मी एक (आधीची careerist बाई आणि आताची ) सामान्य गृहिणी, दोन वाढत्या मुलांची आई. वाचनाची लहानपणापासून खूप आवड. एकदा असंच पुस्तक वाचत असताना मनात आलं कि आपल्या सामान्य आयुष्यातही असे कित्येक गमतीशीर, तर कधी काळजाला चटका लावून जाणारे, आपल्याला धडा शिकवून जाणारे प्रसंग घडतात. एखाद्या उदास क्षणी तेच आपल्याला उभारी देतात, ओठांवर खुद्कन हसू आणतात. कॅव्हिडच्या नकोशा दिवसांमध्ये तर प्रकर्षाने जाणवले की त्या गोष्टी आपण लिहून काढल्या आणि इतरांनाही वाचायला मिळाल्या तर कदाचित ते किस्से त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणतील. शाळा- कॉलेज सोडल्यावर कधीही काही न लिहिलेल्या मला खूप दडपण आले, एक अनामिक भीती वाटली. पण तेव्हा धावून आले ते आपले लाडके पु. लं., त्यांच्याच आवाजातील "राजहंसाचे चालणे असेल मोठ्या डौलाचे, पण म्हणून इतरे जणांनी चलोच नये कि काय ?" ह्या उक्तीने मला धीर दिला. यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने घडतच असतील. तुम्हाला आवडल्या तर जरूर कळवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये नक्की शेअरकरा.