Login

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

आपल्या हुशारीने आणि युक्तीने शत्रूला वेढा उचण्यास भाग पडणाऱ्या आजीची गोष्ट. नक्की वाचा.


शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर


( सदर कथा काल्पनिक असून, कोणत्याही व्यक्ती, जागा अथवा कालखंडाशी त्याचा संबंध नाही. कृपया याची वाचकांनी नोंद घ्यावी. )

" माझ्या म्हातारीच पण थोडे ऐकून घ्या किल्लेदार. तुम्ही माझ्या लेकरासारखे आहात म्हणून सांगते. फक्त एकदा ऐकून घ्या. ते अमलात आणायचं - नाही आणायचं, ते तुमच्यावर राहील. " रखमा आजी थोडी कनवळून म्हणाली.

आज दोन वर्षे झाली. शत्रू गडाला वेढा देऊन बसला आहे. गडावर लढवय्ये दोनशे सैनिक तर आचारी, दासी, हरकाम्या, गायी- गोठे सांभाळणारे, घोडे - पागा सांभाळणारे, वैद्य, एक ना अनेकजण गडावर होते. जवळपास तीनशे - साडे तीनशे गडावर माणसं आणि गडाला वेढा. महाराज वेगवेगळ्या लढाईत गुंतलेले. गड राखायला कठीण नव्हतं. कारण गडाच बांधकाम भक्कम शिवाय गुंतागुंतीच होत. त्यामुळे शत्रू वर आला तरी एका वेळी एकच जण आत येऊ शकत होता. तेही दरवाजा लहान असल्यामुळे मान खाली वाकवून यावं लागे. आणि मान वाकवून आत प्रवेश करताच मान मारली जायची.

याचं कारणामुळे शत्रू आत येत नव्हता आणि वेढा ही सैल करत नव्हता. शत्रूला माहित होत, की आत जाऊन जिंकू शकत नाही मात्र गडावरच सैन्य खाली आलं तर सहज संपवू शकू. त्यासाठी शत्रू तळ ठोकून गडावरची रसद संपण्याची वाट पाहत होता.

दोन वर्षे झाली. जेमतेम दोन महिने अजून पुरेल एवढीच रसद गडावर शिल्लक होती. किल्लेदाराची चिंता वाढत होती. त्याने आपल्या दोनशे सैनिकांना बोलावलं आणि परिस्थिती सांगितली. आणि लढण्याचा निर्णय घेतला. त्यातही शंभर जण जातील आणि रात्री शत्रूच्या गोठात शिरतील असं ठरलं.

ठरवल्याप्रमाणे रात्री शंभरजण गेले, मात्र शत्रूला या गोष्टीची आधीच कल्पना होती, की रसद संपत आल्यावर असा डाव खेळाला जाईल. त्यामुळे शंभरजण मारले गेले. किल्लेदाराला आता काय कराव ते सुचत नव्हतं. ते गडावर एका बुरुजजवळ उभे राहून यावर विचार करत असतानाच गडावर स्वयंपाक घरात वर्षानुवर्षे काम करणारी रखमा आजी आली आणि किल्लेदाराला म्हणाली," किल्लेदार, शत्रू वेढा उठवणार नाही. कारण शत्रूला माहित आहे, गडावर किती जण आहेत. "

रखमा आजीच्या अश्या बोलण्याने किल्लेदार चमकला. पण जास्त रस दाखवला नाही. ते पाहून रखमा आजी पुन्हा म्हणाली, " माझ्या म्हातारीच पण थोडे ऐकून घ्या किल्लेदार. तुम्ही माझ्या लेकरासारखे आहात म्हणून सांगते. फक्त एकदा ऐकून घ्या. ते अमलात आणायचं - नाही आणायचं, ते तुमच्यावर राहील. "

किल्लेदाराच्या मनात आलं. ' मी एवढ्या लढाय्या लढलो, एवढे राजकारण पहिलं, आणि ही आजी जी कधी स्वयंपाक घरातून बाहेरही पडली नसेल, ती मला या परिस्थितीबद्दल सांगू पाहतेय ?' पण तरीही रखमा आजीचं वय पाहता, वयाचा आदर म्हणून त्यांनी बोलायला सांगितलं.

रखमा आजीने बोलायला सुरुवात केली, " किल्लेदार आपल्या गडावर नेमके किती जण आहेत हे शत्रूला माहित आहे. म्हणूनच शत्रू जागा सोडत नाहीये. "

किल्लेदार असमंजस विचारतो, " आजी, शत्रूला कसं कळणार ? "

रखमा आजी, " आपल्या पत्रावळ्या वरून. "

किल्लेदार चमकून, "म्हणजे ?"

रखमा आजी, " किल्लेदार, आपण जेवण झालं की सर्व पत्रावळ्या गडावरून खाली दरीच्या बाजूला फेकून देतो. शत्रू त्याचं पत्रवाळ्यावरून गडावर कितीजण आहेत याचा अंदाज लावतो. एवढे दिवस साडे तीनशे पत्रावळ्या खाली फेकल्या जायच्या आता शंभर कमी झाल्या. त्यामुळे अडीचशे माणसं शत्रूसाठी जास्त नाहीत. शत्रूला माहित आहे. आज ना उदया रसद संपेल. मग आपल्याला गडावर तडफडून मरावं लागेल किंवा खाली उतरावं लागेल. याचं गोष्टीची तो वाट पाहतोय. "

किल्लेदार आवाक होऊन रखमा आजीकडे पाहू लागला. किल्लेदाराच्या डोक्यात हा विचारच आला नाही. किल्लेदार गडबडला.

" मी लगेच पत्रावळ्या खाली टाकू नका म्हणून सांगतो. " किल्लेदार.

"त्याने काय होणार ? शत्रूला आधीच माहित आहे. " रखमा आजी.

किल्लेदार विचारात पडला.

" मी एक सुचवू का किल्लेदार ? " रखमा आजी म्हणाली.

" हो आजी बोला. तुम्ही एवढी मोठी चूक शोधलीत तर उपाय पण सांगा. " किल्लेदाराला आता आजीच्या चतुर्याची झलक दिसली होती.

" याचं पत्रावळ्या वापरून शत्रूला परत पाठवायच. " रखमा आजी म्हणाली.

" कसं शक्य आहे आजी ? " किल्लेदार.

" शक्य आहे. यावेळी आपल्याकडे शक्ती कमी आहे म्हणून युक्तीने काम करायचं. किल्लेदार आज सर्वाना गडावर दीपमाळा लावायला सांगा, संगीत वाजू दया, होळीला, दिवाळीला असतो तसा माहोल तयार करा. गोडाधोडाच बनवायाला सांगा आणि मोठा जल्लोष करा. जो शत्रू पर्यंत पोहचेल. " रखमा आजी.

" त्याने काय होणार आहे आजी ? " किल्लेदार.

" ते तुम्ही माझ्यावर सोडा. माझ्या योजनेनुसार सर्व झालं, तर उद्या सैन्य परत जाईल असं मला वाटत हे नक्की. " रखमा आजी.

किल्लेदारानांनी आदेश देऊन रखमा आजीने सांगितल्याप्रमाणे केले. दोन वर्षांनी गोडाधोडाच बनलं होत. त्यामुळे बराच उत्साह सुद्धा होता. रात्र जल्लोष करण्यात गेली.

सकाळी पाहतो तर शत्रू वेढा उचलत होता आणि परत निघण्याची तयारी सुरू होती. हे पाहून आनंद तर झालाच पण हे सर्व रखमा आजीने केलं कसं ? हा प्रश्न होताच.

शत्रू लांब नजरेआड होईपर्यंत आणि त्यानंतर हे्रांकडून बातमी मिळेपर्यंत किल्लेदाराच्या जीवाला थारा नव्हता. शेवटी शत्रू गेला. हे कळल्यावर किल्लेदारांनी रखमा आजीकडे जाऊन " आजी तू हे नक्की कसं केलंस ? " अशी विचारणा केली.

त्यावर आजी म्हणाली, " सोपं होत किल्लेदार, रात्री हजार - दीड हजार पत्रावळ्या अन्न लावून उष्टवून खाली टाकून दिल्या. गडावर जल्लोष होता. संगीत होत. यावरून शत्रूच्या लक्षात आलं, की आपला वेढा चुकवून गडावर रसद आणि सैन्य पाठवलं गेलं आहे. त्यामुळे गडावर जल्लोष सुरू आहे. रोषणाई आहे. रसद आणि सैन्य गडावर पोहचलं म्हणजे आता अजून किती वर्षे वेढा ठेवणार ? आधीच दोन वर्षे झाली आहेत. सैनिकांना फुकट पगार दिला जातो आहे. शिवाय त्यांचं अन्न पाणी आहेच. इथे वेढा वाढवण्यापेक्षा दुसरीकडे लढाई करून गड किल्ले मिळतील. म्हणून ते वेढा उठवून निघून गेले. " रखमा आजीच्या या खुलाश्यावर किल्लेदार चकित राहिले.

त्यांनी रखमा आजींचा योग्य तो सन्मान केलाच शिवाय राज्याच्या राजदरबारी त्यांना सन्मान मिळेल याची तजवीज केली.


आहे की नाही शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ ?


समाप्त.


*****

लोकप्रिय कथा: दागिना

खोलीत दार लावून तिने मनसोक्त रडून घेतलं. कारणही तसंच होतं. तिच्या नऊ वर्षाच्या मुलाने तिला जे सांगितलं ते ऐकून तिला स्वतःवरच राग येऊ लागला.

तिचा मुलगा, राघव, सगळ्या गोष्टीत हुशार आणि वयाच्या मानाने लवकरच समज आलेला होता. तो अतिशय छान क्रिकेट खेळायचा. शाळेकडून त्याला अनेक बक्षिसेही मिळाली होती. गेल्या काही महिन्यांपासून अंजलीची धावपळ सुरू होती. पाहुणे, येणं-जाणं यात राघवकडे तिचं जरा दुर्लक्ष झालं होतं.

अंजलीला तिची एक मैत्रीण भेटली तेव्हा ती म्हणाली,

"तुझा राघव इतका छान खेळतो, त्या क्लबला का नाही जॉईन करत?"

"तो मागे बोलला होता, पण तिथे फारच पैसे लागणार होते गं.."

"आपण मुलांसाठीच कमावतो ना? तू त्याला पाठवायला हवं होतंस.."

अंजलीला मागील काही दिवस आठवले. राघवने तिला एक-दोनदा याबद्दल विचारले होते. पण त्याचवेळी घरी तिच्या दोन्ही नणंदा आलेल्या होत्या. त्या आल्या म्हणजे त्यांचं करण्यात पूर्ण वेळ जाई. त्यात सासूबाई चोवीस तास राबवून घेत. अंजलीलाही पाहुण्यांचं सगळं करायला आवडायचं.

पण यावेळी दोघीजणी एकदम आल्यामुळे दोघांवर आर्थिक ताण पडला होता. चांगल्या साड्या, घरात लागणाऱ्या वस्तू आणि एखादा दागिना करायचाच असा जणू नियमच होता.

इतरवेळी सर्व जमायचं, पण आता राघवच्या शिक्षणासाठी आणि क्लासेससाठी पैसे लागायचे. खर्च वाढला होता. राघवने क्रिकेट क्लबबद्दल सांगितलं तेव्हा अंजली नणंदांसाठी वाळवण करण्यात व्यस्त होती. आधीच वैतागलेली अंजली त्याच्या मागणीला तात्काळ नकार देत म्हणाली,

"हे बघ, क्लबची फी जास्त असते.. सध्या अडचण आहे.."

पूर्ण कथा लिंकवर
https://irablogging.com/blog/ornament_36358

0