही ऐकलं त्याने अभय ला खुप शॉक झाला. त्यानंतर च अभय ला मात्र काही ऐकु येईना. त्याला फक्त आभा चा हसरा चेहरा आठवत होता. ती किती खुश आहे कसं सांगू तिला, घरच्यांना ह्या बद्दल. काय रिअॅक्ट होतील सगळे. तो मागे वळतो तर त्याच्या मागे बाबा उभे होते. अभय चा पडलेला चेहरा पाहून त्याला घरात घेऊन जातात. अभय ला काहीच सुचत नव्हतं.

"अरे काय झालं बाबा? बोल ना काहीतरी कधीचा विचारतोय तुला काय झालं गप्प का आहेस."

त्यांच्या वाढलेल्या आवाजाने आजुबाजूचं वातावरण शांत होत. आज्जी आधार घेत घरात जाते. त्यामागोमाग आई आणि आभा सुद्धा जातात. सगळे बाहेरून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होते.

"वसंता अरे काय झालं का तु अभय ला ओरडतो आहेस."

"अग आई माहीत नाही कोणाचा तरी फोन आला होता ह्याला. चेहरा पडला होता बघून काय झालं केव्हाच विचारतो आहे पण हा तेव्हा पासून गप्प च आहे काही बोलेच ना."

आभा येऊन त्याच्यासमोर बसून अभय चा हात पकडुन त्याला विचारू लागते.

"अभी काय झालं असेल ते सांग ना पटकन का असा आमचा जीव टांगणीला लावतोय तु. हे बघ जे काही असेल ते सांगून टाक."

"आभा.. आदित्य आपल्याला सोडून गेला.."


क्रमशः

🎭 Series Post

View all